गोमेकॉत पोहोचला गांजा; प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा धिंगाणा

प्रकरण हाताबाहेर; पाचजणांची हकालपट्टी, आगशी पोलिसांत गुन्हा दाखल
GMC
GMCDainik Gomantak

पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहातील पाच विद्यार्थ्यांकडून सुरक्षा रक्षकांनी गांजा जप्त केला. या प्रकारामुळे डॉक्टरी या सेवाभावी पेशाला काळीमा फासला गेल्याने प्रशासन सतर्क झाले असून गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची सूचना दिली आहे. आरोग्य प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून आरोग्य मंत्री विश्‍वजीत राणे यांनी वॉर्डनला कारणे दाखवा नोटीस बजावून पाच विद्यार्थ्यांची हकालपट्टी करण्याचा आदेश दिला आहे.

गेल्या महिन्याभरापासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असलेले गोवा वैद्यकीय महाविद्यालय आता नव्या गंभीर प्रकरणामुळे वादात सापडले आहे. या वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वसती गृहात प्रतिबंधित अमली पदार्थ असलेला गांजा सापडल्याने खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी या वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची होऊन प्रचंड गदारोळ झाला होता. त्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने येथील सुरक्षा व्यवस्था कडक करत जागोजागी सुरक्षा रक्षक तैनात केले होते. यातील एका सुरक्षा रक्षकाला तिसऱ्या मजल्यावर असलेल्या शौचालयामध्ये गांजाची पाकिटे आढळली. संबंधित सुरक्षा रक्षकाने हा गांजा वस्तीगृहाचे वॉर्डन डॉ. जेलिओ डिमेलो यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर ही बाब डॉ. डिमेलो यांनी डीन डॉ. बांदेकर यांच्या निदर्शनास आणून तिसऱ्या मजल्यावरील प्रशिक्षणार्थी डॉक्टर ओस्लीन वाझ, स्टिफन कुलासो, राहुल थळी, मनोज चौधरी आणि कॅरल मेरी शाजू यांच्याकडे चौकशी करून झडती घेतली असता, त्यांच्याकडे गांजा आढळून आला.

GMC
दोन दिवसांत 50 वाहनचालकांवर कारवाई

चौकशीवेळी हे सर्वजण डॉक्टर दारूच्या नशेत आणि एका महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरासोबत नको त्या अवस्थेत आढळून आले. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार अत्यंत गंभीर असल्याने डीन डॉ. बांदेकर यांनी संबंधितांच्या विरोधात आगशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून या सर्वांची महाविद्यालयाच्या वसतीगृहातून हकालपट्टी केली. या प्रकारामुळे एकप्रकारे आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे वेशीवर टांगले गेले आहेत.

आरोग्य प्रशासनाने ही घटना गंभीरपणे घेत गोमेकॉ वसतीगृहाचे वॉर्डन डॉ. डिमेलो यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. संस्थेच्या परिसरात अशा प्रकारच्या गंभीर गोष्टी कोणत्याही प्रकारे खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे आरोग्य मंत्री विश्‍वजीत राणे यांनी स्पष्ट केले आहे.

संशय कसा आला?

गेल्या महिनाभरापासून वसतीगृहातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा धिंगाणा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चार विद्यार्थ्यांवर कारवाई करत त्यांची महाविद्यालयातून हकालपट्टी करून पुढील तीन महिने त्यांना महाविद्यालयात येण्यास प्रतिबंध केला आहे. याचीच पुनरावृत्ती तीन दिवसांपूर्वी घडल्याने आरोग्य प्रशासन पुन्हा खडबडून जागे झाले. त्यांनी बंदोबस्तासाठी असलेल्या सुरक्षा रक्षकांची वाढ केली आणि निगराणी वाढवली. यादरम्यानच्या काळात यातील एका सुरक्षा रक्षकाला तिसऱ्या मजल्यावर गांजा आढळला. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले.

मुलांच्या वसतीगृहात महिला डॉक्टर

महाविद्यालय परिसरात महिला डॉक्टर आणि पुरुष डॉक्टर प्रशिक्षणार्थ्यांची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे. शिवाय परस्परांच्या वसतीगृहात जाण्यासाठी पूर्णत: प्रतिबंध आहे. असे असतानाही मुलांच्या वसतीगृहात महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टर आढळली. हे सर्वजण दारूच्या नशेत बेधुंद आणि नको त्या अवस्थेत होते. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्यांची चौकशी आणि तपासणी केली असता त्यांच्याकडे मद्य आणि गांजा आढळला. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागून ते चव्हाट्यावर आले.

याप्रकरणी गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या प्रशासनाने आगशी पोलिसांत तक्रार केली असता, तक्रार दाखल करून घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. अखेर आरोग्य सचिवांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर पोलिसांनी ही तक्रार दाखल करून घेतली, अशी माहिती डीन डॉ. बांदेकर यांनी दिली. त्यामुळे या प्रकरणातील पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे आढळून येत आहे.

GMC
Top 5 Goa News | गोंयच्यो 5 मुखेल खबरो

दरम्यान गोवा वैद्यकीय महाविद्यालय हे राज्यातील रुग्णांच्या सेवेसाठीचे अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. अशा ठिकाणी गंभीर स्वरूपाच्या घटना घडत असतील, तर ही बाब निश्‍चितच आक्षेपार्ह आहे. म्हणून संबंधित पाच प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची (इंटर्न) हकालपट्टी करण्याचे आदेश दिले आहेत, तर संबंधित वॉर्डनना कारणे दाखवा नोटीस बजावून या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिल्याचं आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी स्पष्ट केलं आहे.

दुसरीकडे या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून आगशी पोलिस स्थानकात तक्रार दाखल करून घेतली आहे. तसेच अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असता, मुलांच्या वस्तीगृहातील शौचालयात गांजा मिळून आला आहे. याशिवाय मुलांच्या वस्तीगृहातील वॉर्डनने स्वतंत्र तक्रार दाखल केली असून याची चौकशी सुरू आहे, असं आगशीचे पोलीस निरीक्षक तुळशीदास नाईक यांनी स्पष्ट केलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com