Goa Crime News: तीन महिन्यांपूर्वी नुवे येथील समंथा फर्नांडिस (वय 30वर्षेे) हिचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात आज मायणा-कुडतरी पोलिसांनी तिची सासू पॅट्रोसिना फर्नांडिस हिच्याविरोधात भादंसंच्या 304 (ब) कलमाखाली हुंडाबळीचा गुन्हा नोंद केला आहे.
ही दुर्घटना 30 ऑगस्ट रोजी घडली. त्यावेळी ‘हुंड्यासाठी सासूने केलेला छळ असह्य झाल्यानेच समंथाने आत्महत्या केली असून सासूविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करावा’, अशी मागणी समंथाच्या आईने केली होती. तसेच मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, असा इशाराही दिला होता. मागच्या तीन महिन्यांपासून समंथाचा मृतदेह शवागारातच आहे. या प्रकरणाचा दैनिक ‘गोमन्तक’ने सतत पाठपुरावा केला होता.
30 ऑगस्ट रोजी स्वत:ला जाळून घेत समंथाने आयुष्य संपवले होते. समंथाच्या आईने हुंड्यासाठी सासूकडून मुलीचा छळ केला जात असल्याचा आरोप केला होता. कुटुंबीयांनी तिचा मृतदेहही स्वीकारला नव्हता. आता तीन महिन्यांनंतर मायणा-कुडतरी पोलिसांकडून सासू पॅट्रोसिना फर्नांडिस हिच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
मूळ सां जुझे द अरियाल येथील समंथाचा सात वर्षांपूर्वी नोएल याच्याशी विवाह झाला होता. या दाम्पत्याला चार वर्षांची एक मुलगी आहे. नोएल परदेशात कामाला असतो, तर समंथा अन् तिची मुलगी सासूसोबत नुवे येथे राहात होती. समंथाची आई ॲना मारिया डायस यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ‘हुंड्यासाठी सासू समंथाचा सतत छळ करत होती. समंथाने माहेरी हा प्रकार सांगितला होता. सततच्या छळाला कंटाळून अखेर ३० ऑगस्ट २०२३ या दिवशी समंथाने स्वतःला पेटवून घेतले. यात ती गंभीर जखमी झाली होती. उपचारासाठी तिला गोमेकॉत दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.
याप्रकरणी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला नव्हता. त्यामुळे डायस यांनी समंथाचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हापासून तिचा मृतदेह शवागारातच होता. याप्रकरणी डायस यांनी दक्षिण गोवा जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन सादर केले.
त्यापूर्वी मुख्य सचिव, गृह खाते, पोलिस महासंचालक व मडगाव पोलिस उपअधीक्षकांना त्यांनी निवेदन दिले होते.
याप्रकरणी मडगावच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी चौकशी करून अंतिम निवाडा दिला. त्यानुसार, सासू पॅट्रोसिना हिच्याविरोधात हुंड्यासाठी छळ करत सुनेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
मुलीलाही अंगावर दिले चटके
आत्महत्येच्या घटनेच्या एक दिवस आधी, म्हणजे २९ ऑगस्ट रोजी तिने माहेरी आईला फोन करून सासू पॅट्रोसिना हिने आपल्या मुलीलाही चटके दिले, तसेच याची माहिती कोणाला दिल्यास मारण्याची धमकीही दिली होती. या प्रकारावरून ३० रोजी सासू आणि सुनेची भांडणे झाली होती. यावेळी सासूने समंथाला मारहाण करण्यास सुरुवात केली. यात समंथाने तिला बाजूला ढकलून देत स्वतःला पेटवून घेत जीवन संपवले.’
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.