

डिचोली: दिवाळी तोंडावर आली असतानाच परतीच्या पावसाने जोर धरल्याने डिचोलीतील दिवाळी बाजारावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सलग दोन दिवस डिचोलीसह परिसरात पर्जन्यवृष्टी झाली. सोमवारी सायंकाळी पावसाचा जोर अधिक असल्याने दिवाळी साहित्य विक्रेत्यांची तारांबळ उडाली.
पाऊस सुरू होताच स्टॉल बंद करून माल सुरक्षित ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली. दिवाळीनिमित्त बाजारात आकाशकंदील आणि अन्य साहित्याची विक्री सुरू झाली असून, खरेदीसाठी ग्राहकांचीही लगबग आहे. मात्र, पुढील दोन-तीन दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास बाजारातील उलाढालीवर परिणाम होण्याची भीती व्यापारी व्यक्त करीत आहेत.
दरम्यान, वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे गावकरवाडा-मुळगाव येथे एकनाथ परब यांच्या घरावर आंब्याच्या झाडाची फांदी कोसळली. त्यामुळे छपरावरील कौले फुटून नुकसान झाले. सुदैवाने अन्य अनर्थ घडला नाही. डिचोली शहरासह मुळगाव, सर्वण, म्हावळींगे, कुडचिरे, मये, कारापूर आदी भागांत नरकासुर प्रतिमा तयार करण्याची लगबग सुरू आहे.
युवक मंडळांसह बच्चे कंपनीही रात्री जागवून काम करीत आहे. काही मंडळांनी भव्य आणि हालत्या प्रतिमा उभारण्यावर भर दिला आहे. मात्र, पावसामुळे तयारीत अडथळे येत आहेत. नरकासुर भिजू नयेत म्हणून प्लास्टिकचे आच्छादन आणि सुरक्षित जागांची व्यवस्था केली जात आहे. विविध ठिकाणी नरकासुर स्पर्धांचे आयोजनही केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.