म्हापसा
फडके हे गोवा क्रिकेट असोसिएशनचे माजी सरचिटणीस असून विधानसभेच्या मागील सार्वत्रिक निवडणुकीत ते म.गो. पक्षाचे म्हापसा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार होते. त्यांनी आतापर्यंत तीन हजार मास्कचे वाटप केले आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी म्हापशाचे पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर व वाहतूक पोलिस निरीक्षक तुषार वेर्णेकर यांच्याकडे मास्क सुपूर्द केले. नियमभंग करणाऱ्यांना ते मास्क देण्याची विनंती फडके यांनी त्यांना केली आहे.
दरम्यान, अन्य समाजघटकांनाही त्यांनी मास्कचे वाटप केले आहे. यापुढे म्हापशातील काही प्रमुख ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
समाजात ‘कोविड १९’चे मोठ्या प्रमाणात संक्रमण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे सरकारने बंधनकारक केले आहे. मात्र, काहीजण मास्कचा वापर न करताच सर्वत्र फिरत असतात. नियमभंग करणाऱ्या अशा व्यक्तींकडून पोलिस, वाहतूक पोलिस इत्यादी शासकीय यंत्रणांचे कर्मचारी आर्थिक दंड वसूल करून सोडून देतात, परंतु नियमभंग करणाऱ्या त्या व्यक्तींपैकी यदाकदाचित एखादा कोविडबाधित असल्यास त्या रोगाचे संक्रमण इतर माणसांना होण्याचा धोका आहे, ही शक्यता गृहीत धरून फडके यांनी कल्पकतेने या लक्षवेधक उपाययोजनेचे नियोजन तसेच संयोजनही केले आहे. यासाठी त्यांना मोठ्या रकमेची पदरमोडही करची लागली आहे.
यासंदर्भात विचारले असता फडके म्हणाले, शासकीय नियम तोडणाऱ्यांना पोलिसांनी दंडाचे चलन दिले म्हणून पुरेसे नाही, तर त्यांना तिथल्या तिथेच नियम समजावून सांगणे व मास्क देणे अत्यावश्यक आहे. जेणेकरून त्यांना स्वत:च्या कृत्याबद्दल शरम वाटायला हवी.
मास्क न वापरण्याची कळत नकळत घडलेली चूक संबंधितांना भावनात्मक आवाहन करून नजरेस आणून दिल्यास ते शल्य त्यांच्या मनाला सतत बोचत राहील व त्यामुळे त्यापैकी बहुतेकजण तशी चूक करण्याचे प्रकर्षाने टाळतील. संबंधितांकडून फक्त दंडात्मक रकमेची वसुली केल्यास त्यांच्याकडून चुकीची पुनरावृत्ती होईल हे साहजिकच आहे. म्हणूनच त्यांचे थोडेफार उद्बोधन व समुपदेशन करणे क्रमप्राप्त आहे.
- विनोद ऊर्फ बाळू फडके, म्हापसा
संपादन - यशवंत पाटील
|