तेव्हा कुठे असतात हे अबकारी खाते?
निवडणूक जाहीर होताच अबकारी खाते निद्रेतून जागे होत असल्याचे गोवा भर चित्र आहे. दारू तीच अड्डा तोच आणि अबकारी निरीक्षक पण तेच. मग निवडणूक काळात बेकायदेशीर दारू पकडल्याचे नाटक कसले करता? केवळ प्रसिद्धीसाठी की निवडणूक काळात युद्ध जिंकले म्हणून शाबासकी मिळविण्यासाठी? निवडणूक संपताच परत त्याच अड्डयावर बेकायदेशीर दारू विक्री केली जाते हे ठाऊक असूनसुद्धा अबकारी खाते झोपेचे सोंग घेत असतात. मग निवडणूक काळात दहा बारा हजार रुपयाची दारू पकडून काय भीम पराक्रम केल्यासारखे फोटो वर्तमानपत्रातून छापून आणतात. नागरिकही त्याच गावचे आहे. ज्या गावात निवडणूकीपूर्वी आणि नंतरही बेकायदेशीर दारू विक्री केली जात असते. अशी खरमरीत टीका नागरिक करू लागले आहे, तेव्हा अबकारी अधिकाऱ्यांनो सावधान. ∙∙∙
पणजीमध्ये काय घडते?
पणजी मतदारसंघातील (Panjim Constituency) परिस्थिती भाजपला फारशी धोक्याची वाटत नाही. ज्यावेळी लोक मद्यालये आणि बाजारपेठेत उमेदवार धोक्यात आल्याची चर्चा करतात तेव्हा परिस्थिती खरोखरच गंभीर बनल्याचा निष्कर्ष काढला जातो. सध्या पणजीमध्ये परिस्थिती तशीच आहे. अनेक बारमध्ये बसून लोक सत्ताधारी उमेदवाराचा पराभव असल्याचे अटळ असल्याचे आता छातीठोकपणे बोलू लागले आहेत. कोणत्याही बारमध्ये जा आमची पाच मते आहेत, दहा मते आहेत आणि आम्ही ती योग्य व्यक्तीला टाकणार आहोत, असे लोक ठणकावून सांगतात. त्यात केवळ सुशिक्षित मतदारच नव्हे, तर अल्पसंख्याकही असतो. याचा अर्थ ही निवडणूक बाबूश मोन्सेरात (Babush Monserrat) विरोधात गेली असे मानायचे का? ∙∙∙
मनोहर पर्रीकरांच्या पावलावर पाऊल!
मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) कधी आपल्याच मतदारसंघात अडकून पडले नाहीत. त्यांचा पणजी मतदारसंघ निश्चितच दोलायमान असायचा, परंतु पर्रीकरांना त्याची फिकीर वाटली नाही. ते व्यूहरचना करण्यात तरबेज होते आणि सत्तेची दोरीही हातात असल्याने ते समोरच्याला कसे वाकवायचे याचे गणित योग्यरित्या जुळवायचे. त्याचा परिणाम म्हणजे ते अनेक ठिकाणी प्रचार करायला मोकळे व्हायचे आणि एकूणच सर्व उमेदवारांना ते आपल्या प्रचारासाठी आलेले हवे असायचे. प्रमोद सावंत यांचेही सध्या तसेच झाले आहे. काल ते फातोर्डामध्ये जाऊन दामू नाईक यांचा वैयक्तिक जाहीरनामा प्रकाशित करून आले. दामूंना सध्या मुख्यमंत्र्यांची गरज आहेच. ∙∙∙
(Discussion on Goa Assembly elections)
भाजपातील चिंतेचे वातावरण
प्रत्यक्ष मतदानाला आता केवळ 12 दिवस राहिले असताना सत्ताधारी भाजपची ज्या मतदारसंघावर मदार होती, तेथील परिस्थिती बदलू लागली आहे. त्यामुळे भाजपातील धुरीण या मतदारसंघावर लक्ष ठेवून आहेत. सासष्टी तालुक्यावर फारसे लक्ष ठेवण्याची आवश्यकता नाही, हे सर्वांना मनोमन पटेल, परंतु अनेक खात्रीशीर मतदारसंघ यावेळी हातातून सुटू शकतात याची जाणीव पक्ष नेतृत्वाला झाली आहे. पणजीमध्ये उत्पल पर्रीकरांनी परिस्थिती गंभीर केली आहे. ताळगावमध्ये परिस्थिती आनंद घेण्यासारखी नाही. त्यामुळे बाबूश मोन्सेरात यांना दोन मतदारसंघ दिल्यास बार्देशातील आणखी काही मतदारसंघावर ते प्रभाव टाकू शकतील, अशी परिस्थिती नाही. दोन जागा निश्चितपणे जिंकून आणू शकतात, ते एकमेव नेते म्हणजे विश्वजीत राणे. इतर ठिकाणी भाजपचा हिशोब चुकू लागला आहे. त्यात उपमुख्यमंत्र्यांचा केपे त्यानंतर शेजारी कुडचडे, मांद्रे, डिचोली, मये, म्हापसा, हळदोणे, कुंभारजुवे, कुंकळ्ळी अशा मतदारसंघात भाजपची स्थिती दोलायमान बनली आहे. बार्देशमध्ये तर मायकल लोबो धुमाकूळ घालतोच आहे. ∙∙∙
काही दिवसातच काडीमोड
पौष महिन्यात ज्यांनी राजकीय सोयरीक जुळवली त्यांचा अवघ्याच दिवसांत काडीमोड होऊ लागला आहे. ज्यांनी मोठ्या अपेक्षेने वेगवेगळ्या पक्षांत प्रवेश केला होता, त्यांनी तडकाफडकी काडीमोड करण्याचा सपाटा लावला आहे. काणकोणा मतदारसंघातही काडीमोडाची लागण सुरू झाली आहे. एकेकाळी राज्याच्या राजकारणात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या वासू पायक गावकर यांचे पुत्र उदय गावकर यांनी तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गावडोंगरीचे बुजुर्ग सरपंच अशोक वेळीप यांनीही तृणमूलमध्ये प्रवेश केला. मात्र, सोयरीक करताना दिलेल्या वचनांचा भंग झाल्याने त्याचा काडीमोड झाला. आता नवीन सोयरीक करण्यास ते मोकळे झाले आहेत. कारण ही परंपरा राजकीय वारसदारांत चालू झाली आहे. ∙∙∙
बाबू आजगावकर सावधान!
शंभू कोंबातील विठ्ठल मंदिराजवळून जात असताना मोटू व पतलू दोघेही एकमेकाच्या कानात कुजबुजत असलेले पाहुन शंभूने आपले कान टवकारले.
मोटू - काल रात्री कामत साहेबांची बैठक कोंबात झाली.
पतलू - कुठे झाली?
मोटू - शिमग्याचा नारळ ठेवतात ना तिथे.
पतलू - कोणकोण होते?
मोटू - अरे माजी नगरसेवक जो बाबूचा प्रचार करतो त्याचे सर्व समर्थक होते. त्यात एनजीओ पण होता.
पतलू - त्याचे समर्थक इथे कसे?
मोटू - ते बाबू पाहून घेईल. आम्हाला काय. मात्र बाबूसाठी ही धोक्याची घंटा तर नसेल ना.
तोपर्यंत शंभू दूर पोहोचला होता व त्याला त्यांची पुढील चर्चा ऐकू येईनाशी झाली. ∙∙∙
धर्मेश सगलानी यांना मंत्रिपद जाहीर?
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या विरोधात साखळीत पुन्हा एकदा काँग्रेसने तगडा उमेदवार धर्मेश सगलानी दिल्याने या मतदारसंघात अटीतटीची झुंज बघायला मिळणार आहे. सगलानी यांनी सत्ताधारी भाजप व आमदार डॉ. सावंत यांच्या विरोधात साखळी पालिकेत दोन वेळा आपली सत्ता प्राप्त करून आपली शक्ती दाखवून दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व भाजप कार्यकर्ते सगलानी यांना कमी लेखण्याची चूक करत नाहीत व प्रचारातही कुठेच कमी पडणार नाहीत याची काळजीही घेत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस उमेदवार सगलानी यांच्या प्रचारासाठी साखळीत आले असता त्यांनी सगलानी यांना चक्क मंत्रिपद जाहीर केले. मुख्यमंत्र्यांचा पराभव करा तुमचा आमदार धर्मेश सगलानी मंत्री निश्चित होईल असे ते म्हणाले व काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला. ∙∙∙
अफवांचे पीक
निवडणूक प्रचार कार्यात मर्यादा आल्यानंतर विरोधकांना आता अफवांवर भर द्यावा लागतो. सांगेत तसेच झाले. सावित्री कवळेकर अर्ज भरणार नाही ही अफवा सर्वत्र पसरविली. तरीही अर्ज भरलाच. दोन दिवसांनी परत सावित्री अर्ज मागे घेणार अशी जोरदार अफवा पिकविण्यात आली. सावित्रीच्या निश्चयामुळे अफवा पसरविणारे दोन वेळा तोंडघशी पडले. वास्तविक हा अफवा निर्मिती करणाऱ्यांचा नैतिक पराभव आहे. मतदारांच्या म्हणण्यानुसार मी मी म्हणणारे एका महिला उमेदवाराला निकालापूर्वीच घाबरले आहेत. आता तिसऱ्यांदा अफवा पसरविताना विचार करूनच अफवा पसरवा. त्या अफवांची गोळाबेरीज सावित्री कवळेकर एकाच वेळी करणार याची आठवण ठेवा असा गर्भित इशारा सावित्री समर्थक देऊ लागले आहेत. ∙∙∙
स्वघोषित मुख्यमंत्री
निवडणुकीच्या प्रचारावेळी मतदारांना कोण कशी आमिषे दाखविल हे सांगता येत नाही. काही राजकीय पक्षांनी आपले मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार अजून जाहीरच केले नाहीत. मात्र, काहीजण स्वतःला मुख्यमंत्री घोषित करून मोकळे होतात. एमजीचे सुदिन ढवळीकर यांनी तशी घोषणा केल्यावर मडगावात दिगंबर कामतनीसुद्धा ही चाल खेळली. खारेबांद येथे प्रचार करताना म्हणे एका महिलेने नोकरीसाठी त्यांच्याकडे साकडे घातले. आपण मुख्यमंत्री झाल्यावर नोकरीचे काम करतो असे आश्र्वासन म्हणे त्या महिलेला दिले. ती महिला खूष. ∙∙∙
मतदारांनाच मंत्रिपदाची आमिषे!
उमेदवारांना मंत्रिपदाची आमिषे दाखविणे ठीक आहे, पण सत्ताधारी भाजपा तर चक्क उमेदवारांऐवजी मतदारांनाच मंत्रिपदाचे आमिष दाखवित असल्याने एक चर्चेचा विषय ठरला आहे. मांद्रेचे उमेदवार दयानंद सोपटे व डिचोलीचे उमेदवार राजेश पाटणेकर यांच्या प्रचाराला फिरताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आमदाराला नव्हे, तर चक्क मंत्र्यांना निवडून द्या असे जाहीर आवाहन मतदारांना करीत आहेत. निवडून येण्यापूर्वीच मंत्री ठरविले? दयानंद सोपटे विरोधात भाजपच्याच लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बंडखोरी केल्याने सोपटे यांची अडचण वाढली तर नसेल? डिचोलीत पाटणेकर यांचा निवडणुकीला उभे राहण्यास नकार असतानाही त्यांची मनधरणी करून उमेदवारी लादण्यात आली. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.