Loksabha Election Result : फोंड्यात चर्चांना उधाण; ‘लोकसभा’ निकालाची उत्‍कंठा

Loksabha Election Result : फोंडा तालुक्यातील चारही मतदारसंघांपैकी फोंडा, शिरोडा, मडकई हे मतदारसंघ दक्षिण गोव्यात येत असून प्रियोळ हा एकमेव मतदारसंघ उत्तरेत येत आहे.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 Dainik Gomantak

मिलिंद म्हाडगुत

Loksabha Election Result :

फोंडा, लोकसभा निवडणुकीचा निकाल आता हाकेच्या अंतरावर येऊन ठेपल्यामुळे फोंड्यात याबाबतच्या चर्चांना उधाण यायला सुरवात झाली आहे. खासकरून फोंडा मतदारसंघात उमेदवारांना मिळू शकणाऱ्या आघाडीवर अनेकांच्या नजरा आहेत.

फोंडा तालुक्यातील चारही मतदारसंघांपैकी फोंडा, शिरोडा, मडकई हे मतदारसंघ दक्षिण गोव्यात येत असून प्रियोळ हा एकमेव मतदारसंघ उत्तरेत येत आहे. या चारही मतदारसंघांतून भाजपला आघाडी मिळण्याची दाट शक्यता वर्तविली जात असली तरी ती किती यावर सध्या मतभिन्नता दिसत आहे.

फोंड्यात यावेळी प्रथमच विद्यमान आमदार कृषिमंत्री रवी नाईक, माजी खासदार नरेंद्र सावईकर, भाजपचे फोंड्याचे गटाध्यक्ष विश्‍वनाथ दळवी यांनी एकत्रित प्रचार केल्यामुळे यंदा फोंड्यातून भाजपला भरघोस आघाडी मिळण्याची शक्यता दिसत आहे.

Loksabha Election 2024
Kala Academy Goa : कला अकादमीचा वाढीव खर्च वादाच्या भोवऱ्यात; विरोधकांकडून भ्रष्टाचाराचा आरोप

त्याचबरोबर शेवटच्या क्षणी भाजपकरिता प्रचाराच्या रिंगणात उतरलेले मगो पक्षाचे डॉ. केतन भाटीकर यांच्यामुळे भाजप या मतदारसंघावर वर्चस्व प्राप्त करू शकतो, असा होरा राजकीय विश्‍लेषक व्यक्त करत आहेत. मागच्या वेळी रवी नाईक कॉंग्रेसमध्ये असूनही भाजपने फोंड्यातून ३,८८० मतांची आघाडी घेतली होती; पण यावेळी ते भाजपात असल्यामुळे ही आघाडी वाढायला हवी, असा तर्क राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

दुसऱ्या बाजूने कॉंग्रेसचे राजेश वेरेकर यांचा ‘वन मॅन शो’ किती रंग आणतो यावरही अनेकांच्या नजरा खिळून आहेत. यावेळी राजेशनी एक हाती लढा दिल्यामुळे जी काही मते कॉंग्रेसला पडतील ती राजेशच्या यशाची नांदी ठरू शकेल, यात संशयच नाही, असे काही राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.

रवी नाईक यांना विश्‍वास!

एका बाजूने निकालाबाबत तर्कवितर्क सुरू झाले असताना फोंड्याचे आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक यांना फोंड्यातून आघाडी मिळेल असा विश्‍वास आहे. फोंड्यात एकूण २४,००० मतदान झाले असून त्यापैकी १६,००० च्या आसपास मते भाजपच्या पारड्यात पडू शकतील व कॉंग्रेसला ८००० मतांवरच समाधान मानावे लागेल, असे मत मंत्री रवी नाईक व्यक्त करत आहेत.

त्यांचे म्हणणे कितपत खरे ठरते हेही ४ जूनलाच कळणार आहे.

फोंड्यातील नेत्यांचे भवितव्य निकालावर

फोंडा मतदारसंघ हा तसा गुंतागुंतीचा असल्यामुळे भाजपश्रेष्ठींचे या मतदारसंघावर बारीक लक्ष आहे. त्यामुळे बुथनुसार किती मते पडतात याचाही अभ्यास केला जाईल, असे फोंड्याच्या एका स्थानिक नेत्याने सांगितले. यामुळेच भाजपच्या गोटात सध्या निकालाच्या उत्कंठेबरोबरच धाकधूकही आहे.

नगरपालिकेच्या व पंचायतीच्या कोणत्या प्रभागातून किती मते पडू शकतात यावर सध्या विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. एकंदरीत या निकालावर फोंड्यातील अनेक राजकीय नेत्यांचे भवितव्य अवलंबून असून त्या निकालानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीची दिशा ठरू शकेल.

एकंदरीत चार दिवस दूर असलेल्या निकालाने अनेकांची झोप उडविली असून ४ जूनला काय होणार यावर सर्वांची नजर आहे. फोंड्यात कोणता मोहरा पुढे जातो व कोणता मोहरा ‘चेकमेट’ होतो याचे उत्तर ४ जूनलाच मिळू शकेल, एवढे मात्र खरे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com