Goa Tourism: पर्यटन खात्यात ठाण मांडून बसलेल्या संचालकाची दमणला पाठवणी

निखिल देसाई हे पर्यटन खात्याच्या संचालकपदी बरीच वर्षे ठाण मांडून बसले होते. त्यांची आता दमणला बदली झाली आहे.
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Tourism: निखिल देसाई हे पर्यटन खात्याच्या संचालकपदी बरीच वर्षे ठाण मांडून बसले होते. त्यांची आता दमणला बदली झाली आहे, तरी ते पदाचा ताबा सोडत नसल्याने सुदीप ताम्हणकर यांनी ‘आरटीआय’मधून पोलखोल केली होती.

त्यामुळे देसाई यांच्यासह चौघाजणांना आता ‘आयएएस’च्या प्रशिक्षणासाठी मसुरीला जावेच लागले.

आता त्या पर्यटन खात्याच्या रिकाम्या जागेवर सरकारने नवीन आयएएस रवी मल अभिषेक यांची नियुक्ती केली आहे. अभिषेक यांच्याकडे आयडीसीच्या व्यवस्थापक पदाचा ताबा आहे. निखिल देसाई यांनी अनेक वर्षे पर्यटन खात्यात वेगवेगळे मुद्दे सांभाळले होते.

या खात्यात त्यांना रस होता आणि कामगिरीही चांगली बजावली होती. त्यामुळे कोणीही मंत्री येवो, निखिल देसाई यांच्याशिवाय त्यांची डाळ शिजत नसे. आता आयएएस बनल्यावर थोडा काळ दमणमध्ये काढून ते लवकरच गोव्याच्या हद्दीत परततील, याबद्दल प्रशासनात आताच चर्चा सुरू झाली आहे.

दुसऱ्या बाजूला कर्तबगार अधिकारी म्हणून गणले गेलेले स्वप्नील नाईक हे अरुणाचल प्रदेशमध्ये अडकून पडले आहेत. तेथे नवीन विमानतळ उभारून दिल्याबद्दल अरुणाचल प्रदेश सरकारने त्यांना सर्वांत मोठा पुरस्कार जाहीर केला आहे.

Goa Tourism
Goa PSI Recruitment Scam: उपनिरीक्षक भरती घोटाळा; गृह मंत्रालयाकडून दखल

कारवाईचे गौडबंगाल

कदंब पठारावर झालेल्या बेकायदा डोंगरकापणी प्रकरणात ‘एनजीपीडीए’चे सदस्य सचिव आर. के. पंडिता यांची बदली करण्यात आली आहे.

आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, एनजीपीडीए अध्यक्षपद जेनिफर यांच्याकडे आहे आणि तिचा कारभार बाबूश मोन्सेरात सांभाळतात. बाबूश मोन्सेरात यांच्या नकळत ही डोंगरकापणी झाली आहे, हे शक्य नाही.

या डोंगरकापणीच्या बाजूला ‘व्ही-2 मॉल’ आला आहे. शिवाय बायंगिणी व्हॅलीमध्येही बरीच बांधकामे झाली आहेत. सध्या हा भाग विकास क्षेत्रात येतो.

तसेच बाबूश आणि विश्‍वजीत यांची मैत्री पाहता ही कारवाई कशी काय झाली, याची जोरदार चर्चा प्रशासनात सुरू आहे.

सगळ्यांचेच संगनमत असल्यामुळे पंडिता यांनी डोंगर कापणीकडे दुर्लक्ष केले होते. दुर्दैवाने रायबंदर - चोडण फेरीबोटीतून ही डोंगर कापणी नजरेस भरते.

त्यामुळेच जनक्षोभ उसळला. नाईलाजाने सरकारला कारवाई करणे भाग पडले. कदाचित पंडिता महिन्याभरात आपल्या मूळ जागी परत येतील.

Goa Tourism
Kadamba: पणजी, मडगावला जायचंय? वाट पहावी लागेल... कदंबकडे बसची कमतरता, बस स्थानकावर रांगच रांग

‘फूड कोर्ट’चे एप्रिल फूल

‘शीताच्या आधी मीठ खाऊ नये’, असे म्हणतात. कुडचडेचे आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांचा या उक्तीवर विश्र्वास नसावा. असे वाटायचे कारण म्हणजे, कुडचडे येथे काही दिवसांपूर्वी उदघाटन केलेला फूड कोर्ट.

सुमारे साडे पाच कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या फूड कोर्टचे मागच्या आठवड्यात काब्राल यांनी थाटात उदघाटन केले. पण त्याचा ताबा पालिकेला दिला तो मागच्या शुक्रवारी. अजून या फूड कोर्टमध्ये एकही दुकान हलविलेले नाही.

आता म्हणे, सर्व सोपस्कार पूर्ण केल्यानंतर 1 एप्रिलला हा फूड कोर्ट पूर्ण जोमाने सुरू होणार आहे. म्हणजे कुडचडे येथील रस्त्यावर खाद्य पदार्थ विकणाऱ्यांना केलेले हे एक प्रकारचे एप्रिल फूलच म्हणावे लागेल.

खरे तर ‘वरातीमागून घोडे’ हा वाक्प्रचार यापूर्वी ऐकला होता. पण येथे तर काब्राल आणि कंपनीने लग्नापूर्वीच वरात काढली, असेच वाटते.

युरीबाब वालोर!

कामाचे श्रेय घेण्यासाठी राजकारणी नेहमीच पुढे असतात. मात्र, न झालेल्या कामाचे अपयश ते आपल्या खात्यात जमा करण्यात कचरतात.

चांदर गावातून जाणाऱ्या रस्त्याचा राज्य महामार्ग दर्जा काढून मुख्य जिल्हा रस्ता दर्जा बहाल केल्याबद्दल कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी सरकारचे आभार मानले आहेत.

हे काम युरीमुळे झाल्याचा दावा त्यांचे समर्थक करतात, तर राज्य मार्गाचा दर्जा रद्द करून जिल्हा रस्त्याचा दर्जा देण्याचे श्रेय माजी आमदार क्लाफास डायस आणि भाजप सरकारला यांना जाते, असे डायस समर्थक दावा करतात.

श्रेय कोणीही घ्या, युरीसाहेब गेली अनेक वर्षे कुंकळ्ळी बगल मार्गाचे घोंगडे भिजत पडले आहे त्यावर उपाय काढा ना. जनतेला हवा त्या बाजूने बगल रस्ता सरकारने मान्य केला तर युरीला वालोर, असे कुंकळ्ळीकर म्हणत आहेत. युरीबाब आहे हिम्मत?

Goa Tourism
Old Goa Illegal Constructions: जुने गोवेतील बेकायदा बांधकामाविरोधात राष्ट्रीय नेत्यांची मदत घेणार; तृणमूल काॅंग्रेसचा लढा

...पण महागाईचे काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झेरोधा कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कामत यांच्या ट्विटला थेट प्रतिसाद दिला आहे. कामत यांनी आहारात भरड धान्याचा समावेश केल्याचे म्हटले आहे. त्यावर कामत यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले की, ‘हे वाचून छान वाटले.

आपण सर्वजण ‘श्री अन्न’ हे आपल्या जीवनाचा भाग बनवूया.’ सध्या भरड धान्याच्या वापराविषयी पंतप्रधानांनी मोठी मोहीम सुरू केली आहे, ही समाधानाची बाब असली, तरी सर्वसामान्यांना दैनंदिन जीवनामध्ये महागाईला तोंड द्यावे लागते, त्याविषयी त्यांनी काही बोलले असते, तर बरे झाले असते.

कारण कोरोना महामारीनंतर सर्वच जीवनावश्‍यक वस्तूंच्या किमती हाताबाहेर गेल्या आहेत. यात मजूर, कामगार वर्गाचे प्रचंड हाल होत आहेत. अनेकांना रोजगारासाठी विस्थापित व्हावे लागत आहे.

कुटुंबातील लोकांची दोन वेळेला हाता-तोंडाची भेट होताना नाकीनऊ आली आहे. अशा वेळी लोकांना दोन वेळचे जेवण सुलभपणे कसे मिळेल, याचा विचार होणे अगत्याचे आहे, अशा प्रतिक्रिया समाज माध्यमांवर उमटत आहेत.

Goa Tourism
Goa Taxi: टॅक्सी चालकांच्या आंदोलनाला यश; 'मोपा’वर 1,300 जणांना मिळणार व्यवसाय

गूढ वाढले

ओव्हरे-पाळोळे येथे जे प्रेमीयुगुल समुद्रात बुडून मरण पावले, त्या घटनेचे वेगवेगळे कंगोरे आता दिसू लागले आहेत. या घटनेच्या आधी त्यांचा एका रशियन युवकाशी वाद झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतरही काही महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा होत गेला. ही घटना मंगळवारी उत्तर रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली, अशी माहिती पुढे येत आहे.

रात्री उशिरापर्यंत किनाऱ्यावर मौजमजा केल्यानंतर आधी सुप्रिया समुद्रात उतरली. ती गटांगळ्या खाऊ लागल्याने काही परदेशी पर्यटक तिच्या मदतीसाठी धावून गेले. तोपर्यंत तिचा मित्र विभू तिच्याजवळ पोचला. त्याने तिला वाचविण्यासाठी प्रयत्न केला.

पण तोही थोड्या वेळाने समुद्रात दिसेनासा झाला, अशी माहिती काही परदेशी पर्यटकांनी दिली. आश्‍चर्याची बाब म्हणजे, रविवारी ओव्हरे येथे या प्रेमी युगुलाने तीन हॉटेले बदलली.

ती का बदलली, याचे गूढही उकललेले नाही. आता त्यांचा शवविच्छेदन अहवालही आला असून त्यात त्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे.

अनेक गूढ किस्से मागे सोडून गेलेल्या या प्रेमी युगुलाच्या मृत्यू प्रकरणामुळे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. आता पोलिस तपासात काय निष्पन्न होतेय, याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com