

पणजी: दोनापावल येथे अतिवेगाने धावणाऱ्या आलिशान कारच्या धडकेत दीक्षा पारवडकर या तरुणीचा मृत्यू झालेल्या प्रकरणावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. या अपघातातील वाहन नोंदणीपूर्वीच ग्राहकाला देण्यात आल्याचे सिद्ध झाल्यानंतर वाहतूक खात्याने वेर्णा येथील बावरिया मोटर्सचा व्यापार परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला होता. मात्र, परवान्यावर कारवाई झाल्यानंतरही पुणे शाखेमार्फत वाहने आणून त्यांची तात्पुरती नोंदणी करून विक्री सुरू असल्याचा गंभीर आरोप खासगी बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी केला आहे.
पर्वरी येथे पत्रकार परिषदेत बोलताना ताम्हणकर यांनी वाहतूक खात्याच्या काही अधिकाऱ्यांवर थेट निशाणा साधला. मडगाव, वास्को (Vasco) आणि म्हापसा येथील वाहतूक कार्यालयांमधील काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच ही प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. परवाना रद्द करणारे तेच खाते आता तात्पुरते परवाने देऊन वाहनविक्रीस परवानगी देत असल्याचे त्यांनी म्हटले.
ताम्हणकर यांच्या मते, ज्या वाहन विक्रेत्यांच्या शाखा गोव्यात नाहीत, त्यांनाच तात्पुरत्या नोंदणीची सवलत देण्याची तरतूद आहे. मात्र, बावरिया मोटर्सने पुण्यातील शाखेतून वाहने आणून ती गोव्यात विकण्याची पद्धत सुरू ठेवली आहे. कायद्याचा सोयीस्कर अर्थ लावून नियमांना बगल दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
दीक्षा पारवडकर हिला न्याय मिळणे आवश्यक असल्याचे सांगताना ताम्हणकर म्हणाले की, अशा प्रकारचे परवाने मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपल्या कुटुंबीयांचा विचार करून निर्णय घ्यावा. कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारीच नियमांची पायमल्ली करू लागले तर सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास डळमळीत होतो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
दोनापावल येथील घटना हा केवळ अपघात (Accident) नसून पैशाच्या आणि बेफिकिरीच्या माजातून घडलेला सदोष मनुष्यवध असल्याचा दावा सुदीप ताम्हणकर यांनी केला. या संदर्भात पोलिसांना निवेदन सादर करण्यात आले असून संबंधित वाहनचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दुसऱ्यांच्या कुटुंबाचा आधार हिरावून घेणाऱ्यांना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.