मडगाव: 2002 साली स्वतः भाजप सोडून काँग्रेस पक्षात जाणारे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत याना पक्ष बदलूवर बोलण्याचा कसला अधिकार आहे असा सवाल भाजपचे प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी करतानाच 2022 च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही दिगंबर कामत यांचा नक्कीच मोरया करू असा इशारा दिला. (Digambar Kamat has no right to speak on party change)
आज फातोर्डा मतदारसंघात राजू रावणे व कल्पना देसाई यांनी आपल्या समर्थकासह भाजपात प्रवेश केला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना तानावडे यांनी हा सवाल केला. दिगंबर कामत यांनी या विषयावर बोलणे म्हणजे 'चोरांच्या उलट्या बोंबा' असेच म्हणावे लागेल असे ते म्हणाले.
काल (13 जुलै) गोवा विधानसभेचे दिवंगत सभापती डॉ. काशीनाथ जलमी यांच्या जयंती दिनी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी गोव्यातील राजकारणातील आयाराम गयाराम संस्कृतीवर टीका करताना अशी पक्षांतरे बंद होण्याची गरज असून येत्या विधानसभा अधिवेशनात आपण त्यासाठी खासगी विधेयक आणणार असे जाहीर केले होते.
यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना तानावडे म्हणाले, गोव्यात भाजपातून पक्षांतर करणारे पाहिले आमदार दिगंबर कामत होते. 1994 साली ते काँग्रेस मधून भाजपात येऊन आमदार झाले. सतत तीनवेळा ते भाजपच्या उमेदवारीवर निवडून आले. पण 2002 साली भाजपात आपली घुसमट होते असे सांगत पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. मात्र त्यांच्या या घुसमटीतून 2022 साली आम्ही त्यांना मुक्त करू असे ते म्हणाले.
कामत यांनी भाजपचा केलेला विश्वासघात हा त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या जिव्हारी लागला होता. कामत याना एकदा तरी निवडणूकीत हरविण्याचे त्यांचे स्वप्न होते. यावेळी आम्ही त्यांचे हे स्वप्न पूर्ण करू असे ते म्हणाले.
त्यापूर्वी झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी गोव्यात प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार चालू आहे त्या सरकारचे काम पाहूनच लोक भाजपात प्रवेश करू लागले असून 2022 मध्येही गोव्यात भाजपचेच सरकार सत्तेवर येईल असा विश्वास व्यक्त केला. विजय सरदेसाई हे फातोर्डात आमदार असताना गुंडगिरी वाढली असून ती निपटून काढण्यासाठी दामू नाईक हे पुन्हा फातोर्डाचे आमदार झाले पाहिजेत असे सांगत त्यासाठी भाजप कार्यकर्त्यानी एकजुटीने काम करावे असे आवाहन त्यानी कार्यकर्त्यांना केले. यावेळी दामू नाईक हेही हजर होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.