खरी कुजबुज: धारगळ पंचायतीसमोर आव्हान

Khari Kujbuj Political Satire: वादग्रस्त वक्तव्ये करण्यात चर्चेत असलेले प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी काही महिन्यांपूर्वी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर ख्रिस्ती बांधव संतप्त झाले होते व विरोधकांनीही त्यावर तोंडसुख घेतले होते.
Khari Kujbuj
Khari Kujbuj Dainik Gomantak
Published on
Updated on

धारगळ पंचायतीसमोर आव्हान

धारगळ गावात आयोजित सनबर्न महोत्सवामुळे गावाच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा पंचायतीने व्यक्त केली आहे. मात्र, स्थानिकांच्या मते, महोत्सवाचा फायदा मुख्यत्वे जवळील शहरांनाच होणार आहे. महोत्सवामुळे गावातील पर्यटन वाढेल आणि त्यामुळे स्थानिक व्यवसाय वाढेल असे पंचायतीने स्पष्ट केले होते, परंतु आयोजकांनी जवळील शहरांमध्येच पर्यटकांसाठी हॉटेल्स बुक करण्याचे सुचीत केल्याने पर्यटक धारगळमध्ये राहणार नाहीत असे लोक बोलू लागले आहेत. त्यामुळे पंचायतीने लोकांना फसवले अशी टीका स्थानिकांनी पंचायतीवर करायला सुरवात केली आहे. सनबर्न समर्थकांना वाटते महोत्सवामुळे गावाचा विकास होणार आहे, पण खरे तर फक्त काही मोजक्या लोकांना फायदा झाला अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. त्यामुळे लोकांना फायदा कसा होणार हे स्पष्ट करण्यात पंचायतीसमोर आव्हान उभे राहिले आहे. ∙∙∙

वेलिंगकरांची खुमखुमी

वादग्रस्त वक्तव्ये करण्यात चर्चेत असलेले प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी काही महिन्यांपूर्वी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर ख्रिस्ती बांधव संतप्त झाले होते व विरोधकांनीही त्यावर तोंडसुख घेतले होते. अनेक ख्रिस्ती बांधवांच्या भावानाही दुखावल्या होत्या. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित झाला होता. सरकारनेही त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाईचा विडा उचलला होता. मात्र, त्यातून सहीसलामत ते सुटले होते. त्याला काही महिने उलटले असताना पुन्हा एकदा त्यांनी सेंट झेवियर यांच्याबाबत ट्वीट करून वादाची ठिणगी पाडली आहे. राज्यात सध्या सेंट झेवियर शवप्रदर्शन सोहळा सुरू आहे. देश विदेशातून अनेक पर्यटक शवदर्शनासाठी आले आहेत. त्यामुळे वेलिंगकर यांनी केलेल्या वक्तव्याने पुन्हा कुणाच्‍या भावना दुखावल्‍यास जबाबदार कोण? एकीकडे सरकार शांतता राखण्याचे आवाहन करत असताना वेलिंगकर वादग्रस्‍त वक्तव्ये करत राहिले, तर सरकारचे धोरण दुटप्‍पी नव्‍हे का? इतिहास उकरायचा झाल्‍यास तसे बरेच प्रकार बाहेर पडू शकतात? साऱ्यांनी तेच करत राहावे का? ∙∙∙

रस्त्यासाठी देणगी

गोव्यात हल्लीच्या काळात रस्त्यांची झालेली दुर्दशा आणि त्यावर अत्याधुनिक तोडगा हे विषय गाजताना दिसतात. आता जुने गोवे – पिलार मुख्य जिल्हा रस्त्यावरील आजोशी – पिलार टप्पा हा अर्धा हॉटमिक्स केल्याने लोकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या टप्प्यातील लोकांनी असा काय गुन्हा केला होता, की त्यांच्या वाट्याला अर्धा विकास आला. त्यात आमदार वीरेश बोरकर यांनी आपण जबाबदार नसून सरकार आणि खासकरून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे बोट दाखवले. आमदार असे म्हणत असेल आणि सरकार काही करणार नाही, म्हणून लोकांनीच आत्ता रस्ता दुरुस्तीसाठी देणगी गोळा करण्याचा मनसुबा केल्याची चर्चा सध्या आजोशी, मंडूर, डोंगरी, नेवरा परिसरात ऐकू येत आहे. ∙∙∙

आप ‘बॉम्ब’ फोडणार?

आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी मंगळवारी ‘गोमन्तक टीव्ही’च्या ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात सहभाग घेतला होता. राज्यात सध्या गाजत असलेल्या विविध प्रश्नांवर विरोधक एकत्र येत नसल्याच्या अनुषंगाने ही चर्चा झाली. ॲड. पालेकर यांनी पक्षाची भूमिका, धोरण, इंडिया आघाडीतील घटक पक्ष म्हणून करीत असलेले काम पटवून दिले. आता त्यांनी म्हणे ‘कॅश फॉर जॉब’सारखा मोठा बॉम्ब उद्या टाकू असे सांगितले आहे. त्यामुळे ॲड. पालेकर आता कोणता घोटाळा बाहेर काढणार आहेत, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एका बाजूला गोवा फॉरवर्ड पक्षाचे सुप्रिमो ‘कॅश फॉर जॉब’मागील मुख्य सूत्रधाराच्या शोधात आहेत, तर दुसरीकडे आता आपच्या नेत्याने ‘बॉम्ब’ टाकणार असल्याचे जाहीर करून त्याची उत्सुकता वाढविली आहे. अगोदरच ॲड. पालेकरांच्या मागे पोलिसांचा अधूनमधून ससेमिरा लागलेला असल्याने ते आता कोणाची पोलखोल करतात, ते काही तासांनी कळेलच, अशी अपेक्षा. ∙∙∙

आरोलकर झालेत चिलबिचल

मांद्रे मतदारसंघात कळंगुटचे आमदार मायकल लोबो तेथील स्थानिक कार्यकर्त्यांसह फिरू लागल्याने मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांच्या पायाखालची जमीन घसरू लागली आहे. मांद्रे मतदारसंघात जीत आरोलकर यांच्याविरोधात काही कार्यकर्ते जाऊन ते आमदार लोबो यांना मिळाले आहेत. अजून निवडणुका लांब आहेत. मात्र, लोबो कामाला लागले आहेत. यापूर्वी त्यांनी शिवोली मतदारसंघातून पत्नी आमदार डिलायला लोबो यांना उभे करण्यासाठी बऱ्याच आधी कामे सुरू केली होती. तीच व्यूहरचना ते मांद्रे मतदारसंघात वापरण्याचा प्रयत्न करत आहेत. लोबो यांचा अधिक वावर मांद्रेमध्ये होऊ लागल्याने आमदार आरोलकर हे चिलबिचल झाले आहेत. मतदारसंघातून आता अधिक वेळ बाहेर न घालवता लोकांच्या भेटीगाठी व त्यांच्या समस्यांकडे लक्ष देऊ लागले आहेत अशी चर्चा मांद्रेमध्ये आहे. लोबो यांच्याकडून आपली कामे करून घेण्यासाठी मांद्रेतील स्थानिक त्यांच्या भेटी घेत आहेत. हे जर पुढे असेच सुरू राहिले, तर त्याचा धोका स्थानिक आमदाराला होऊ शकतो हे आरोलकरांना कळून चुकले आहे. ∙∙∙

तरीही गोमाता रस्त्यावरच!

केवळ घोषणांनी क्रांती होत नसते, क्रांतीसाठी कृतीची गरज असते. दुदैवाने आपले मायबाप सरकार ज्या घोषणा करते त्या कृतीत उतरत नाही. मुख्यमंत्र्यांनी काही महिन्यांपूर्वी रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही अशी घोषणा केली होती. मात्र, आज गोव्यातील सगळेच रस्ते खड्डेमय बनले आहेत. गायीचा गोमाता गोमाता म्हणून उदो उदो करणे सोपे असते. मात्र, रस्त्यावर बसणाऱ्या भटक्या गोमातांचे काय? सरकारने रस्त्यावरील भटक्या गोमातांना न्याय देण्यासाठी प्रत्येक पंचायतीत व पालिका क्षेत्रांत भटक्या गुरांच्या देखभालीसाठी ‘पाउंड किपर’ नेमलेले असले, तरी रस्त्यावर भटकी गुरे ठाण मांडून बसतातच. आता आपल्या मुख्यमंत्र्यांनी गावठी गायींची देखभाल करण्यासाठी प्रत्येक गायीमागे प्रतिदिन दीडशे रुपये अनुदान देणार अशी घोषणा हल्लीच केली होती. सरकार गायींसाठी पैसे देते, तरी गोमाता रस्त्यावरच? या गोमाता आपल्याला जड का होतात? याच्यावर गोमाता भक्तांनी विचार करण्याची गरज आहे. ∙∙∙

Khari Kujbuj
Sunburn Festival 2024: CM सावंत ठरवणार ‘सनबर्न’चे भवितव्‍य, सत्ताधारी बाकांवरील आमदारांनीच दर्शवला होता विरोध

मडगावात पुन्हा रामदेवबाबांचे प्रताप

मडगाव पालिकेत रामदेवबाबा म्हणून सर्वांना परिचित असलेल्या एका अभियंत्याचे मोठमोठे प्रताप आता पुन्हा ऐकू येऊ लागले आहेत. एका नगरसेवकाच्या प्रभागात जाऊन लोकांना पैशांसाठी सतावत असल्याने हल्लीच त्या नगरसेवकाकडे त्यांचा खटका उडाला होता. आता पुन्हा एकदा घोगळ येथील एका इसमाकडून मार खातानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा इसम त्याच्यावर खुर्ची फेकून मारत असल्याचेही दिसते. असे काय बरे केले असेल या मडगाव पालिकेतील रामदेवबाबांनी ज्यामुळे त्या इसमाचा पारा एव्हढा चढला? ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com