
मोरजी: दोन खांब-धारगळ येथे सिग्नल पडल्याने अचानक समोरील गाडीने ब्रेक लावल्याने एकामागून एक चार वाहने एकमेकांवर आपटून त्यांचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत सर्वांत जास्त नुकसान प्रवासी टॅक्सीचे (जीए-०८-व्ही-०७६२) झाले.
या टॅक्सीच्या दर्शनी भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. टॅक्सीच्या दर्शनी भागाची बरीच मोडतोड झाल्यामुळे चालक आतच अडकला. त्याला इतर वाहनचालकांनी लोखंडी रॉडचा वापर करून पत्रा वाकवून बाहेर काढले. सुदैवाने चालक बचावला. मात्र, तो किरकोळ जखमी झाला आहे.
हा अपघात दोन चारचाकी वाहने आणि दोन ट्रक यांच्यात झाला. या अपघातात चारचाकी वाहन (केए-२२- एमडी-३०८२) मालवाहू ट्रक (जीए-०३-एएच- ९०४६) आणि ट्रक क्रमांक (जीए-०९-यू-५७२३) यांचेही नुकसान झाले. पेडणे पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून सर्व वाहने पोलिस ठाण्यावर नेली.
ट्रकने टॅक्सीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात टॅक्सीचा चुराडा झाला. विशेष म्हणजे, या टॅक्सीमधील चार पर्यटक किरकोळ जखमी होऊन आश्चर्यकारकरित्या बचावले. त्यांच्यावर म्हापसा येथील एका खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. कळंगुट येथील एका हॉटेलात ते उतरले होते. ते विमानाने नागपूरला जाणार होते.
हा अपघात झाला, तेव्हा कोल्हापूर येथील चौघेजण आपली कार थांबवून या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी गेले. पण नंतर तिथे आलेल्या लोकांनी, हेच ते अपघातासाठी जबाबदार असलेल्या ट्रकमधील लोक असावेत, असा समज करून घेऊन ते काय म्हणतात ते ऐकून न घेताच त्यांची बेदम पिटाई केली. त्यामुळे मदतीला जाऊनही नाहक मनस्ताप सहन करण्याची वेळ त्यांच्यावर आली.
दोन खांब-धारगळ येथे वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उभारलेल्या सिग्नलमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने वाहनचालकांना अंदाज येत नाही. या सदोष सिग्नलमुळे यापूर्वीही वाहनांचे अपघात झाले आहेत. हे सिग्नल व्यवस्थित करावेत, अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांनी वेळोवेळी सरकारकडे केली आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज हा अपघात घडला, अशी प्रतिक्रिया उमटली होती.
कासारवर्णे येथे १० रोजी रात्री महिंद्रा झायलो कारने (एमएच-०४- एफएफ-३४४७) विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला (जीए-११-जे-२६२९) ठोकरल्याने सुहास मधुकर नारुलकर (वय ४५ वर्षे) हा गंभीर जखमी झाला. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच त्यांचा वाटेत मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालक विशाल गणेश नाईक (वय २३ वर्षे, रा. मुंबई) याला पोलिसांनी अटक केली. सुहास संत सोहिरोबानाथ आंबिये कॉलेजमध्ये चालक म्हणून काम करत होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.