
पणजी: ‘विकसित गोवा २०२२’ पासून ऐकण्यात येत आहे आणि पुढे व्हिजन गोवा २०२५ हेच चालू आहे. मागील तीन वर्षांत विकसित गोवा दिसला आहे काय? विकसीत २०२४ साठी नोकऱ्यांचे लक्ष्य ठेवले आहे काय?, तुम्ही युवकांना सरकारी नोकऱ्या देणार म्हणून आश्वासन देणार आहात काय? त्यामुळे निश्चित विकसित गोवा कसे होणार आहे, हे आपणास काही दिसत नाही, असा आरोप आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी केला.
राज्यपालांच्या अभिभाषणावर ते बोलत होते. व्हेन्झी यांनी भागभांडवलांच्या खर्चात दाखविलेल्या आकडेवारीवरून हा निधी दूरगामी विकासासाठी नसल्याचे सांगितले. उन्हाळ्यात शाळा सुरू राहणार आहेत, त्याला विरोध करण्यासाठी आम्हांला न्यायालयात जावे लागले.
अनुदानित शाळा आहेत, त्या शाळा तरी उन्हाळ्यात वर्ग घेण्यास योग्य आहेत काय, असा सवाल त्यांनी केला. एका वर्षात २२० दिवसांत एक मुलगा १ हजार ६५ तास शाळेत घालविणार आहे, तर त्याला शाळेसाठी आणखी किती तास घालावे, असा सवाल त्यांनी केला.महिलांच्या सुरक्षिततेवर, कायदा सुव्यवस्थेवर एकही वाक्य राज्यपाल बोलत नाहीत, असे सांगत क्रूझ यांनी राज्यातील गुन्हेगारींची आकडेवारीच दिसून आले.
राज्यात चोऱ्यांची गुन्हे वाढले आहेत, त्याशिवाय मडगावातील महिलेवरील बलात्काराची घटना घडल्यानंतर एक महिला रस्त्यावर आली, तेव्हा तिला घेऊन दोन पोलिस घेऊन रात्रभर फिरत होते, याविषयी व्हेन्झी यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी या प्रकरणाची अधीक्षकांनी अजिबात चौकशीही केली नाही, पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिली असल्याने त्या पोलिसांना निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी केली.
रस्त्यावरील अपघात, समाजकल्याण खात्यातर्फे ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला व दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या योजनांचे पैसे वेळेत मिळत नसल्याचेही व्हेन्झी यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले, बसेसचे मार्ग वाढविता येत नाहीत. सार्वजनिक बस वाहतूक व्यवस्थित करण्यासाठी माझी बस योजना आणली पण त्यातून लोकांनाच त्रास झाला.
ईव्ही बसेस वाढल्यानंतर चार्जिंग स्टेडियम उभारावे लागतील. वार्का-पेडे रस्ता होणे गरजेचे आहे. ओर्ली पुलाची फाईल २०२३ पासून पडून आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या फुटबॉलला प्रोत्साहन मिळावे. प्रत्येक वर्षी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी सरावाकरिता खेळाडूंना लागणाऱ्या सुविधा उपलब्ध होत नाहीत. तीनशेपेक्षा फाईल टीसीपीकडे रूपांतरणासाठी आहेत, या जमिनी कोणाला हव्या आहेत, असा सवाल त्यांनी केला. कशासाठी जमीन रुपांतरण हवे आहे, असेही ते म्हणाले.
वीरेश बोरकर म्हणाले, विकसीत भारत आणि विकसीत गोवा यात फरक काय, आहे यावर बोलणे गरजेचे आहे. राज्यातील पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. ५० एमएलडी पाणी पुरवठा कमी आहे, हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले, पण सध्याच्या स्थितीत सांताक्रूझ मतदारसंघात पाणी समस्या मोठी आहे.
हर घर जल सरकार म्हणते पण कित्येक घरांत पाणीच नाही. आपण यापूर्वीच कोणत्या मतदारसंघात पाणी मिळत नाही, याची फाईल विधानसभेत मांडली होती. हर घर जल ही योजना पूर्णतः अपयशी ठरली आहे. मुख्यमंत्री चार तास पाणी देणार असे सांगत असले तरी आमच्या मतदारसंघात एक-दोन तास पाणीही मिळत नाही. राज्यात पाण्याचा मोठा प्रश्न आहे, तो गांभीर्याने घ्यावा. मोठ्या प्रकल्पांना साबांखा कशी काय परवानगी देते, असा सवाल आहे.
म्हादईला केवळ आई म्हणून चालणार नाही, कर्नाटक सरकारने पाणी वळविण्यासाठी निधी शिल्लक ठेवला आहे, राज्य सरकारला म्हादईविषयी कळवळा वाटणे आवश्यक आहे. राज्यातील नद्या प्रदूषित झालेल्या आहेत. त्यातील सहा नद्या सर्वात जास्त प्रदूषित आहेत, त्यात मांडवी, साळ, खांडेपार, झुआरी, खाले, म्हापसा यांचा समावेश आहे. या नद्यांचे पुनर्जीवित करण्यावर राज्यपालांच्या भाषणात काहीच उल्लेख नाही, असेही बोरकर म्हणाले.
अनेक योजनांचे वेळेवर पैसे मिळत नसल्याबद्दल लोकांकडून अनेक तक्रारी आल्या आहेत. लोकांना भत्ता मिळण्यास विलंब होत आहे. स्वयंपूर्णा मित्रांनी कधीही माझ्याशी संपर्क साधला नाही किंवा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. तथापि, प्रशासन आपणास एक लोकप्रतिनिधी म्हमून माहिती देण्यात अयशस्वी झाले असताना समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विकास झाल्याचा दावा कसे करते. माझ्या मतदारसंघातील आरोग्य विभागात रिक्तपदे भरण्यात सरकार अपयशी ठरले आहे. माझ्या मतदारसंघातील आरोग्य केंद्रांमध्ये असंख्य पदे रिक्त आहेत. पिसुर्ले येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन करण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप एल्टन डिकॉस्टा यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.