Gomantak Bhandari Samaj Election
पणजी: गोमंतक भंडारी समाजातील दोन गटांमध्ये निवडणुकीवरून सुरू असलेला वाद पुन्हा उच्च न्यायालयात पोहोचला आहे. या समाजाच्या केंद्रीय समितीसाठी काल झालेली निवडणूक प्रक्रिया जिल्हा निबंधक तुषांत कुंकळकर यांनी ‘जैसे थे’ ठेवल्याने देवानंद नाईक गटाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेऊन जिल्हा निबंधक पक्षपात करत असल्याचा आरोप करत त्यांना हटवण्यासाठी अर्ज केला.
परंतु या अर्जावर आज सुनावणी न घेता न्यायालयाने सुनावणी १२ नोव्हेंबरला ठेवली आहे. त्यामुळे जिल्हा निबंधकांसमोर पुढील सुनावणी होऊ नये यासाठी नाईक गटाने केलेला आटापिटा निष्फळ ठरला आहे.
समाजाच्या केंद्रीय समितीच्या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांवरील छाननी प्रक्रियेवेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी विरोधी गटाचे २१ पैकी २० अर्ज फेटाळले व सत्ताधारी गटाचे १४ सदस्य बिनविरोध निवडून आल्याचे घोषित केले. यावेळी निवडून आलेल्या सदस्यांनी देवानंद नाईक यांची अध्यक्षपदी निवड केली व केंद्रीय समितीही जाहीर करण्यात आली. या बेकायदेशीर प्रक्रियेला विरोध गटाने आक्षेप घेतला आहे.
निवडणूक अधिकारी हा सत्ताधारी गटाच्या मर्जीतील असल्याने ही निवडणूक प्रक्रिया कायद्यानुसार झाली नसल्याचा दावा करून त्यास स्थगिती देण्याची विनंती करणारा अर्ज विरोधी गटाने जिल्हा निबंधकांकडे केला होता. त्यावर प्राथमिक सुनावणी घेऊन ही निवडणूक प्रक्रिया ‘जैसे थे’ ठेवण्याचे निर्देश देत पुढील सुनावणी ७ नोव्हेंबरला ठेवली आहे.
या सुनावणीवेळी जिल्हा निबंधक हे सत्ताधारी गटाने घेतलेली निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर ठरवतील याची भीती असल्याने त्यांनी जिल्हा निबंधकांविरोधातच उच्च न्यायालयात अर्ज केला. मात्र सुनावणीच न झाल्याने या गटाला अपयश आले आहे. त्यामुळे त्यांना आता जिल्हा निबंधकांनी येत्या ७ नोव्हेंबरला ठेवलेल्या सुनावणीवेळीच बाजू मांडण्याची वेळ आली आहे. कारण दुसरा पर्यायच उरलेला नाही.
निवडणूक झाल्यानंतर समिती कार्यान्वित होण्यासाठी जिल्हा संस्था निबंधकांची मान्यता घेणे आवश्यक असते व त्यानंतरच ही समिती अधिकृत ठरते. भंडारी समाजाच्या सत्ताधारी गटाने निवडणूक प्रक्रियेसाठी पूर्वनियोजन करून विरोधी गटाचे अर्ज काही क्षुल्लक कारणावरून फेटाळले. हा निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या मर्जीतील असल्याने निवडणुकीला सामोरे जाऊ नये म्हणून सर्व नियम धाब्यावर बसवून ही प्रक्रिया पूर्ण केली होती. जिल्हा संस्था निबंधकांनी या निवडणुकीला मान्यता देण्यापूर्वीच अध्यक्षांसह केंद्रीय समितीची निवड करण्यात आली होती.
गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष देवानंद नाईक यांच्या नेतृत्वाखाली पहिली बैठक आज मंगळवारी घेण्यात आली. मावळत्या समितीकडून ताबा मिळविल्यानंतर पहिल्याच बैठकीला विरोधी गटातील पाचही सदस्य अनुपस्थित होते. आपल्यासोबत सर्व सतराही सदस्य असल्याचा दावा काल सोमवारी देवानंद नाईक यांनी केला होता, मात्र आज तो फोल ठरला. उपाध्यक्ष अविनाश शिरोडकर, संयुक्त सचिव संजय पर्वतकर, कार्यकारी सदस्य परेश नाईक, कार्यकारी सदस्य बाबू नाईक व कार्यकारी सदस्य विनोद नाईक अनुपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.