Ponda Municipal Council Election 2023
Ponda Municipal Council Election 2023Dainik Gomantak

Ponda Municipal Council Election 2023: 4,957 मते मिळूनही भाजपपुढे अनेक प्रश्नचिन्हे

भाटीकर ठरू शकतात प्रबळ विरोधक : काही प्रभागांवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता

मिलिंद म्हाडगुत

फोंडा पालिकेतील १३ प्रभागांत भाजपला ४,९५७ मते मिळाली असली तरी त्याची विभागणी समप्रमाणात झालेली दिसत नाही. तीन प्रभागांत भाजप दुसऱ्या क्रमांकावर असून दोन प्रभागांत हा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. तर दोन प्रभागांत भाजपला काठावरचा विजय मिळाला असून आणखी एका प्रभागात भाजपचा विजय अगदी कमी फरकाने झालेला आहे.

बिनविरोध निवडून आलेल्या दोन प्रभागांपैकी प्रभाग ७ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून गणला जात असून प्रभाग १३ मध्ये दोलायमान स्थिती दिसत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत या प्रभागात मगोचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांना सर्वाधिक मते प्राप्त झाली होती.

पण आता या प्रभागातील मगोच्या खंद्या समर्थक विद्या पुनाळेकर या भाजपमध्ये जाऊन नगरसेवक बनल्यामुळे हा प्रभाग नेमका कोणत्या बाजूने आहे हे कळायला मार्ग नाही. पण सध्याची परिस्थिती पाहता १३पैकी ८ प्रभागांत भाजपची स्थिती ‘टू बी ऑर नॉट टू बी’ अशी असून ५ प्रभागांत मात्र भाजपने समाधानकारक यश मिळवल्याचे दिसते आहे.

फोंड्यातील खडपाबांध, कुरतडकर नगरी, शांतीनगर हे भाजपचे गड मानले जात असून इतर प्रभागांत मात्र भाजपची स्थिती ‘फिफ्टी-फिफ्टी’ अशी दिसत आहे. आणि याच भागातील प्रभागात भाजपने या पालिका निवडणुकीत लक्षणीय यश मिळवले आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत भाजपने स्पृहणीय यश मिळवूनही अनेक प्रश्नचिन्हे उभी राहत आहेत.

मुख्य म्हणजे तीन प्रभाग सोडून यावेळी काँग्रेसने इतर प्रभागांत लक्ष घातलेले नव्हते. त्यामुळे भाजपची स्पर्धा होती ती फक्त भाटीकरांच्या रायझिंग फोंडाशी. आणि या दुरंगी लढतीमुळे भाजपला एवढी मते मिळू शकली, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

ज्या तीन प्रभागांत भाजप, काँग्रेस व रायझिंग फोंडा यांची लढत झाली त्यापैकी दोन प्रभागांत भाजपला तिसरा क्रमांक प्राप्त झाला. तर खडपाबांध या भागातील प्रभाग ६ वर मात्र भाजपने निर्विवाद यश मिळवले. पण दोन प्रभागांतील खासकरून प्रभाग ११ या नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्या प्रभागातील भाजपचे दारुण अपयश खटकण्यासारखेच आहे. पण त्याचबरोबर सगळ्या प्रभागांत जर भाजप, काँग्रेस व रायझिंग फोंडा यांची तिरंगी लढत झाली असती तर भाजपला आज जेवढी मते मिळाली आहेत तेवढी मिळू शकली असती की काय? हाही प्रश्न चर्चिला जात आहे.

Ponda Municipal Council Election 2023
Goa Liquor Seized : अवैध दारूसह ट्रक जप्त; 36 लाखांचा ऐवज ताब्यात

काँग्रेसची काही प्रभागांतील मते ही भाजपच्या वाट्याला गेली, असे जे म्हटले जात आहे त्यात जर तथ्य असेल तर काही प्रभागांतील भाजपचे यश हे धूळफेक ठरणारे असू शकते, असे मतही काही राजकीय विश्लेषक व्यक्त करताना दिसत आहेत.

प्रभाग १०मध्ये मिळवलेले एका मताचे यश हे भाजप काँग्रेसच्या सेटिंगमुळे मिळाले, असा थेट आरोप ‘रायझिंग फोंडा’चे या प्रभागातील कार्यकर्ते करताना दिसत आहेत. त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हे विश्लेषण महत्त्वाचे वाटते. त्याचबरोबर सत्ता असूनही काही प्रभागांत भाजपला धोबीपछाड कसा मिळाला, याबाबतीतही अनेक तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. यामुळेच पालिका काबीज करूनही आगामी विधानसभेच्या दृष्टीने भाजपमध्ये सगळे काही ‘आलबेल’ आहे, असे म्हणता येत नाही.

पालिका निवडणुकीची समीकरणे ही विधानसभा निवडणुकीच्या समीकरणांशी जुळत नसल्यामुळे यशाचे हे आकडे फसवेही ठरू शकतात, असा होराही राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

यावेळी फोंडा पालिका निवडणुकीत भाजप पूर्ण शक्तिनिशी रिंगणात उतरला होता. पॅनलसुद्धा आधीच जाहीर करण्यात आला होता. त्यात परत एक रायझिंग फोंडा सोडल्यास स्पर्धा ही विशेष नव्हती. तरीही आठ प्रभागांत भाजपला चाचपडावे लागले. साखळीसारखे शतप्रतिशत यश भाजपला फोंड्यात का मिळू शकले नाही यावरही उलट-सुलट मते व्यक्त होताना दिसत आहेत. साखळीत नगरपालिका काँग्रेसच्या कह्यात होती, तरीसुद्धा भाजपने तिथे काँग्रेसला भुईसपाट करून टाकले. पण फोंड्यात पालिका भाजपजवळ असूनही साखळीच्या यशाचा कित्ता गिरवता आला नाही.

रायझिंग फोंडाचे डॉ. केतन भाटीकर यांनी एकहाती लढत देऊन भाजपला काही प्रभागांत आत्मविश्लेषण करण्याची वेळ आणली आहे. आता पालिका मंडळ स्थापन झाल्यावर भाटीकरांची भूमिका काय असेल, पालिका मंडळाला ते कशाप्रकारे खिंडीत पकडतात यावर भविष्यातील फोंड्याचे राजकारण अवलंबून असणार आहे.

भविष्यात भाटीकर-रवी यांच्यातला संघर्ष वाढूही शकतो. कदाचित ती काळाची गरजही ठरू शकते. मात्र, पालिका निवडणुकीच्या निकालाने निर्माण झालेली प्रश्नचिन्हे भाजपने वेळात निकालात काढली नाही तर मात्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी हे प्रश्न भाजपला मारक ठरू शकतात, एवढे निश्चित.

Ponda Municipal Council Election 2023
GMC : ‘गोमेकॉ’त ‘पदव्यूत्तर’साठी आरक्षण; ‘उटा’कडून स्वागत

पालिका निवडणुकीच्या उलट विधानसभेचा निकाल

आतापर्यंत गेल्या चार फोंडा पालिका निवडणुकांचा निकाल पाहिल्यास विधानसभा निवडणुकांचा निकाल या निकालाच्या विरुद्ध लागलेला दिसून येतो. 2013 साली झालेल्या पालिका निवडणुकीत काँग्रेस पॅनलचा धुव्वा उडाला होता; पण 2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या रवी नाईकांनी मोठा विजय प्राप्त केला होता.

त्यामुळेच भविष्याचा विचार करून भाजपने सावध पावले उचलणे आवश्यक आहे. आणि त्याकरता भाजपने अपयश आलेल्या तसेच निसटते यश प्राप्त झालेल्या फोंड्यातील ‘त्या’ ८ प्रभागांवर आतापासूनच लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे.

भाजप-मगो युती झाल्यास काय?

सध्या मगो पक्ष सरकारात असल्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप-मगो युती होऊ शकते. तसे झाल्यास मग समीकरणे बदलू शकतात. त्यावेळी उमेदवारी कोणाला, हाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो. आणि वेगवेगळे पर्यायही उपलब्ध होऊ शकतात. तसे झाले तर या पालिका निवडणुकीतील यशाचे आकडे किती उपकारक ठरू शकतात यावरही आकडेमोड केली जात आहे.

विरोधक कोण?

सध्या पालिकेत रायझिंग फोंडा हा पॅनल विरोधकाच्या भूमिकेत आहे. या विरोधकांपैकी गीताली तळावलीकर व शिवानंद सावंत हे अनुभवी नगरसेवक असून सुरवातीपासून ते रायझिंग फोंडाबरोबर आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका जास्त महत्त्वाची ठरणार आहे. पण पालिकेबाहेर खेळली जाणारी भाटीकरांची खेळी ही या नाट्यात ‘नायकाची’ भूमिका ठरू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com