म्हापसा: पावसाळ्यात विषाणूजन्य आजारांमध्ये (डेंग्यू व मलेरिया) वाढ होत असते. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी बार्देशचे उपजिल्हाधिकारी कबीर शिरगांवकर यांनी तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्यधिकारी तसेच इतर अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन महत्त्वाच्या सूचना केल्या. तसेच अनधिकृत रासायनिक फॉगिंगमुळे लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, असे या बैठकीत समोर आले.
फॉगिंगबाबत उपजिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना आवश्यक सूचना केल्या जातील असे सांगितले. सर्व पंचायतींच्या ग्राम पाणी व स्वच्छता समितींनी विषाणूजन्य आजारांविषयी बैठका घेऊन जागृती करावी अशी सूचना उपजिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केली. तसे निर्देश बीडीओला देण्यात आले आहेत.
तसेच एडिस इजिप्टी अळ्या उगमस्थानी नष्ट करून रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. डासांची उत्पत्ती असणाऱ्या गावातील सर्व विहिरींची पाहणी करून आवश्यक खबरदारी घेण्याची सूचना उपजिल्हाधिकाऱ्यांनी केली. तसेच कंत्राटदारांकडील कर्मचाऱ्यांना हेल्थकार्ड अनिवार्य असेल याची अंमलबजावणी व्हावी, असेही निर्देश दिले. या बैठकीला म्हापसा नागरिक आरोग्य केंद्राचे डॉ. दिनेश परब हे उपस्थित होते.
डासांना पळवून लावण्यासाठी अनेकजण आरोग्य विभागास विश्वासात न घेता परस्पर फॉगिंग मशिनच्या माध्यमातून धुरळणी करतात. परंतु या धुरळणीमुळे डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण येतेच असे नाही. योग्यरीत्या फवारणी न केल्यास डास फक्त आपली जागा बदलतात. अशावेळी लोकांनी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे गरजेचे असते, याकडे आरोग्यधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.
एप्रिल ते जुलै या चार महिन्यात कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्रात १९ डेंग्यूचे रुग्ण आढळले. पर्वरी आरोग्य केंद्रात ८, म्हापसा नागरी आरोग्य केंद्रात २७, शिवोली केंद्रात ५ व कोलवाळ आरोग्य केंद्रात ९ रुग्ण आढळले आहेत.
काही हॉटेल्सवाले किंवा पंचायतींमधील प्रभागांत आरोग्य विभागाने शिफारस केलेल्या रासायनिकचा फॉगिंगसाठी वापर होत नाही. त्या उलट अनधिकृत रासायनिक फॉगिंगमुळे लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. ज्यामध्ये वयोवृद्ध तसेच छातीचा त्रास आहे, अशा लोकांना ते मारक ठरु शकते. तसेच धुरळणी करण्याची एक पद्धत असते व त्यानुसार फॉगिंग प्रणाली राबविली पाहिजे, असे आरोग्याधिकारी डॉ. रोशन नाझारेथ यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.