मोरजी: आपल्याला परत एकदा एकच शेवटची संधी द्या हि आपली शेवटची निवडणूक आहे 100 टक्के बेरोजगार युवकाना 100 टक्के रोजगार मिळवून देण्याचे आपले स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला निवडून द्या हि निवडणूक आपली शेवटची निवडणूक असेल असे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे कोरगाव येथे भात कापणी व मळणी यंत्राचा शुभारंभ केल्यानंतर भावूक होवून बोलत होते.
आपण कमी कुठे पडलो, आपण आणखी काय करावे ते सांगा आपण करणार परंतु आपल्याला तुमच्यापासून दूर करू नका असे आवाहनही करायला विसरले नाही. आणि येणाऱ्या निवडणुकीत विचारपूर्वक मतदान करावे, काही उमेदवार मतदार संघात चालू असलेल्या प्रकल्पावर डोळा ठेवून राजकारणातून पैसा कमवण्यासाठी आलेले आहे त्यांनी आतापर्यंत आपल्या गावात गावासाठी काय केले ते त्यांनी अगोदर सांगावे असे आवाहन केले.
कोरगाव कोनाडी येथे भात कापणी यंत्राचा शुभारंभ कार्यक्रमाला कृषी अधिकारी प्रसाद परब, कोरगाव माजी सरपंच तथा पंच स्वाती गवंडी उपसरपंच समील भाटलेकर, नारायण तळकटकर व शेतकरी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पुढे बोलताना कोरगाव मधील काही पंच सदस्यांनी आपल्याकडून कामे करून घेतली मात्र जनतेला आपल्यापर्यंत यायला दिले नाही, कोरगाववासियांनी कोणतेही आपले काम असेल तर थेट आपल्याकडे संपर्क साधा आपल्याला मध्यस्थीची गरज नाही. ज्या पंच सदस्यांनी आपली स्वार्थासाठी साथ सोडली त्याना जनताच जाब विचारतील असा पुनरुच्चार आजगावकर यांनी केला .
शेतीसाठी मोफत उपक्रम
शेती आणि शेतकरी टिकला तरच देश वाचणार आहे, देशाचा शेतकरी हा महत्वाचा घटक आहे. या घटकासाठी सरकार सर्वतोपरी मदत करत आहे. शेती कापणी आणि मळणी यंत्रासाठी जे पन्नास टक्के अनुदान आहे ते सरकार आणि पन्नास टक्के अनुदान आपण शेतकऱ्यासाठी देणार असल्याचे जाहीर केले. याहीपुढे शेतकऱ्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी दिली.
कृषी खात्यांतर्गत भात कापणी आणि मळणी यंत्रासाठी तासी 2400 रुपये असा भाव आकारला जातो, त्यातील 50टक्के सरकार अनुदान देतो तर पन्नास टक्के म्हणजे तासाला 1200 रुपये हे शेतकऱ्यांनी द्यायचे असतात, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी आपण शेतकऱ्यांचे 50 टक्के पैसे स्वता भरणार असल्याचे सांगितले.
माजी सरपंच तथा पंच सदस्य स्वाती गवंडी यांनी बोलताना शेतकऱ्यासाठी सरकार आणि उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर वेळोवेळी मदत करत आहेत. आता त्याना आगामी निवडणुकीत सर्व शेतकरी आणि मतदारांनी भरघोस मतांनी निवडून द्यायला हवे असे सांगितले.
पेडणे कृषी अधिकारी प्रसाद परब यांनी सांगितले देण्याची दानत असायला हवी ती दानत उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्याकडे आहे, म्हणूनच त्यांनी शेतकऱ्यासाठी मोफत यंत्र उपलब्ध करून दिले. शेतीविषयक सरकारच्या अनेक योजना उपक्रम आहे त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.