Curlies Demolition: हणजूण किनाऱ्यावरील वादग्रस्त ‘कर्लिस’ रेस्टॉरंटच्या बांधकामावर सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार हातोडा चालवून सरकारी यंत्रणेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने या कारवाईचा धडाका सुरूच ठेवला. कर्लिसवर कारवाई करताना अतिक्रमणविरोधी पथकाने आज कर्लिसचा चालक एडविन नुनीस याचे खास कॉटेजही जमीनदोस्त केले.
शुक्रवारी सायंकाळी 6.30 वाजता बंद करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्याचे काम आज सकाळी 8.30 च्या सुमारास पुन्हा हाती घेण्यात आले. या कर्लिसमधील चांगले लाकडी साहित्य, सोफा सेट तसेच फायबरचे साहित्य बाजूला करून उर्वरित साहित्य मोडीत काढले जात आहे. मागच्या बाजूने टेकडीवरील पहिल्या मजल्यावरील बांधकाम हे बरेचसे पाडले आहे.
या पहिल्या मजल्यावरील नाईट क्लबचा अर्धा भाग व स्टेज पाडण्याचे कामही शनिवारी सुरू होते. याशिवाय दुसऱ्या मजल्यावरील बांधकामसुद्धा अर्धे पाडण्यात आले. त्यामुळे कर्लिसच्या आवारात मोडलेल्या फर्निचरचा मोठा खच पडला आहे.
कर्लिसचे बांधकाम पाडण्याच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी बार्देश उपजिल्हाधिकारी कार्यालयातील पदाधिकारी तसेच पोलिस बंदोबस्त आजही घटनास्थळी सज्ज होता. उद्या रविवारी देखील हे बांधकाम पाडण्याची कारवाई सुरू राहणार असून सर्व्हे क्र. 42/10 वगळून सर्व्हे क्र. 42/9 व 42/11 मधील कर्लिसचे अवैध बांधकाम सध्या पाडले जात आहे.
हे बेकायदेशीर कर्लिस रेस्टॉरंट (Restaurant) हणजूण किनाऱ्यावरील टेकडीवर असल्याने तेथे जेसीबी जाऊ शकत नाही. त्यामुळे या रेस्टॉरंटचे बांधकाम पाडण्याचे काम हातानेच हातोडी, कुदळ, गॅस कटर व इतर सामुग्रीने अतिक्रमण पथकाकडून सुरू होते. बांधकाम पूर्णतः जमीनदोस्त करण्यास किमान आठवडाभराचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.