Govind Gaude : कला अकादमी संकुल नूतनीकरण कामाच्या खर्चासंदर्भात भाजप प्रवक्ते सावियो रॉड्रिग्ज यांनी कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्यावर पुन्हा तोफ डागली आहे. यासंदर्भात आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पत्र लिहून या साऱ्या व्यवहाराची तांत्रिक समिती नेमून चौकशी करावी आणि भ्रष्टचार झाल्याचे दिसून आल्यास मंत्री गावडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे अशी मागणी केली आहे.
निविदा प्रक्रिया न राबवल्याने कला अकादमी नूतनीकरण काम सुरवातीपासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या प्रकरणाची चौकशी केली जावी अशी समस्त गोमंतकीयांकडून मागणी होत आहे. त्यातच आता गोवा भाजपचे प्रवक्ते सावियो रॉड्रिग्ज यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना पत्र लिहिले आहे. रॉड्रिग्ज यांनी कला अकादमी निविदा प्रक्रियेची चौकशी करून दोषी असणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
कला अकादमी नूतनीकरण कामासाठी 56 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात देखील हा मुद्दा प्रचंड गाजला होता. दरम्यान, आता गोवा भाजपचे प्रवक्ते रॉड्रिग्ज यांनी भाजपला घरचा आहेर देत या कामाची चौकशीची मागणी केली आहे.
रॉड्रिग्ज यांनी पत्रात पक्षाच्या उद्देशाची मुख्यमंत्र्यांना आठवण करून दिली आहे. आपल्या पक्षाचे तत्त्व ‘राष्ट्र प्रथम’ असे असून ‘पक्ष द्वितीय’ आणि ‘स्व’ सर्वात शेवटी येतो. माझा या तत्त्वावर विश्वास आहे. याच तत्त्वामुळे गोवा सरकारने निविदा प्रक्रिया न राबवता खासगी एजन्सीला दिलेल्या कामाचा मुद्दा मी उपस्थित करत आहे. सरकारने नियमांना डावलत खासगी एजन्सीला दिलेल्या कामामुळे सरकारमध्ये भ्रष्टाचाराची शक्यता आणि संभाव्यता निर्माण होते, असे रॉड्रिग्ज यांनी म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.