

साकोर्डा: साकोर्डा परिसरातील आगलोट येथे कुजलेल्या अवस्थेत वाघ सापडणे हे राज्यात वाघ नाही, असे म्हणणाऱ्यांना ही चपराक आहे. तो परिसर बेकायदा शिकारीसाठी ओळखला जात असल्याने एखाद्याच्या बंदुकीच्या गोळीने वाघाचा बळी घेतला काय, याची चौकशी होणे गरजेचे आहे.
या परिसरात काही वर्षांपूर्वी गवे मृतावस्थेत सापडले होते. ती बाब बाहेर येऊ नये म्हणून गव्यांचे दफन करण्यात आले होते. त्या प्रकरणात कोणालाही शिक्षा झाली नाही. ज्यांच्यावर संशय होता ते निर्दोष सुटले. आजवर राज्यात सहा वाघ मारले गेले. प्रत्येक वेळी ही बाब उजेडात आणावी लागली. राज्यात वन खाते आणि अनेक अधिकारी असूनही वाघ कुजलेल्या अवस्थेत सापडेपर्यंत त्याचा पत्ता लागू नये, यावरून खात्याची कार्यपद्धती दिसून येते. बडे श्रीमंत आणि काही सरकारी अधिकारी शिकारीसाठी या परिसरात येतात, हे उघड गुपित आहे. त्यामुळे वाघाचा बळी कोणी घेतला, हे सत्य उघडकीस येईल का, याबाबत शंका आहे; तरीही चौकशीची मागणी करणे आवश्यक आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या केंद्रीय अधिकारप्राप्त समितीने (सीईसी) पूर्वी प्रस्तावित केवळ म्हादई क्षेत्राऐवजी प्रामुख्याने नेत्रावळी आणि खोतिगाव अभयारण्यांचा समावेश करून टप्प्याटप्प्याने गोव्याचे पहिले व्याघ्र अभयारण्य उभारण्याची शिफारस केली आहे. या ४६८.६ चौरस किलोमीटर क्षेत्राचा उद्देश कर्नाटकातील काली व्याघ्र अभयारण्याशी अधिवास जोडणे हा आहे. सीईसीने नुकताच गोव्यातील वनक्षेत्राचा अभ्यास करून अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर केला आहे.
पट्टेरी वाघ कुजलेल्या अवस्थेत आढळून त्याचे दात आणि नखे गायब असल्याने हा प्रकार संशयास्पद असल्याचे मत आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले. या घटनेत वाघाची हत्या झाली आहे की त्यामागे अन्य काही कारण आहे, याचा सखोल तपास होणे आवश्यक आहे. एका बाजूला ‘व्याघ्र प्रकल्पा’ला राज्य सरकार विरोध करत असताना, दुसऱ्या बाजूला विरोधकांकडून हा प्रकल्प आवश्यक असल्याचा मुद्दा मांडला जात आहे. अशा परिस्थितीत मृतावस्थेत आढळलेल्या वाघामागील खरे कारण उघड होणार का, असा सवालही विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.
साकोर्डाजवळील आगलोट येथील पानसवाडा भागातील खासगी वनक्षेत्रात तीन ठिकाणी वाघाचे अवशेष सापडले आहेत. तेथून जवळच सत्पाल येथे वन खात्याचे केंद्र आहे. तरीही वन खात्याला याची माहिती मिळू नये, हे आश्चर्यकारक आहे. प्रत्यक्ष पाहणी केल्यावर वाघाचे कलेवर दिसून आले. जंगलात भटकंती करत असताना कुजलेल्या अवस्थेत वाघ असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे जाऊन पाहणी करण्यात आली. वाघाचे दात आणि पंज्यांची नखे गायब झाली आहेत. यावरून वाघाला कोणीतरी मारले असावे किंवा तो गोळीबाराचा बळी ठरला असावा, असे मानण्यास वाव आहे.
२०१९ ते २०२५ या कालावधीत राज्यात पाच वाघांचा मृत्यू झाला आहे. आता २०२६ च्या मे महिन्यात आणखी एक वाघ मृतावस्थेत आढळला आहे. या घटनेची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेऊन तपास करणे आवश्यक आहे. गोव्यात वाघ नाही, असे वारंवार सांगितले जात असले तरी हा सहावा वाघ मृतावस्थेत आढळल्याचे स्पष्ट झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.