पणजी: भाजपचे मांद्रे मतदारसंघातील (Mandre constituency) आमदार दयानंद सोपटे (Dayanand Sopte) एका कंत्राटदारांकडून खंडणी मागत असल्याची ऑडिओ क्लिप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी आज पत्रकारांसमोर उघड केली. लागलीच सोपटे यांनी ‘हा आवाज आपला नाही’, असे सांगून शेकडो कार्यक्रमांसमवेत रायबंदर येथील सायबर गुन्हे विभागात चोडणकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. गिरीश चोडणकर यांना आपण सोडणार नाही, असे आव्हान त्यांनी दिले. सोपटे एका कंत्राटदारांकडून एका वर्षांसाठी 44 लाखांची देणगी मागत असल्याचे या ऑडिओमध्ये स्पष्ट ऐकू येते, असा दावा चोडणकर यांनी करुन तशा आशयाची क्लिप पत्रकारांना दिली. याप्रकरणाची सरकारने सखोल चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मांद्रेतील बांधकाम तसेच इतर कोणत्याही कामासाठी कंत्राटदारांकडून स्थानिक आमदार हे ‘सोपटे टॅक्स’ जमा करत असल्याचा आरोप केला होता. त्याचा ऑडिओ पुरावा असल्याचा दावा केला होता. मात्र त्यांच्या आरोपांना आमदारांनी स्पष्टीकरण दिले नव्हते. त्याऐवजी आमदारांच्या मतदारसंघातील नेत्यांनी त्याचे खंडन करून त्यात काही तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण केले होते. काल चोडणकर यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची खातरजमा करण्यासाठी 24 तासांची मुदत दिली होती, तर आज त्याचा पर्दाफाश करण्याचा इशारा त्यांनी दिला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी प्रसिद्ध केलेल्या चार मिनिटांच्या ऑडिओ क्लिमध्ये सोपटे यांनी मागितलेल्या देणगीला ‘सोपटे टॅक्स’ असे नाव देऊन त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. मांद्रे मतदारसंघातील एका बांधकाम कंत्राटदाराला काही कार्यकर्त्यामार्फत निरोप पाठवून बोलावून घेतले. त्याच्याबरोबर झालेल्या पैशाच्या व्यवहारांसंबंधीची ऑडिओ क्लिप चोडणकर यांनी उघड केली आहे. या क्लिपमध्ये आमदार सोपटे व त्या कंत्राटदार याचे संभाषण ऐकू येते. चोडणकरांच्या आरोपानंतर गोमन्तकशी बोलताना दयानंद सोपटे यांनी आपण सायबर गुन्हे विभागात तक्रार नोंदविण्यासाठी जात असल्याची माहिती दिली. आपले कार्यकर्ते चोडणकर यांचा पुतळा जाळतील आणि निषेधही नोंदवतील, असे ते म्हणाले. ‘‘गिरीश यांनी हिम्मत असेल तर त्या कथित कंत्राटदाराला घेऊन यावे, तो आवाज माझा नाही’’, असे आव्हान सोपटे यांनी दिले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.