

पणजी: गेल्या ४० वर्षांपासून मी भाजपमध्ये काम करत आहे. परंतु, पक्षातीलच काही लोकांकडून माझी छळवणूक सुरू आहे. त्यामुळेच मी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. येत्या विधानसभा निवडणुकीबाबत शिवोलीतील कार्यकर्ते जो निर्णय घेतील, त्यानुसार मी पुढे जाईन, असे माजी मंत्री तथा शिवोलीचे माजी आमदार दयानंद मांद्रेकर यांनी रविवारी ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले.
दिवाळीनिमित्त शिवोलीत लावलेले माझे बॅनर्स त्यांनी हटवले. एससी, ओबीसी वित्त आणि व्यवस्थापन महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने काम करत असतानाही त्यांनी अडथळे आणले. याची माहिती मी भाजपच्या स्थानिक वरिष्ठ नेत्याला तीन महिन्यांपूर्वी दिली होती. तरीही त्यावर तोडगा न निघाल्याने मला हे पाऊल उचलावे लागले.
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पक्षाने पुन्हा प्रवेश दिला आहे. पण, वरिष्ठ नेते असतानाही पक्ष तुमच्याबाबतच तसा का वागत आहे? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, पक्षातील नेत्यांचे तसेच आहे. ते काहींना आत घेतात आणि काहींना बाहेर ठेवतात, असे मांद्रेकर म्हणाले. मी अजूनही पक्षातून बाहेर पडलेलो नाही. पुढील राजकीय वाटचालीबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. चारवेळा मला निवडून दिलेले कार्यकर्तेच माझ्याबाबत योग्य तो निर्णय घेतील, असेही त्यांनी नमूद केले.
दयानंद मांद्रेकर यांची ज्येष्ठता, त्यांचे पक्षाशी असलेले नाते तसेच आमच्याशी असलेले ऋणानुबंध लक्षात घेऊन त्यांचे म्हणणे मी पक्षश्रेष्ठींना कळविले आहे. त्यावर पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.