डिचोली: नाट्यक्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा शिरकाव झाल्याने व्यावसायिक रंगभूमीवरील नाटकांना चांगले दिवस आले आहेत. ही वस्तुस्थिती असली, तरी दशावतारी नाटकांना अजूनही दर्दी प्रेक्षकवर्ग असून, आजही दशावतारी नाट्यकलाकारांना मानसन्मान मिळत आहे. हेच दशावतारी कलाकारांचे यश आणि समाधान आहे, असे मत दशावतारी नाट्यकलाकार व्यक्त करीत आहेत. नाट्यरसिकांकडून दाद मिळत असली, तरी दशावतारी नाट्यकलाकारांना अपेक्षेप्रमाणे मानधन मिळत नाही. अशी खंतही या कलाकारांकडून ऐकायला मिळत आहे. नाट्यप्रयोगानिमित्त डिचोलीत आलेल्या नाईक दशावतारी लोकनाट्य मंडळाच्या काही कलाकारांशी आमच्या या प्रतिनिधीने संवाद साधला असता, या कलाकारांनी मनमोकळेपणे आपल्या मनातील विचार स्पष्ट केले.
(Dashavatari artists need the expected honorarium)
तर प्रेक्षकवर्ग वाढणार
कालोत्सव, जत्रा आदी उत्सवानिमित्त गोव्यातील बहुतेक भागात आजही दशावतारी (Dashavatari) नाट्यप्रयोग होत आहेत. बहुतेक भागात रात्री उशिरा नाट्यप्रयोग (Drama) सुरू करावे लागतात. त्यामुळे प्रेक्षक काहीसे कमी होत असले, तरी दर्दी प्रेक्षक दशावतारी नाटके आवर्जून पाहतात. समोर प्रेक्षकांची गर्दी आणि त्यांच्याकडून दाद मिळाली, की नाट्यकला फुलते, असे मत नाईक मोचेमाडकर दशावतारी मंडळाच्या कलाकारांनी मांडले.
आज प्रत्येकाचे जीवन व्यस्त बनले आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत जागरण करून नाटकांचा आस्वाद घेणे प्रेक्षकांना शक्य होत नाही. त्यामुळे नाटके लवकर सुरू झाली तर प्रेक्षकवर्ग निश्चितच वाढणार, असा विश्वास दशावतारी कलाकारांना आहे. आज वाहतुकीची अनेक साधने उपलब्ध झाल्याने एका गावातून दुसऱ्या गावात प्रवास करणे. दशावतारी कलाकारांना (Artist) सोपे बनले आहे. मात्र आम्हा कलाकारांना मिळणारे मानधन कमी आहे. अशी खंत या कलाकारांनी व्यक्त केली. प्रेक्षकांकडून मिळणारी दाद हेच आमचे समाधान आणि प्राप्ती आहे, असेही हे कलाकार म्हणतात.
आनंद वेगळाच
गोमंतभूमी ही कलाकारांची खाण आहे. अशा या गोमंतकात कला सादर करताना मिळणारा आनंद वेगळाच. गोव्यातील नाट्य प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद समाधानकारक आहे. प्रेक्षकांमुळे दशावतारी कलेला अजूनही गोव्यात चांगले दिवस आहेत.
-उल्हास नाईक, ज्येष्ठ कलाकार.
(नाईक मोचेमाडकर दशावतारी मंडळ).
दशावतारी नाटकांना गोव्यातील (Goa) नाट्यप्रेमींकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र मेहनत पाहता कलाकारांना मिळणारे मानधन त्यामानाने खूपच कमी आहे. तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष करून प्रेक्षकांना खूष करावे लागते.
-निलेश नाईक, ज्येष्ठ कलाकार.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.