Goa Pradesh Congress : आंतरराष्ट्रीय दाबोळी विमानतळावरील मालवाहू (कार्गो) पूर्णपणे मोपा विमानतळावर स्थलांतरीत करण्यासाठी राज्य सरकारचे जावई 'जीएमआर' कंपनीने केंद्र व राज्य सरकारवर दबाव आणत आहे. दाबोळीवरील विमान व कार्गो सेवा सुरु राहणार की नाही की मोपावर नेली जाणार? याचा खुलासा भाजप सरकारने करावा अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सदस्य एलविस गोम्स यांनी केली.
वास्को येथील पत्रकार परिषदेत वास्को काँग्रेस गटाध्यक्ष अँड. मेलविन फर्नाडीस, कुठ्ठाळी काँग्रेस गटाध्यक्ष पिटर डिसोझा, उपाध्यक्ष पिटर फर्नाडीस व नियाजी शेख उपस्थित होते.
"भाजप सरकार जनतेचे नसून उद्योगपतीच्या इशाऱ्यावर नाचणारे सरकार आहे. राज्य सरकार आपले जावई जीएमआर कंपनीच्या दबावापुढे दाबोळी विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमाने, कार्गो व देशांतर्गत विमाने पूर्णपणे मोपा विमानतळांवर स्थलांतर करण्याचे षडयंत्र रचित असल्याचा खळबळ जनक आरोप एलविस गोम्स यांनी केला.
जीएमआर कंपनीने मोपा विमानतळच्या शेजारील नागझर परिसरातील मोठ्या प्रमाणात जमिन खरेदी केली आहे. सरकारने मोपा विमानतळ पंचायत क्षेत्रातून वगळून तेथे विकास नियोजन प्राधिकरण(पीडीए) स्थापन केली आहे. दाबोळीतून एअर इंडिया, कतार कार्गो मोपावर गेल्यास दाबोळी विमानतळावरील उर्वरीत सर्व कार्गो कंपन्या आपला व्यवसाय भविष्यात मोपा विमानतळावर हलविणार असेही त्यांनी सांगितले.
भाजप सरकार मधील दाबोळीचे आमदार तथा वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर व कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वास यांनी दाबोळी विमानतळावरील आपले मत जनतेसमोर जाहीर करावे असे आवाहन गोम्स यांनी पत्रकार परिषदेतून केले.
मोपा विमानतळावरही व्यवसाय पाहिजे असेल तर सरकारने दोनही विमानतळांसाठी समान विमान सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी कांग्रेस गटाध्यक्ष अँड. मॅलविन फर्नांडीस यांनी केली.
काँग्रेस पक्ष दाबोळी विमानतळासाठी लढा देतच राहणार अशी माहिती पिटर डिसोजा यांनी दिली.
दक्षिण गोव्यातील हॉटेल व्यवसाय भाजप सरकार बंद करून मोपावर नेण्याचे षडयंत्र रचित असल्याची माहिती नियाजी शेख यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.