
पणजी: दिल्ली क्राईम ब्रँचचा पोलिस निरीक्षक असल्याचे सांगून गोव्यातील एका तरुणीकडून ४० लाखांची रक्कम ऑनलाईन जमा करण्यास लावून खंडणी वसुली व फसवणूक केलेल्या संशयित यारमला व्यंकटेश्वरलू (५३) याला गोवा सायबर कक्षाच्या पोलिस पथकाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आंध्रप्रदेशमधून अटक केली. पोलिसांनी तक्रारदाराकडून बँक खात्यावर ठेवलेली रोख रक्कमही गोठवून ताब्यात घेण्यात यश मिळवले अशी माहिती सहाय्यक पोलिस अधीक्षक अक्षक आयुष (आयपीएस) यांनी दिली.
सायबर क्राईमच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवोली येथील एका तरुणीला अज्ञाताने २६ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२४ दरम्यान व्हॉट्सअप मोबाईल क्रमांकावरून मेसेज पाठवला. त्यामध्ये त्याने आपण दिल्ली क्राईम ब्रँच पोलिस निरीक्षक असल्याचे नमूद केले होते. तिच्याविरुद्ध पोलिस तक्रार दाखल झाल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे पत्रही पाठवले होते.
हे प्रकरण मिटविण्यासाठी त्याने एक कोटी रुपये तीन वेगवेगळ्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितले होते. त्यापैकी तिने ४० लाख रुपये एका बँक खात्यावर जमा केले. अशाप्रकारे तिची फसवणूक करण्यात आली होती. फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच तिने सायबर क्राईमकडे तक्रार दाखल केली होती व सायबरक्राईम पोलिसांनी ही रक्कम खात्यावरून उकळण्याआधीच ती गोठवली.
सायबर क्राईम पोलिसांनी ज्या बँक खात्यात ४० लाखांची रक्कम जमा करण्यात आली होती, त्याचा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्या खातेधारकाचा शोध सुरू केला. तपासकामावेळी हे खाते आंध्रप्रदेश येथील विजयवाडा येथील यारमला वेंकटेश्वरलू याच्या नावावर असल्याचे उघड झाले.
पोलिस किंवा इडी अधिकारी असल्याचा दावा करणारे कॉल्स किंवा पैशांची मागणी करणाऱ्यांपासून जनतेने सावध राहावे. त्यांच्याकडून भीती दाखवली जाईल, मात्र त्याला न घाबरता या संदर्भात शहानिशा करा. पैसे हस्तांतरित करण्यापूर्वी संबंधित बँक खातेधारकाचे नाव तपासण्याचा किंवा ताबडतोब स्थानिक पोलिस स्थानकाशी संपर्क साधावा. यासंदर्भात आपल्या कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.