Cutbona Mobor
मडगाव: कुटबण मासेमारी जेटीवरील पाच कामगारांचा कॉलरामुळे मृत्यू झाल्यानंतर सरकारी यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्यासह दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन स्थितीचा आढावा घेतला. मात्र मत्स्योद्योग खात्याकडून या जेटीवरील स्थिती हाताळण्याच्या बाबतीत दुर्लक्ष झाल्याचे मान्य करण्यास वा त्याची जबाबदारी स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला. संबंधित घटकांचीही तेवढीच जबाबदारी असल्याचे हळर्णकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी कुटबण जेटीची पाहणी केली असता त्यावेळी त्यांच्यासमवेत उपस्थित राहू शकलो नाही कारण घरी गणेश चतुर्थीच्या उत्सवात व्यस्त राहिलो, असे हळर्णकर यांनी सांगितले. मासेमारीला १ ऑगस्टपासून सुरूवात झाल्यानंतर आपले खाते जेटींची आरोग्य केंद्राकडून तपासणी करून घेत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
माजी आमदार फिलीप नेरी हे मत्स्योद्योगमंत्री असताना संबंधित घटक आवश्यक बाबी का मार्गी लावू शकले नाहीत? असा सवाल त्यांनी एका प्रश्नावर बोलताना केला. दरम्यान, कुटबण व मोबोर जेटीवर कॉलराचे सुमारे पावणे दोनशे रुग्ण आढळू्न आलेले आहेत. त्यातील ३३ जणांवर उपचार सुरू आहेत.
कुटबण येथील मत्स्योद्योग खात्याच्या ३५ हजार चौरस मीटर जागेचे सीमांकन करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. त्यानंतर तेथे जी बेकायदेशीर झोपडीवजा घरे वा बांधकामे आहेत, ती जमीनदोस्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी सांगितले. तेथील चार बोटी उचलून काढाव्यात की ‘टो’ करून न्याव्यात याबाबत कॅप्टन ऑफ पोर्ट सर्वेक्षण करून निर्णय घेणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कुटबण मच्छीमार जेटीवर कॉलराचा उद्रेक झालेला आहे. आत्तापर्यंत १८० कामगारांना कॉलराची बाधा झाल्याचे उघड झाले आहे. त्यापूर्वी ही आकडेवारी १७५ एवढी होती. काल त्यात आणखी चार रुग्णांची भर पडली.
या साथीवर नियंत्रण आणण्यासाठी बोटमालकांनी सरकारला सहकार्य करावे, अन्यथा आम्हाला जेटी सील करावी लागेल, असा इशारा पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी दिला आहे. या जेटीवरील कित्येक कामगार सध्या गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचार घेत आहेत.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात चार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत कॉलरामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पण त्यातही दिलासा देण्यासारखी बाब म्हणजे, १ सप्टेंबरनंतर कुणाचाही मृत्यू झालेला नाही.
मजुरांचा जीव धोक्यात घालण्याबरोबरच सरकारी पैशांचा वापर करून मासळीमाफियांसोबत विदेश दौरे व सरकारी यंत्रणांचा गैरवापर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मत्स्योद्योगमंत्र्यांना त्वरित हटवावे. तसेच मत्स्यव्यवसाय खात्याच्या माजी संचालक शर्मिला मोंतेरो यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी केली. आज त्यांनी कुटबण जेटीवर जाऊन पाहणी केली व स्थानिकांशी परिस्थितीबाबत चर्चा केली.
स्थानिकांचे जे प्रश्न व समस्या आहेत, त्या संबंधित खात्यांतील अधिकाऱ्यांच्या कानावर घातल्या जातील. तसेच या समस्या सोडविण्याचा आपला प्रयत्न असेल, असे खासदार विरियातो यांनी सांगितले.
कुटबण जेटीवरील आस्थापनांवर वेगवेगळ्या खात्यांनी कारवाई हाती घ्यावी, असा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केल्यानंतर आज वजनमाप खात्याच्या अधिकाऱ्यांनी या जेटीवर जाऊन तेथे चालू असलेल्या विविध दुकानांची तपासणी केली. त्यापैकी तीन दुकानांमध्ये त्रुटी सापडल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला असल्याची माहिती खात्याकडून देण्यात आली.
जेटीवरील अब्दुल हमीद जनरल स्टोअर या आस्थापनाबरोबरच महादेव सुपर मार्केट आणि श्रीमती सांताना कार्दोझ यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या तिन्ही दुकानांत असलेली वजने योग्य प्रमाणात नव्हती.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मच्छीमार जेटीवरील देखरेख आणि उपाययोजनांचे पालन होते की नाही, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. त्यामुळे मी दररोज कुटबण, मोबोर तसेच इतर जेटींवरील स्थितीचा आढावा घेत आहे. कॉलराचा प्रादुर्भाव वाढत असून संबंधितांना उपाययोजना करण्यास सांगितले आहे. त्याचे काटेकोरपणे पालन न केल्यास जेटी सील करण्याचे अधिकार सरकारला असल्याचा इशारा पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी आज दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.