फोंडा: गोवा ऍग्रीकल्चरल प्रोड्यूस अँड लायव्हस्टॉक मार्केटिंग बोर्डच्या (गोवा कृषी पणन मंडळ) कुर्टी - फोंड्यातील बेतोडा रस्त्यावरील मार्केट यार्डमध्ये उभारण्यात आलेल्या मार्केटिंग प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील इमारत संकुलाचे उद्घाटन दसऱ्याच्या मुहुर्तावर रविवारी २५ रोजी दुपारी साडेअकरा वाजता करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणाऱ्या या उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, सहकारमंत्री गोविंद गावडे, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, फोंड्याचे आमदार रवी नाईक तसेच कुर्टी - खांडेपार सरपंच श्रावणी गावडे आदी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला गोवा कृषी पणन मंडळाचेअध्यक्ष प्रकाश वेळीप, उपाध्यक्ष प्रेमानंद म्हांबरे तसेच सचिव हरिश्चंद्र गावडे यांची उपस्थिती असेल. कुर्टी येथील या कृषी पणन मंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील इमारत संकुलाच्या उद्घाटनासंबंधीची माहिती फोंड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी अध्यक्ष प्रकाश वेळीप, संचालक तथा मार्केट यार्डचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद वैद्य, संचालक विकास प्रभू, सचिव हरिश्चंद्र गावडे व सहसचिव गौतम बेणे आदी उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारकडून या प्रकल्पासाठी निधी संपादित करण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले होते. आता दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन होत असून राज्यातील कृषी उत्पादनाला तसेच शेतकरी वर्गाला हक्काचे स्थान आणि कृषी मालाला चांगले विक्री स्थान मिळावे यासाठी या प्रकल्पाची आखणी आणि उभारणी करण्यात आली असल्याचे प्रकाश वेळीप यांनी सांगितले.
मार्केट यार्डमध्ये उभारण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील इमारत संकुलाचा खर्च १३ कोटी ११ लाख होता, तर आता दुसऱ्या टप्प्यातील इमारत संकुलाचा खर्च १९ कोटी ४९ लाख रुपये आहे. एकूण ३२ कोटी ६० लाख रुपये या दोन्ही प्रकल्पांवर खर्च करण्यात आले आहेत. राज्यातील कृषी उत्पादन वाढवणे आणि शेतकऱ्यांना चांगला दर देण्यासाठी गोवा कृषी पणन मंडळाच्या राज्यातील विविध मार्केटयार्डमध्ये विविध उपक्रम आखले जातात, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. दरम्यान, केंद्र सरकारच्या नवीन कृषी धोरणाचा लाभ शेतकऱ्यांना होणार असल्याचा दावाही यावेळी प्रकाश वेळीप यांनी केला. मार्केट यार्डमध्ये मागच्या काळात आयोजित साप्ताहिक ऍग्रो बाजारची संकल्पना नव्याने राबवण्याची शक्यताही यावेळी दुर्गाप्रसाद वैद्य यांनी व्यक्त केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.