Goa Politics: खरी कुजबुज; सेक्स स्कँडल ‘जॉब स्कॅम’च्या मार्गाने जाणार?

Goa Latest Political News: सहकारी कर्मचाऱ्यांनी केक आणला म्हणून कार्यालयात कापला काय, की जाणूनबुजून केक आणायला लावला आणि कार्यालयातच वरिष्ठ लिपिकाने वाढदिवस साजरा केला, तोही थाटात.
Khari Kujbuj
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

सेक्स स्कँडल ‘जॉब स्कॅम’च्या मार्गाने जाणार?

‘दुधाने तोंड पोळल्यावर ताकही फुंकून पितात’ ही म्हण आपण ऐकली असली तरी त्यातून बोध घेतलेला नाही. राज्यात आज सेक्स स्कँडल गाजत आहे. यात एकाला अटक झाली आहे. क्राईम ब्रँच या प्रकरणाचा तपास करणार आहे. मात्र, ज्या प्रमाणे राज्यात ‘जॉब स्कॅम’ गाजले होते व त्या नंतर आरोपी पूजा नाईक व इतर ज्यांची नावे या प्रकरणात पुढे आली होती त्याचे काय झाले? करोडो रुपये लुटणाऱ्यांना काय शिक्षा झाली? आता सेक्स स्कँडलची स्थिती ‘जॉब स्कॅम’ च्या मार्गाने जाणार का? अशी भीती आम जनता व्यक्त करीत आहे. आरोपीला अटक केल्याने हे प्रकरण संपणार नाही, आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे व पीडितांना योग्य न्याय मिळायला हवा. मात्र याची हमी कोण देणार? ∙∙∙

लिपिकाची वाढली चिंता!

सहकारी कर्मचाऱ्यांनी केक आणला म्हणून कार्यालयात कापला काय, की जाणूनबुजून केक आणायला लावला आणि कार्यालयातच वरिष्ठ लिपिकाने वाढदिवस साजरा केला, तोही थाटात. आणि त्या वाढदिवसाची ‘खरी कुजबूज’ गोमन्तक’मध्ये प्रसिद्ध झाली आणि बंदर कप्तान खात्याच्या पहिल्या मजल्यावरील कार्यालयात याविषयी दबक्या आवाजात मोठी चर्चा सुरू झाली. वाढदिवस साजरा झाला, त्यादिवशी म्हणे बंदर कप्तानचे कॅप्टन रजेवर होते. त्यामुळे सरकारी आदेश डावलून कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ लिपिकाचा वाढदिवस साजरा करण्याचा बेत आखणारे कोण? हा प्रश्न उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे ‘गोमन्तक’मध्ये कुजबूज आली म्हणून संबंधितांनी आपल्या मित्रपरिवाराकडून प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या माध्यमातून ‘खरी कुजबुज'' देणारा कोण याची माहितीही घेतली, पण त्यात त्याला किती यश आले हे त्यालाच माहीत. परंतु लिपिकाची चिंता वाढली ती आदेश डावलल्यामुळे सरकारी बडगा उगारला जाण्याची. ∙∙∙

पर्यटकांचा असाही रंग

कांदोळीच्या गजबजलेल्या रस्त्यावर पर्यटकांनी गाडी धडकवली आणि त्यानंतर ‘सॉरी’ऐवजी थेट वादाचा गियर टाकत संपूर्ण वाहतूक ठप्प केली. जणू अपघात कमी आणि तमाशा जास्त! स्थानिकांशी हुज्जत घालताना रस्ता कोणाचा आणि जबाबदारी कोणाची, याचा विसर पडल्याचे चित्र दिसले. शेवटी बिचाऱ्या प्रवाशांना मात्र या ‘वादसंस्कृती’चा फटका बसत तासन्‌तास अडकून बसावे लागले. प्रश्न एवढाच गोव्यात येताना काही जण सुट्ट्या घालवायला येतात की संयम आणि नियम घरीच ठेवून येतात? ∙∙∙

आणि ठाकरे वाकले!

शिगमा सरला तरी कवित्व उरते, असे म्हणतात ते खरे.पोट निवडणुकीचे कारण सांगून विधानसभेचे सत्र कमी केल्याने विरोधी आमदारांनी विधानसभेत आवाज उठविला.मात्र गोवा फॉरवर्ड पक्षाच्या आमदाराने इतर सहा विरोधी आमदारांबरोबर सभात्याग न केल्याने विरोधी आमदारांनी विजय सरदेसाई यांच्यावर टीका केली. विरोधी पक्ष नेत्यांनी तर गोवा फॉरवर्ड पक्षाच्या नेत्यांना ‘ज्युदास’ ची उपमा दिल्याने विरोधकांत फूट पडली. युरीने ‘ज्युदास’ म्हटले ते युरीचे विचार काँग्रेस पक्षाला त्याचे सोयर सुतक नाही व काँग्रेस पक्ष युरीच्या मताशी सहमत नसल्याचे वक्तव्य करून माणिकराव ठाकरे यांनी प्रकरण आणखी चिघळविले.मात्र, काँग्रेस पक्षाला विजयाची नाही, तर युरीची भूमिका महत्त्वाची आहे, हे लक्षात आल्यावर माणिकराव ठाकरे यांनी ‘यू टर्न’ घेत आपले वक्तव्य सौम्य केले. ∙∙∙

फॉरवर्डचा ‘डाव’ ठाकरेंनी उलटवला

गोवा काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे म्‍हणजे महाराष्‍ट्राच्‍या राजकारणातील ‘चाणाक्ष’ राजकारणी. काँग्रेसशी प्रामाणिक रहात ठाकरेंनी पक्षात आणि महाराष्‍ट्रातील काँग्रेस सरकारांत अनेक पदे भूषवली आहेत. थंड डोक्‍याने राजकारण करणाऱ्या आणि सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांच्‍या नेत्‍यांचीही मने जिंकणाऱ्या ठाकरेंना गोवा फॉरवर्डने विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांना ‘मध्‍ये’ आणून ‘शह’ देण्‍याचा प्रयत्‍न सुरू केला होता. पण, ठाकरेंनी मंगळवारी युरी आणि विजय सरदेसाई यांच्‍यातील वादाबाबत सुरुवातीला युरींची आणि नंतर युरींनी वापरलेल्‍या अपशब्‍दांबाबत विजय यांची बाजू घेत ‘राजकारण’ कशाला म्‍हणतात, हे दाखवून दिले. ठाकरेंच्‍या भूमिकेनंतर गोवा फॉरवर्डने आपल्‍यासाठी हा विषय संपल्‍याचे जाहीर केले. त्‍याचवेळी ठाकरेंनी याच विषयावर दुसऱ्यांना स्‍पष्‍टीकरण का आणि कशासाठी दिले असेल? हे विजय आणि गोवा फॉरवर्डच्‍या पदाधिकाऱ्यांना निश्‍चितच कळाले असेल... ∙∙∙

Khari Kujbuj
Goa Politics: खरी कुजबुज; भाजपावाले गोंयकार नाहीत?

विक्रेत्यांच्या जागांचे मोजमाप का अडवता?

मडगाव मधील न्यू मार्केट व गांधी मार्केटमधील व्यापारी जी जागा वापरतात त्याचे मोजमाप प्रक्रिया नगरपालिकेतर्फे सुरु करण्यात आली आहे. मात्र काही जण या मोज मापाला सोपो दर वाढीच्या नावाखाली अडवणूक करतात. प्रत्यक्षात दोन्ही मार्केटमधील विक्रेते नगरपालिकेत नोंद आहे त्यापेक्षा जास्त जागा वापरतात. मात्र सोपो कमी जागेसाठी देतात असे दिसून आले आहे, मात्र हे कोणाच्या आशिर्वादाने हे सर्व मडगावकरांना माहीत आहे. त्यातच गांधी मार्केट व्यापाऱ्यांचा नेता व माजी मंत्री बाबू आजगावकर सुद्धा व्यापाऱ्यांच्या जागांच्या मोजमापाला अडथळा आणत आहे. हे नेमके कशासाठी? एका बाजूने नगरपालिकेवर टिका करायची व दुसऱ्या बाजुने व्यापाऱ्यांचा कैवारी म्हणून त्यांच्या गैरप्रकाराला पाठिंबा द्यावा हा दुटप्पीपणा कशासाठी? असे केल्याने नगरपालिकेचा महसूल वाढेल कसा याचा विचार करायला नको का अशी चर्चा सध्या मार्केटमध्ये व इतरत्र चालू आहे. जर मोजमाप योग्य प्रकारे केले तर सोपो गोळा मध्ये सुसुत्रता येईल. नाही का! ∙∙∙

Khari Kujbuj
Goa Politics: खरी कुजबुज; आधी घ्यायचा फायदा; नंतर...!

‘त्या’ शिक्षकांचे काय?

परीक्षेत कॉपी मारताना दोन विद्यार्थी रंगेहात पकडले गेले आणि त्यांना थेट ‘शून्य’चा प्रसाद मिळाला... पण खरी गंमत पुढेच सुरू झाली म्हणे! ज्यांनी विद्यार्थ्यांना पकडलं त्या शिक्षकांवरच आता कारवाई सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे सध्या शाळांमध्ये एक भन्नाट प्रश्न फिरतोय ‘कॉपी करणं गुन्हा की कॉपी पकडणं?’ विद्यार्थ्यांना शून्य गुण दिले, पण शिक्षकांवर चौकशी सुरू...त्यामुळे काही जण म्हणतात, ‘असं असेल तर कॉपी करणं सुरक्षित आणि पकडणं रिस्की!’ काही अनुभवी शिक्षक तर आता कानातच सांगतात ‘तांत्रिक बाबींच्या खेळात विद्यार्थी शून्य गुणधारी झाले, पण नियम मात्र पूर्ण गुण घेऊन बसलेत!’ शिक्षण विभाग मात्र नेहमीप्रमाणे शांत... ‘कारवाई सुरू आहे’ या चार शब्दांपलीकडे काहीच बाहेर येत नाही. त्यामुळे सगळ्यांचे डोळे आता त्या कारवाईच्या निकालाकडे आहेत. नेमकं कोण पास होणार आणि कोण नापास होणार, हे सध्या शाळेबाहेरच्या ‘रिझल्ट’वर ठरणार आहे! ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com