
मडगाव: ४४२ वर्षांपूर्वी परकीय सत्तेच्या विरोधात धर्म रक्षण व देश रक्षणासाठी कुंकळ्ळीच्या १६ महानायकांनी दिलेला लढा हा देशातीलच नव्हे, तर पूर्ण आशिया खंडातील पहिला उठाव होता.
या उठावाला खरे तर भारताच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासात स्थान मिळणे आवश्यक होते. पण दुर्दैवाने हा जाज्वल्य असा इतिहास दीर्घकाळ अंधारात ठेवण्यात आला. तो जगासमोर येण्यासाठी ४०० वर्षे उलटावी लागली, ही खरेतर दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल, अशी प्रतिक्रिया कुंकळ्ळी चिफटन्स् मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष ऑस्कर मार्टिन्स यांनी व्यक्त केली.
या ऐतिहासिक उठावाचा उद्या १५ जुलै रोजी ४४२ वा वर्धापन दिन साजरा होत असताना त्या दिवसाच्या पूर्वसंध्येस ‘गोमन्तक’ टीव्हीच्या ‘साश्टीकार’ या कार्यक्रमात घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीत मार्टिन्स यांनी ही खंत व्यक्त केली.
ते म्हणाले, गोव्याच्या मुक्ती लढ्यात असोळणा, वेळ्ळी आणि कुंकळ्ळीतील लोकांनी भाग घेतला. या एव्हीसीच्याही इतिहासाला अजूनही संपूर्ण न्याय मिळायचा बाकी आहे. ही मुलाखत गोमन्तकचे ब्युरो चीफ सुशांत कुंकळयेकर यांनी घेतली असून ही मुलाखत गोमन्तकच्या फेसबुक, यू-ट्यूब आणि इन्स्टाग्रामवर पहाण्यास उपलब्ध आहे.
हा इतिहास जगासमोर आणण्यासाठी आम्हांला बरेच प्रयत्न करावे लागले. हा आशिया खंडातील पहिला उठाव हे सिद्ध करण्यासाठी आम्हांला पोर्तुगालातून कागदपत्रे मिळवावी लागली.
शिकागो विद्यापीठात त्यावेळी अध्यापन करत असलेले स्व. डॉ. वेरेझिमो कुतिन्हो यांनी पोर्तुगालातील आपल्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने ही कागदपत्रे मिळवून ती जगभरातील प्रसार माध्यमातून इतिहास संशोधकापर्यंत पोहोचवली. त्यामुळेच कुंकळ्ळीच्या या १६ महानायकांच्या उठावाची माहिती जगभरात पसरू शकली असे त्यांनी सांगितले.
सध्या या उठावाला गोवा सरकारने राजमान्यता दिली असून केंद्र सरकारनेही या उठावाला देशमान्यता दिली आहे. या उठावाची माहिती ९ वी आणि ११ वीच्या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचली आहे. या लढ्याला जगमान्यता मिळावी यासाठी आम्ही लवकरच जागतिक स्तरावरील माहितीपट तयार करणार आहोत, असेही ते म्हणाले.
सोळाही महानायकांना गोव्यातील आद्य हुतात्मे म्हणून मान्यता देण्यात यावी, ही आमची मागणी असून सरकारने ती मान्य करावी, असे मार्टिन्स यांनी सांगितले. ज्या असोळणा किल्ल्यात या १६ महानायकांनी हौतात्म्य स्वीकारले तिथे आज किल्ल्याचे अवशेष अस्तित्वात नाहीत. मात्र इतिहास संशोधकांना आणि इतिहासप्रेमींना या आद्य उठावाची माहिती मिळावी, यासाठी गोवा सरकारने या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत प्रतीकात्मक किल्ल्याची मांडणी करावी, अशी मागणीही मार्टिन्स यांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.