Cuncolim Residents Over Pollution In IDC
मडगाव: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील जल, वायू प्रदूषणामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. यासंदर्भात सरकारकडे तक्रार करूनही दखल घेतली नाही,असे पत्र कुंकळ्ळीवासीयांनी एनजीटीला पाठवले आहे.
आता कुंकळ्ळीतील नागरिकांनी राष्ट्रीय हरित लवाद (एनजीटी)कडे तक्रार करत याची दखल घेण्याची मागणी केलेली आहे. आज या आंदोलनाचे निमंत्रक कबीर मोराईस यांनी ईमेलद्वारे ‘एनजीटी’ला तसे पत्र पाठविले आहे.
कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाचा त्रास स्थानिकांना होत आहे. यासंदर्भात कुंकळ्ळीतील रहिवाशांनी यापूर्वी आंदोलने केलेली आहेत. प्रदूषण कमी करण्याच्या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते तथा आमदार युरी आलेमाव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांसह आयडीसीतील प्रदूषणाची पाहणी केलेली होती. यानंतर चार प्रदूषणकारी युनिटवर कारवाई करण्यात आलेली होती. मात्र, दंड भरून अटी, शर्तींवर त्या चारही युनिटसना पुन्हा सुरू करण्याची परवानगी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात आली.
प्रदूषणावर ठोस व कायमस्वरुपी उपाययोजना न केल्यास जनआंदोलन छेडू,असा इशाराही यानंतर कुंकळ्ळीतील नागरिकांनी दिला आहे. आता नागरिक कबीर मोराईस यांनी राष्ट्रीय हरित लवादाला ई मेल पाठवून कुंकळ्ळी आयडीसीतील प्रदूषणाची माहिती दिली. तसेच हे प्रदूषण कमी करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून उपाययोजना होत नसल्याचेही कळवले आहे.
आयडीसीतील प्रदूषणाबाबत यापूर्वी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, राज्यपाल, स्थानिक आमदार, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ या सर्वांना वेळोवेळी माहिती दिली. पण ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाने पर्यावरणाच्या हानीसह मानवी जीवनाला धोका होणाऱ्या प्रदूषणाबाबत कारवाई करावी. प्रदूषण कमी होण्यासाठी कचरा प्रक्रिया प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, प्रदूषण कमी होण्यासाठी आवश्यक नियमांचे व अटींचे पालन बंधनकारक करावे व स्थानिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी कुंकळ्ळीतील नागरिकांकडून करण्यात आलेली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.