कुर्टी परिसरात मगरींचा बिनधास्त वावर

बिबट्यांसह, गवेही दृष्टीस; फोंडा तालुक्यात, डोंगर झाडे कापल्याचा परिणाम
crocodile in Curti Ponda
crocodile in Curti PondaDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा : वन्य अधिवास आता हळूहळू लोकवस्तीकडे सरकायला लागला असून बिबट्यांचा आणि गव्यांचा वावर रानांपेक्षा लोकवस्तीकडे जास्त दिसत असतानाच आता मगरी बिनधास्तपणे शहर परिसरातील छोट्या ओहोळातही दृष्टीस पडू लागल्या आहेत. कुर्टी - फोंड्यातील नागझर आणि बेतोडा भागातील नाल्यांत तसेच खांडेपार नदीत विशेषतः जुन्या पुलाच्या बाजूला तर दिवसाढवळ्या मगरी बिनधास्तपणे वावरताना दिसत आहेत. त्यामुळे स्थानिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

फोंडा शहरातील सर्वांत मोठ्या नाल्यांत एकाचवेळी तीन मगरींचा वावर स्थानिक रहिवाशांच्या नजरेस पडला असून एक मगर तर चक्क तासभर नागझर - कुर्टीतील नाल्याच्या पाणी नसलेल्या पृष्ठभागावर निवांत पडून होती. या नाल्याच्या जवळून रस्ता गेला असल्याने वाहनांच्या वर्दळीचा कोणताही परिणाम या मगरीवर जाणवला नाही.

या नाल्याच्या बाजूला शेत जमीन असून काही शेतकरी या शेतीत भाज्यांचे पीक काढतात. फक्त पावसाळ्यात तेवढी ही शेतजमीन वापरात आणली जात नाही, एरव्ही विविध भाज्यांचे पीक काढण्यासाठी शेतकरी कायम या शेतीत राबत असतो. शेतीच्या जवळून गेलेल्या नाल्याचे साफ पाणी शेतीसाठी वापरले जाते, मात्र आता या नाल्यातच मगरींचा वावर दिसल्याने शेतकऱ्यांनी सावध भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात या मगरींचे दर्शन हमखास या भागात होत असते, असे कुर्टी हाऊसिंग बोर्ड भागातील नागरिकांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

crocodile in Curti Ponda
Top 5 Goa News | गोंयच्यो 5 मुखेल खबरो (20th May 2022)

फोंडा तालुक्यात सध्या वन्य प्राण्यांचा बिनधास्त वावर सुरू आहे. दोन महिन्यांपूर्वी सीमेपाईण - म्हार्दोळ भागात एक बिबट्या सापडला होता. जखमी झाल्याने या बिबट्याने एका घराच्या खोपीत आश्रय घेतला मात्र तेथेच तो मरण पावला. त्यापूर्वी बेतोडा - बोरी बगल मार्गावर एक बिबट्या अज्ञात वाहनाची धडक बसल्याने मरण पावला होता. कवळे - ढवळी - बोरी डोंगर परिसरात तर बिबट्यांची कायम दहशत असते. अन्य बऱ्याच ठिकाणी बिबट्यांचा वावर असून मडकई - कुंडई भागात तर रात्रीच्यावेळी वाघांच्या डरकाळ्यांचा आवाज ऐकू येतो, असे स्थानिकांनी सांगितले.

दुसरीकडे फोंडा तालुक्यातील काही रस्त्यांवर तर गवे अधूनमधून फेरफटका मारताना दिसतात. वर्षभरापूर्वी कुर्टी येथील पेट्रोलपंपच्या जवळ सहा गव्यांचा कळप बिनधास्तपणे वावरताना दिसला होता. त्यानंतर कुर्टी, सपना पार्क परिसरातही गवे दिसले, मात्र अलीकडच्या सहा महिन्यांत या भागातील गव्‍यांचा वावर दिसेनासा झाला आहे, मात्र बेतोडा - निरंकाल रस्त्यावर मध्येच गवे बसलेले आढळतात, असे काही दुचाकीस्वारांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com