Crime News : पणजी, राज्यात विविध गुन्हेगारी कारवायांमधील दवर्ली येथील सराईत गुन्हेगार महमद सर्फराज याला अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या (एएनसी) पोलिसांनी सापळा रचून शुक्रवारी (ता.२४) शिवोली येथे अटक केली.
त्याच्याकडून ८ लाख १० हजार रुपयांचा ड्रग्ज जप्त करण्यात आला. त्यामध्ये गांजा, एमडीएमए व एलएसडी द्रव्यपदार्थ यांचा समावेश आहे. न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
किनारपट्टी परिसरात संशयित महमद सर्फराज हा ड्रग्ज विक्रीच्या व्यवसायात गुंतला असून त्याने काही ड्रग्ज विक्रेत्यांची नियुक्ती केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे गेल्या काही आठवड्यापासून ते त्याच्या शोधात होते. शिवोली, हणजूण व वागातोर या किनारपट्ठी भागात त्याच्या ड्रग्जच्या कारवाया वाढल्या होत्या. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत त्याला अटक करण्यासाठी
सापळा रचण्यात आला होता, त्यामध्ये तो सापडला. त्याच्याजवळ २ किलो गांजा, १५ ग्रॅम एमडीएमए व ४.६१ ग्रॅम एलएसडी द्रव्यपदार्थ मिळाला. पोलिस अधीक्षक बोसेट सिल्वा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सजिथ पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली या कक्षाच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांची होती नजर
संशयित महमद सर्फराज हा तोलेबांध-दवर्ली येथील रहिवासी आहे. तो अनेक गुन्ह्यामध्ये असून त्याच्याविरुद्ध विविध पोलिस स्थानकात गुन्हे नोंद आहेत.
त्याच्या कारवाया हणजूण व वागातोर या भागात सुरू असल्याची माहिती मिळाली होती. तेव्हापासून अमली पदार्थविरोधी कक्षाच्या पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.