पणजी : राज्यात दिवसेंदिवस विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. गेल्या अडीच महिन्यांत राज्यातील पोलिस ठाण्यात विविध प्रकारच्या जवळपास ४० प्रकरणांची नोंद झाली असून, यात चोरी, मारामारी, अमलीपदार्थ विक्री, सामाजिक माध्यमांद्वारे फसवणूक, दारूची तस्करी, आयपीएल सट्टा, बेकायदा कॅसिनो, बनावट नोटा आदींचा समावेश आहे.
गेल्या अडीच महिन्यात उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा अशा दोन्ही जिल्ह्यांत १३ चोऱ्यांच्या घटना घडल्या आहेत. तर अमलीपदार्थ प्रकरणी १० गुन्हे नोंद झाले आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीला पणजीतील एका कुरिअर कंपनीतून १.३७ लाख रुपयांच्या तब्बल १०७ मोबाईलची चोरी झाली. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेस ताब्यात घेतले होते. सुकूर-पर्वरी येथील देवश्री गार्डन या रहिवाशी संकुलात घरफोडीची घटना घडली. म्हापसा पोलिसांनी ३ मार्च रोजी एका नायजेरियन युवकास अटक करून सुमारे ३ लाख रुपयांचे कोकेन जप्त केले होते.
7 मार्च रोजी मडगाव येथे दारू तस्करी करणाऱ्या दोघांना अटक झाली. पिरोडोंगरी-वास्को येथे सोन्याचे ब्रेसलेट चोरीप्रकरणी एकास अटक झाली होती; तर हळदोणा येथील एका बारमालकावर पूर्ववैमनस्यातून जीवघेणा हल्ला झाला होता. 17 मार्च दरम्यान गुन्हा अन्वेषण विभागाने छापा टाकून सांगोल्डा येथील हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा भांडाफोड केला होता. रंगपंचमी दिवशी कोडार-बेतोडा येथील एका युवकास पोलिसांनीच बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती.
विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर मुरगाव येथे भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली; तर केपे येथे राजकीय पक्षाचे फलक फाडल्यावरून तणाव निर्माण झाला होता. बिर्ला-झुआरीनगर येथे 1.10 लाखांचा अंदाजे 1 किलो गांजा जप्त करण्यात आला. पेडणे येथे सरकारी बांधकामावर असलेल्या कामगारास कंत्राटदारानेच मारहाण केल्याची घटना समोर आली. 30 मार्च दरम्यान कळंगुट येथील एका दाम्पत्यास जमिनीच्या व्यवहारातून तब्बल अडीच कोटी रुपयांना गंडवल्याची घटना उघडकीस आली; तर मडगाव कोकण रेल्वे पुलाखाली उत्तराखंड येथील एका युवकास 4.8 लाखांच्या गांजासह अटक करण्यात आली. वडलेभाट-वेर्णा येथे उत्तर प्रदेशातील एका तरुणास 3.78 लाखांच्या गांजासह ताब्यात घेण्यात आले.
२ एप्रिलच्या दरम्यान मडगावातील जामा मशिदीसमोर मारहाण केल्याप्रकरणी तिघांना अटक झाली. फोंडा-माशेल बसस्थानक पसिरात सव्वा लाखाच्या गांजासह एका बिहारी व्यक्तीस अटक करण्यात आली. एकतानगर-हाऊसिंग बोर्ड, म्हापसा येथे एका युवकास जबर मारहाण मारहाण करण्यात आली तसेच त्यांची कारही फोडण्यात आली. 6 रोजी मडगाव येथे रेल्वे सुरक्षा दलाने राजस्थानहून आलेल्या युवकांकडून 4 किलो गांजा जप्त केला. तसेच त्याच्याकडून 2 पिस्तुलेही जप्त केली. 8 रोजी झारेवाडा-हणजूण येथे एका जपानी नागरिकास 3.20 लाखांच्या अमलीपदार्थासह ताब्यात घेण्यात आले.
पर्वरी पोलिसांनी चोरीप्रकरणी बंगळुरू येथून संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 2.77 लाखांच ऐवज जप्त केला. तसेच बोगस कॉलसेंटरद्वारे विदेशींना फसवणाऱ्या 5 जणांच्या मुसक्या आवळून 4 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. 17 दरम्यान पणजीतील तारांकित हॉटेलमध्ये चालणाऱ्या बेकायदा कॅसिनोवर कारवाई करून 27 लाख रुपयांसह 11 जणांना ताब्यात घेण्यात आले. पर्वरीत आयपीएल सट्टा घेणाऱ्या तिघांना दीड लाखांसह ताब्यात घेण्यात आले. परबवाडा-कळंगुट येथे 3 लाखांच्या गांजासह युवकास अटक झाली.
21 एप्रिल रोजी ताळगाव येथील एका बिल्डरकडून तब्बल 20 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्याच्या गुन्हा अन्वेषण विभागाने मुसक्या आवळल्या. मडगाव येथे महिलेच्या गळ्यातील दीड लाखांचे मंगळसूत्र लंपास करण्याची घटना घडली. पेडणेतील किनारी भागात झालेल्या चोऱ्यांप्रकरणी पोलिसांनी कर्नाटकमधील दोघांना 25 लाखांच्या ऐवजासह अटक केली; तर दिवसा शिकवणी आणि रात्री गांजाविक्री करणाऱ्यास मडगाव येथे 2.70 लाखांच्या गांजासह अटक करण्यात आली. करासवाडाहून वाळपईला जाणाऱ्या एका महिलेच्या पर्समधील सुमारे 6 लाखांचे दागिने लंपास करण्यात आले. या महिन्यात मरड-म्हापसा येथील चार दुकाने फोडून 70 हजारांचा माल लंपास झाला. बनावट नोटाप्रकरणी मडगाव येथे चौघांना अटक झाली तर आयपीएल सट्टा घेणाऱ्या पाचजणांना हणजूण पोलिसांनी अडीच लाखांच्या ऐवजासह अटक केली. 9 मे रोजी पणजी पोलिसांनी तरुणांना मारहाण करून त्यांचे मोबाईल लंपास करणाऱ्या कर्नाटक आणि मध्यप्रदेशमधील दोन तरुणांना अटक केली.
एप्रिल महिन्याच्या मध्यावर सायबर चोरट्यांनी चक्क राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांचे बनावट व्हॉट्सअॅप प्रोफाईल तयार केले. यावरून विविध क्षेत्रातील मान्यवरांना आणि राजकीय नेत्यांना संदेश पाठवून पैशांची मागणी केली. प्रवासात असताना मी कुठेतरी अडकलो आहे, मला तातडीने पैसे पाठवा असा, संदेश सायबर चोरट्यांनी अनेकांना पाठवला. हा प्रकार लक्षात येताच राजभवनने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.
राज्याचे नवे पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी एप्रिलमध्ये आपल्या पदाचा ताबा घेतला. यावेळी त्यांनी राज्यातील ड्रग्ज व्यवहाराची पाळेमुळे खणून काढू तसेच या व्यवसायात कार्यरत असलेल्या टोळ्या उद्ध्वस्त करू, अशी ग्वाही दिली होती. आयपीएस जसपाल सिंग हे गोव्यात येण्यापूर्वी दिल्लीचे विशेष पोलिस आयुक्त या पदावर कार्यरत होते. लॉस एंजलिस पोलिस खात्याकडून विशेष प्रशिक्षण घेतलेल्या सिंग यांनी शेतकरी आंदोलनवेळी दिल्ली सीमेवर उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. यापूर्वी त्यांनी गोव्यात उपअधीक्षक आणि पोलिस महानिरीक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे त्यांना गोव्याची चांगलीच माहिती आहे. जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या गोव्यात ड्रग्समाफियांनी हातपाय पसरले आहेत, ते छाटण्याचे आव्हान सिंग यांच्यापुढे आहे.
गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला पर्यटन व्यवसाय डबघाईला आलेला आहे. निकृष्ट पायाभूत सुविधा, अपघात प्रवण रस्ते, अनियमित पाणी आणि वीजपुरवठा, भटकी कुत्री आणि जनावरांचा प्रादुर्भाव, समुद्रकिनाऱ्यावरील कचरा आणि प्रचंड कर आकारणीमुळे पर्यटकांचा ओघ कमी होत चालला आहे. आता हाणामाऱ्या, बलात्कार, खून आणि वाढत्या चोऱ्यांमुळे चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. जुगार, वेश्याव्यवसाय आणि अमली पदार्थांमुळे गोव्याची ओळख आपण हरवत आहोत, असे सामाजिक कार्यकर्ते ॲड. आयरिश रॉड्रिग्स म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.