महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सलग दुसरा मोसम गोव्यातर्फे खेळत आहे, पण त्याला यंदा अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. त्यातच दुखापतग्रस्त झाल्यामुळे एलिट क गटातील रेल्वेविरुद्धच्या पुढील सामन्यासाठी त्याला विश्रांती देण्यात आली.
रणजी करंडक स्पर्धेत गोव्याची कामगिरी यंदा चांगली झालेली नाही. पाचपैकी तीन सामन्यांत त्यांचा पराभव झाला. दोन अनिर्णित लढतीतून त्यांनी चार गुणांची कमाई केली आहे. सोमवारी त्यांना पर्वरी येथे तमिळनाडूने सात विकेट राखून हरविले.
पूर्ण तंदुरुस्त नसल्यामुळे अर्जुन सोमवारी सकाळी गोव्याच्या संघासमवेत क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नाही. त्याने विश्रांती घेणेच पसंत केले. नंतर संध्याकाळी जाहीर झालेल्या संघात दुखापतग्रस्त अर्जुनला स्थान मिळाले नाही.
अर्जुनसाठी यावेळचा रणजी करंडक मोसम अपेक्षित ठरलेला नाही. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने ५ सामन्यात ८३.७५च्या सरासरीने फक्त ४ गडी बाद केले आहेत. तमिळनाडूविरुद्ध त्याला एकही विकेट मिळाली नाही. फलंदाजीत २ अर्धशतके नोंदविताना त्याने २२.११च्या सरासरीने १९९ धावा केल्या.
२०२२-२३ व २०२३-२४ मोसमात गोव्यातर्फे त्याने एकूण १२ रणजी सामन्यांत ५५.१२च्या सरासरीने १६ गडी बाद केले, तर एक शतक व दोन अर्धशतकांसह २३.४४ च्या सरासरीने ४२२ धावा केल्या. गतमोसमात रणजी पदार्पण संस्मरणीय ठरविताना त्याने पर्वरी येथे राजस्थानविरुद्ध शतक (१२०) झळकावले होते.
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट क गटात पंजाब व तमिळनाडूविरुद्ध सलग पराभव पत्करलेल्या गोव्याच्या संघात दोन बदल करण्यात आले. अनुभवी फलंदाज अमोघ देसाई व ऑफब्रेक गोलंदाज शुभम देसाई यांनी संघात पुनरागमन केले.
दुखापतग्रस्त डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर याला रेल्वेविरुद्धच्या पुढील लढतीसाठी विश्रांती देण्यात आली असून सलामीचा अपयशी ठरलेल्या ईशान गडेकर याला वगळण्यात आले. तमिळनाडूविरुद्ध १५ सदस्यीय संघात स्थान न मिळालेला महाराष्ट्रातील ‘पाहुणा’ राहुल त्रिपाठी यालाही संघात स्थान मिळालेले नाही.
गोवा क्रिकेट असोसिएशनच्या सीनियर निवड समितीने सोमवारी संघ निवड केली. गोव्याचा स्पर्धेतील सहावा सामना सूरत येथे रेल्वेविरुद्ध ९ जानेवारीपासून खेळला जाईल. जानेवारी २०२३ मध्ये थुंबा येथे केरळविरुद्ध अमोघ व शुभम गोव्यातर्फे शेवटचा रणजी सामना खेळले होते. ३१ वर्षीय अमोघ दीर्घानुभवी आहे.
त्याने ५२ सामन्यांत ३४च्या सरासरीने २८५६ धावा केल्या आहेत, यामध्ये ६ शतके व १३ अर्धशतकांचा समावेश आहे. अष्टपैलू चमक दाखवताना त्याने ३१ गडीही बाद केले आहेत. शुभमने गतमोसमात पदार्पण केले होते. २ सामन्यांत त्याने ४ विकेट टिपल्या आहेत.
यंदा रणजी करंडक स्पर्धेत ईशानला सूर गवसला नाही. ४ सामन्यांत त्याने १३.२८ च्या सरासरीने फक्त ९३ धावा नोंदविल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असूनही राहुल त्रिपाठीला व्यावसायिक या नात्याने गोव्यासाठी उपयुक्त योगदान देता आले नाही. त्याने ३ सामन्यांत १४.२०च्या सरासरीने ७१ धावा नोंदविल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.