

वास्को: कुठ्ठाळी मतदारसंघातील बिर्ला, झुआरीनगर येथील अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून वगळल्याने ‘टीएमसी’चे प्रदेश संयोजक मारियानो रॉड्रिग्ज यांनी या संबंधितांना योग्य न्याय न मिळाल्यास आपण वेळप्रसंगी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
‘एसआयआर’नंतर नवीन मसुदा मतदार यादीतून काहीजणांनी नावे वगळण्यात आल्याने सदर मतदार यादी चर्चेत आली. कुठ्ठाळी मतदार संघातील सात हजारांपेक्षा अधिकजणांची नावे वगळण्यात आली आहेत.त्यामध्ये झुआरीनगर,बिर्ला येथील मतदारांचा अधिक समावेश आहे.
सर्वसामान्य व गरीबांची नावे मतदार यादीतून वगळल्याबद्दल मारियानो रॉड्रिग्ज यांना संताप व्यक्त केला आहे. ‘एसआयआर’च्या नावाखाली निष्पाप नागरिकांना त्रास देणे, लोकशाही कमकुवत करणे हा एक पध्दतशीर डाव असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी ‘बीएलओ’लाही लक्ष्य केले.
या भागातील एका बीएलओने संबंधित मतदारांकडून मतदार यादीतून नाव वगळण्यासंबंधीचा अर्ज क्रमांक सात लिहून घेतला, जेणेकरून त्यांची नावे मतदार यादीतून हटवली जातील. हा एक डाव ‘बीएलओ’कडून खेळला गेल्याचा आरोप त्यांनी केला. कुठ्ठाळी मतदारसंघाच्या निवडणूक नोंदणी अधिकारी यांनाही लक्ष्य केले. झरी भागातील फ्रान्सिस कुलासो, सिल्वेरा यांची तेथे शेतजमीन आहे. तिथे राहतात. तथापि बीएलओने त्यांची नावे वगळल्याचे रॉड्रिग्ज यांनी सांगितले.
काही घरांतील पाचपैकी तीन तीनजणांची नावे वगळण्यात आलीत. तसेच एका घरातील तीन दिव्यांग युवकांचीही तसेच गोवा पोलिस दलात असलेल्या एका पोलिस शिपायाचे व लष्करात असलेल्या एका सैनिकाचे नावे वगळण्यात आले. गोव्यात जन्मलेल्या युवकांचीही नावे वगळल्याचा दावा त्यांनी केला.
याप्रकरणी आम्ही प्रथम जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करू. तेथे योग्य न्याय न मिळाल्यास गोवा राज्य निवडणूक आयोग व राष्ट्रीय निवडणूक आयोग यांच्याकडे दाद मागू. तेथेही योग्य न्याय न मिळाल्यास आम्ही उच्च न्यायालयात , सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी ठेवली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘एसआयआर’अंतर्गत अर्ज भरून दिल्यावर काहीजणांना नोटीसा आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी धावपळ करीत आपल्याकडील विविध कागदपत्रे पुराव्यादाखल दिली होती.त्यामुळे आपली नावे मतदार यादीत समाविष्ट होतील अशी आशा त्यांना होती.तथापी त्यापैकी बरयाचजणांची नावे वगळण्यात आली आहेत.त्यापैकी काहीजणांनी यासबंधीची कोणतीही माहिती नाही..खरे तर ज्यांची नावे वगळण्यात आलेली आहेत,त्यांना योग्य माहिती देण्याची गरज होती.
निदान बीएलओने त्यासंबंधी माहिती देण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता.तथापी बीएलओही आता मतदारांसमोर जाण्यास घाबरत आहेत. संबंधित मतदार बीएलओलाच नावे वगळण्यासंबंधी जबाबदार धरत आहेत.त्यामुळे नावे वगळण्यात आलेल्यांना कोणती उत्तरे द्यावीत या विवंचनेत काही बीएलओ आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.