मडगाव: केपे मतदारसंघातील राजकारण तापलेले असतानाच त्यात आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर (Deputy Chief Minister Babu Kavalekar) यांचे बंधू बाबल कवळेकर यांच्या ताकवाडा बेतूल येथील बांधकाम बेकायदेशीर असल्याची तक्रार दाखल झाल्यावर नाकेरी बेतूल येथील पंचायतीने काम बंद करण्याची नोटीस जारी केली आहे. दरम्यान कवळेकर यांनी ही नोटीस स्वीकारण्यास नकार दिल्याचे कळले असून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते शिर्डीला देवदर्शनासाठी गेल्याची माहिती प्राप्त झाली.
ताकवाडा नाकेरी येथे बाबल कवळेकर यांचा एक व्यावसायिक बांधकाम प्रकल्प उभा राहत असून या भागात राहणाऱ्या एस्तेलिता फेर्नांडिस यांनी पंचायतीकडे या बांधकामाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. हे बांधकाम उभारताना पुरेशी सेटबॅकसाठी जागा सोडलेली नाही आणि आपली पारंपारीक वाट बंद केल्याचे तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीची दखल घेत बेतूलचे सरपंच जुझे फेर्नांडिस यांनी 2 नोव्हेंबर रोजी या प्रकल्पाचे काम ताबडतोब बंद करावे असा आदेश जारी करताना हे बांधकाम उभारण्यासाठी पंचायत संचालनालयाने दिलेला ना हरकत दाखला आणि अन्य कागदपत्रे घेऊन सात दिवसांच्या आत पंचायत कार्यालयात सुनावणीसाठी हजर राहावे असे सांगण्यात आले होते. मात्र कवळेकर यांनी अजून ही नोटीस न स्वीकारल्याने पुढील कारवाई स्थगित झाली आहे. या कारवाई मागे निवडणुकीचे राजकारण असल्याचे सांगितले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.