कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कार्यालयात आले पण

Girish-Chodankar
Girish-Chodankar

पणजी

राजीनामा दिलेले कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर काल बऱ्याच दिवसांनी कॉंग्रेसच्या येथील मुख्य कार्यालयात आले खरे पण ते आपल्या कक्षात जाऊन बसलेच नाहीत. त्यांनी कक्षाबाहेरील एका छोटेखांनी बैठक कक्षात काही जणांना भेटणे पसंत केले. या प्रकारामुळे चोडणकर हेच प्रदेशाध्यक्षपदी रहावे अशी बहुतेक युवा नेत्यांची अपेक्षा असतानाही चोडणकर आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याचे दिसते.
जिल्हा पंचायत निवडणुक निकाल विश्लेषण आणि चोडणकर यांच्या राजीनाम्याबाबतचे म्हणणे जाणून घेण्यासाठी कॉंग्रेसचे राज्य प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी राज्याचा दोन दिवसांचा दौरा केला होता. त्या दौऱ्यानंतर चोडणकर यांनी कार्यालयाकडे पाठ फिरवली होती. त्यांच्या या भूमिकेमुळे पक्ष संघटनेची चाके रुतल्यागत थांबली आहेत. काल चोडणकर सायंकाळी अचानकपणे पणजीत आले. ते तडक पक्षाच्या कार्यालयात गेले. कर्मचाऱ्यांनाही ते येणार याची कल्पना नव्हती. ते आल्यावर कर्मचारी कक्ष उघडण्यासाठी गेले पण चोडणकर यांनी आपण आत जाणार नाही येथेच बसतो असे सांगत कक्षा शेजारील बैठक कक्षात बसणे पसंत केले. त्यांनी कृतीतून आपण आता प्रदेशाध्यक्षपदी राहण्यास खरोखरच इच्छूक नाही असे दाखवून दिले. ते आल्याचे समजल्यावर कार्यालयात आलेल्या काही कार्यकर्त्यांना ते भेटले.
कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी चोडणकर राहणार की नाहीत याकडे कॉंग्रेसच्या नेत्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.चोडणकर यांनी कार्यालयात येणे थांबवल्याने पक्ष संघटनेचे काम जवळजवळ ठप्प झाल्यातच जमा आहे. चोडणकर यांच्या कार्यकाळात संघटनेवर महत्त्वाची जबाबदारी मिळालेले युवा नेतेही गेले आठवडाभर तसे थांबा आणि पहा या भूमिकेत शिरले आहेत. त्यामुळे कॉंग्रेसकडून सरकारविरोधी जो आवाज ऐकू येत होता तोही थंडावल्यात जमा आहे. राव यांनी दौरा करून नेत्यांचे म्हणणे जाणून घेतले असले तरी प्रदेशाध्यक्षांच्या राजीनाम्यावर कोणताही निर्णय दिल्लीतून आलेला नाही.
यापूर्वीही चोडणकर यांनी राजीनामा दिला होता त्यावेळी तो नामंजूर झाला असे समजा व कामाला लागा असे प्रभारी राव यांनीच सुचित केले होते. त्यापूर्वीही चोडणकर सक्रीय होते व नंतर अधिक सक्रीय आपण होऊ असे त्यानी जाहीर केले होते. आजवर आपण केवळ पन्नास टक्के वेळ संघटनेसाठी देत होतो त्यात आता आपण वाढ करू आणि संघटना मजबूत करण्यासाठी तालुकावार दौरे करू, नव्या नेतृत्वाला संधी देऊ असे कार्यक्रम त्यांनी आखले होते.
याचदरम्यान जिल्हा पंचायत निवडणूक जाहीर झाली. कोविड महामारीमुळे टाळेबंदी आली. ती उठल्यावर आठ महिन्याने त्यावेळी झालेल्या प्रचाराच्या आधारे जिल्हा पंचायत निवडणुकीचे मतदान घेण्यात आले आणि कॉंग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. काही नेत्यांनी चोडणकर यांना यासाठी जबाबदार ठरवण्यासाठी अंगुलीनिर्देश करणारे वक्तव्य केले आणि चोडणकर यांनी पून्हा एकदा आपल्या पदाचा राजीनामा दिला. राव यांनी राज्यात येत जिल्हा पंचायत निवडणूक निकालाचे विश्लेषण केले आणि चोडणकर यांच्या राजीनाम्याबाबत मते जाणून घेतली. २-३ नेते वगळता इतरांनी हा पराभव म्हणजे सामूहिक जबाबदारी असल्याचे नमूद करून चोडणकर यांना एकट्यांना त्यासाठी जबाबदार धरता येणार नाही असे सुचित केले.
यानंतर राव यांनी दिल्लीला अहवाल पाठवू असे सांगत बंगळूरला प्रयाण केले. त्यांनी दिल्लीला अहवाल पाठवला की नाही याविषयी कोणालाच माहिती नाही. चोडणकर यांना पदावरून हटवले तर गटा तटाचे राजकारण पक्षात उसळू शकते याची पुरेशी कल्पना राव यांना आली होती त्यांनी तसे सुचक उद्‍गार गोव्यातून जाण्यापूर्वी काढले होते. त्यामुळे चोडणकर यांनाच तूर्त पदावर ठेवून राव यांनी लक्ष घालत पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करावेत आणि विधानसभा निवडणुकीला सहा महिने असताना नव्या नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे सोपवावीत असा तोडगा काढण्यावर एकमत झाले होते. त्याचे पुढे काय झाले समजलेले नाही. प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा मंजूर होणार की नाही याविषयी ठोस काही सांगितले जात नसताना चोडणकर यांनी कृतीतून आपणाला आता रस राहिलेला नाही हे आज दाखवून दिले आहे.

मी अद्याप प्रदेशाध्यक्षपदीच आहे. सोमवारी कॉंग्रेसचा स्थापनादिन आहे. त्यानिमित्तच्या कार्यक्रमातही मी असेन. पक्षासोबतच मी राहणार आहे.
गिरीश चोडणकर, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com