पणजी: क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी दावा केल्यानुसार कोटेशनशिवाय बांधलेला ताजमहाल पूर्ण होण्यासाठी 22 वर्षे लागली. आता इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीने वर्क ऑर्डर जारी केल्यापासून 24 तासांपेक्षा कमी कालावधीत फिफा अंडर -17 महिला विश्वचषक स्पर्धेसाठी अंदाजे रु.3.48 कोटीच्या कार्यक्रम व्यवस्थापनाचा चमत्कार करु शकणारा प्रस्ताव सादर करण्याची अपेक्षा गोवा क्रिडा प्राधिकरणाने ठेवल्याचा गंभीर आरोप कॉंग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.
(Congress Media Department Chief Amarnath Panajikar accused BJP in goa)
गोव्याच्या क्रीडा प्राधिकरणाने 9 सप्टेंबर रोजी स्थानिक दैनिकांमध्ये इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीजकडून प्रस्ताव निमंत्रित केलेल्या जाहिरातीचा संदर्भ देत अमरनाथ पणजीकर यांनी भाजप सरकारवर सार्वजनिक पैशाचा गैरवापर करून आणखी एक घोटाळा करण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप केला आहे.
गोवा क्रिडा प्राधिकरणाने फिफा सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या कार्यक्रम आयोजनासाठी इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सींकडून मागविलेल्या प्रस्तावासाठी सदर कामाच्या एकंदरीत कार्यक्षेत्राचा तसेच इतर तांत्रीक बाबींचा उल्लेखच नसल्याचे सांगुन, सरकारची निवीदा म्हणजे भाजपच्या "मिशन कमिशन" चे धोरण पूढे नेण्याचाच भाग आहे. एजन्सींना भ्रष्टाचार करण्यास वाव देण्यासाठीच सर्व काही खुले ठेवण्यात आले आहे असा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.
गोवा क्रिडा प्राधिकरणाने जारी केलेल्या जाहिरातीत कोणत्याही घटकाचा तपशील नसताना सदर कामासाठी 3.48 कोटींचा अंदाजे खर्च कोणत्या आधारावर काढला गेला असा सवाल अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.
प्रस्ताव मागण्याच्या सूचनेसोबत जोडलेल्या परिशिष्टांमध्ये गोव्याच्या क्रीडा प्राधिकरणाने जारी केलेले "फॅक्ट शीट" सूचित करते की सदर कामाची आर्थिक बोली 19 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी ३ वाजता उघडल्या जातील.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.