Karnataka Election Result 2023 : कर्नाटकात काँग्रेसला ‘संजीवनी’; कमळ कोमेजले

भाजपचा दारूण पराभव; दर पाच वर्षांनी ‘भाकरी’ फिरवण्याची प्रथा कायम : दिग्गज पराभूत
Basavaraj Bommai & Mallikarjun Kharge
Basavaraj Bommai & Mallikarjun KhargeDainik Gomantak
Published on
Updated on

Karnataka Election Result देशभरात अपवाद वगळता सत्तेला पारखे झालेल्या काँग्रेस पक्षाला कर्नाटकात मिळालेल्या विजयाने आज नवसंजीवनी मिळाली. सत्ताधारी भाजपला चारीमुंड्या चित करत काँग्रेसने 136 जागांवर विजय मिळवित बहुमतासाठी आवश्‍यक असलेला 113 जागांचा आकडाही सहज पार केला.

या पराभवाने दक्षिणेत हाती असलेले एकमेव राज्य भाजपने गमावले. राज्यात सलग दुसऱ्यांदा सत्तेवर येण्याचे भाजपचे स्वप्न येथील जनतेने धुळीला मिळवित दर पाच वर्षांनी सत्ताबदल करण्याची प्रथा कायम ठेवली.

दुसरीकडे किंगमेकर होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या धर्मनिरपेक्ष जनता दलालाही मतदारांनी सपशेल नाकारल्यामुळे त्यांचा अपेक्षाभंग झाला. सीमा भागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने दिलेली एकाकी झुंज अपयशी ठरली.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी कर्नाटकमधील विधानसभा निवडणूक भाजप आणि काँग्रेसने प्रतिष्ठेची केली होती. राज्यातील विधानसभेच्या 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदान झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह भाजपच्या सर्व दिग्गजांनी कर्नाटकात झंझावाती प्रचार केला होता.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि प्रमुख नेते बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ही निवडणूक लढविली असली तरी पंतप्रधान मोदी हेच भाजपचा चेहरा होते. मात्र काँग्रेसने राहुल गांधी, प्रियंका गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डी. शिवकुमार यांच्या माध्यमातून नियोजनबद्ध प्रचार करत विजयश्री खेचून आणली. भाजपच्या भ्रष्ट कारभाराच्या मुद्द्यांवर बोट ठेवत काँग्रेसने केलेल्या आवाहनास जनतेने जोरदार प्रतिसाद दिला होता.

विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना शुभेच्छा. निवडणुकीत आम्हाला समर्थन देणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टाचेही मला कौतुक आहे. येणाऱ्या काळात आपण कर्नाटकची अधिक जीव ओतून सेवा करू.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान.

काँग्रेसला भाजपपेक्षा दुप्पट जागांवर यश आले आहे. भाजपचा सपशेल पराभव करण्याची भूमिका कर्नाटकच्या जनतेने घेतली. सत्तेचा, साधनांचा गैरवापर आणि फोडाफोडी करुन आपण राज्य करु शकतो, याबाबत सत्ताधाऱ्यांना असलेला विश्वास, याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटली.

-शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्या भ्रष्ट जुमला पार्टीला कर्नाटकात नाकारले, हा तेथील जनतेचा विजय आहे. प्रचारात त्यांनी ''बजरंग बली''ला आणले, त्याचाही फायदा झाला नाही. कर्नाटकात काँग्रेस जिंकली असली तरी म्हादईचे पाणी कदापि वळवू देणार नाही.

- अमित पाटकर, प्रदेशाध्यक्ष, कॉंग्रेस.

Basavaraj Bommai & Mallikarjun Kharge
Karnataka Election Result 2023 : कर्नाटकातील काँग्रेसच्या बहुमतामुळे राज्यातील समीकरणं बदलणार- कार्लुस आल्मेदा

गोव्यात घोषणा, आतषबाजी आणि सेलिब्रेशन

काँग्रेसने कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यावर त्याचे पडसाद गोव्यातही उमटले. येथील कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत, आतषबाजी करत ढोल-ताशांच्या गजरात केक कापून जल्लोषात सेलिब्रेशन केले.

शनिवारी काँग्रेस भवनातील दूरचित्रवाहिनी संचासमोर बसून कार्यकर्त्यांनी निकाल ऐकला. निवडणुकीचा कल जसजसा सांगितला जात होता, तसतसा कार्यकर्त्यांमधील उत्साह वाढत होता.

यावेळी कॉंग्रेस भवनात प्रवक्ते विजय भिके, एल्विस गोम्स, ‘एनएसयूआय’चे नौशाद चौधरी, माजी आमदार प्रताप गावस या नेत्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

कॉंग्रेसला बहुमत मिळाल्याचे स्पष्ट झाल्यावर कार्यकर्त्यांनी केक कापून आनंदोत्सव साजरा केला. नंतर कार्यालयाबाहेर येत विजयाच्या घोषणा दिल्या आणि फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी कॉंग्रेस नेत्यांनी भाजपच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवली.

Basavaraj Bommai & Mallikarjun Kharge
फळांचा राजा येतोय सामान्यांच्या आवाक्यात

‘द कर्नाटक स्टोरी’ हे लोकसभा निवडणुकीचे कथानक आहे. राजकारणाला नवी दिशा देणाऱ्या विजयाबद्दल कर्नाटक काँग्रेसचे अभिनंदन. आगामी काळातही काँग्रेस पक्ष अग्रेसर राहील. लोकशाहीसह , भारतीय घटनेला प्रणाम. भाजपने ‘द स्टोरी ऑफ कॉमन मॅन’वर लक्ष द्यावे.

- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते.

कर्नाटक निवडणुकीमध्ये तेथील नेत्यांसह गोव्याच्या नेत्यांनीही प्रचार केला. मात्र, तेथील जनतेने दिलेला कौल आम्ही मान्य करतो. या निकालाची कर्नाटक राज्य स्तरावर आणि केंद्रीय स्तरावरही कारणमीमांसा केली जाईल. निवडणुकीत हार-जीत होतच असते.

- सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष, भाजप.

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीमध्ये तिथल्या जनतेने जो कौल दिला आहे, तो आम्हाला मान्य करावा लागेल. याबाबत आत्मपरीक्षण करण्याबरोबर संपूर्ण निकालाचे राष्ट्रीय स्तरावर चिंतन केले जाईल. मात्र, विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या असतात.

- श्रीपाद नाईक, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री.

Basavaraj Bommai & Mallikarjun Kharge
Goa Weather Updates : राज्यातील तापमानाबाबत 'ही' आहे महत्वाची अपडेट

‘द्वेषाचा बाजार उठला; प्रेमाची दुकाने उघडली’- राहुल गांधी

कर्नाटक विधानसभेतील कामगिरीबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आनंद व्यक्त करत तेथील जनता, पक्ष कार्यकर्ते आणि नेते यांचे आभार मानत त्यांचे अभिनंदनही केलेे.

कर्नाटकात ‘नफरत का बाजार’ बंद झाला असून ‘मोहब्बत की दुकानें’ उघडली असल्याचा भाजपला टोलाही हाणला. कर्नाटकातील विजयाची पुनरावृत्ती इतर राज्यांतही होईल, असा विश्‍वास राहुल यांनी व्यक्त केला.

काँग्रेसचा विजय दृष्टीपथात येताच राहुल गांधी यांनी मुख्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. मी कर्नाटक जनतेचे आणि कार्यकर्ते-नेत्यांचे आभार मानतो आणि त्यांचे अभिनंदनही करतो.

तिरस्काराची भाषा न वापरता आम्ही निवडणूक लढलो आणि जिंकलो, याचा मला आनंद आहे, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com