फोंडा: ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्यांची नावे पुढे येत असतानाच, आता आमदार गणेश गावकर यांच्या विरोधात कुळे पोलिस स्थानकात तक्रार देण्यात आली आहे. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपचा त्यासाठी आधार घेण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी सावर्डे मतदारसंघाचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष गणेश गावकर यांच्याविरुद्ध आज बुधवारी सकाळी कुळे पोलिसांत तक्रार दिली आहे. ताम्हणकर यांनी तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, एका वृत्तवाहिनीने प्रसारित केलेल्या ऑडिओ टेपवरून ही तक्रार देण्यात आलीय.
आमदार गावकर सावर्डे मतदारसंघातील एका कार्यकर्त्याकडून सहा लाख रुपये मागत असल्याचे म्हटले आहे. सरकारी नोकरीसाठी आपण मोन्सेरात नामक इसमाला कार्यकर्त्याच्या नोकरीसाठी सात लाख रुपये दिले होते. पैकी १ लाख रुपये या कार्यकर्त्याने गणेश गावकर यांच्याकडे दिले होते.
उर्वरित सहा लाख रुपये आमदार गावकर मागत असल्याचे ऑडओ टेपवरून स्पष्ट होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हे पैसे शाम नामक व्यक्तीकडे देणे, असेही त्यात म्हटले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची व्याप्ती पाहिल्यास राजकीय क्षेत्रातील मूळ सूत्रधारांची नावे बाहेर पडण्यास वेळ लागणार नाही, अशी चिन्हे आता दिसू लागली आहेत.
आमदार गणेश गावकर यांचा ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात सहभाग असल्याचा संशय व्यक्त करत, या प्रकरणाची निष्पक्षपाती चौकशी व्हावी, अशी मागणी सुदीप ताम्हणकर यांनी केली आहे. तक्रारीची प्रत इतर सर्व संबंधितांबरोबरच मुख्यमंत्र्यांनाही देण्यात आली आहे.
गावकर यांनी ताम्हणकर यांच्या तक्रारीमागे आपली बदनामी करण्याचा हेतू असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, ही ध्वनिफित ताम्हणकर यांना कशी मिळाली, याचीही चौकशी झाली पाहिजे. तक्रार करण्यापूर्वी त्यांनी ध्वनिफितीची सत्यासत्यता कशी पटवून घेतली, हेही समजले पाहिजे. या अंगाने तपासकाम व्हावे, असे मला वाटते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.