Competitive Exams : पणजी, गोमंतकीय विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षांमध्ये मागे पडत असल्याचे चित्र आहे, ही चिंतेची बाब आहे. पंतप्रधान रोजगार मेळाव्याअंतर्गत देशभरात १० लाख युवकांना नोकऱ्या देण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे, या योजनेअंतर्गत केवळ ६०० गोमंतकीयांना आतापर्यंत नोकरी मिळाल्या आहेत.
याकडे गांभिर्याने पाहणे गरजेचे असल्याचे मत राजकीय विचारवंत दत्ता खोलकर यांनी व्यक्त केले. गोमन्तकचे संपादक संचालक राजू नायक यांच्या सडेतोड नायक या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमात पशुसंवर्धन खात्याचे माजी संचालक डॉ. संतोष देसाई यांनीही सहभाग घेतला होता. ते गोमंतकीय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी व्हावेत यासाठी कार्य करतात.
२२ वर्षात एकही आयएएस अधिकारी नाही
देशातील प्रत्येक राज्य आपल्या राज्यातून अधिकाधिक आयएएस अधिकारी व्हावेत यासाठी प्रयत्नरत असतात. २००१ साली गोमंतकीय सुपुत्र आशुतोष तेली स्वतःच्या कतृत्त्वाच्या बळावर आयएएस अधिकारी झाला, परंतु त्यानंतर मागील २२ वर्षात एकही गोमंतकीय आयएएस होऊ शकला नाही ही शोकांतिका आहे.
आता राज्य सरकारने सर्व स्तरातील नोकर भरती ही परीक्षेच्या माध्यमातून करण्याचे ठरविले आहे याचा गोमंतकीय युवापिढीने विचार करणे गरजेचे असल्याचे मत दत्ता खोलकर यांनी व्यक्त केले.
केवळ २५ अधिकारी व ५० कारकून...
गोव्यात सुमारे ७६० राष्ट्रीयकृत बॅंकांच्या शाखा आहेत, परंतु यांमध्ये केवळ २५ अधिकारी व ५० कारकून गोमंतकीय आहेत. याचा अर्थ गोव्यातील विद्यार्थी हुशार नाहीत का...? गोव्यातील विद्यार्थी हुशार आहेत परंतु त्यांच्यामध्ये स्पर्धात्मक परीक्षांबाबत जागृती नाही.
ज्यावेळी मी बिहारमध्ये गेलो होतो तेथे ८ वीच्या विद्यार्थिनीला तू भविष्यात कोण होणार असे विचारले असता आपण आयपीएस अधिकारी होणार असल्याचे तिने सांगितले. ही प्रेरणा गोव्यातील आठवीतील विद्यार्थ्यांमध्ये रुजणे गरजेचे असल्याचे डॉ. संतोष देसाई यांनी सांगितले.
पालकांनी मानसिकता बदलावी
विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालकांचे योगदान महत्त्वपूर्ण असते. त्यामुळे पालकांनी आपले दायित्व ओळखून आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. जर गोव्याचे रघुनाथ माशेलकर, अनिल काकोडकर, अरविंद भाटीकर आदी यशस्वी होऊ शकतात तर आताची युवापिढी देखील ते साध्य करू शकते, हे त्यांच्या मनावर बिंबवणे गरजेचे आहे.
त्यांना मोबाईलमध्ये गेम्स खेळण्याव्यतरिक्त प्रेरणादायी व्हिडिओ दाखविणे, त्यांना योग्य मार्गदर्शक, पूर्वतयारीसाठी मदत करणे गरजेचे आहे. यासाठी सर्वप्रथम पालकांची मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे दत्ता खोलकर यांनी सांगितले.
आठवीपासूनच विद्यार्थ्यांना प्रेरित करणे आवश्यक
शैक्षणिक परीक्षा आणि स्पर्धात्मक परीक्षा हे दोन्ही प्रकार भिन्न आहेत. स्पर्धात्मक परीक्षेसाठी सर्वसामान्य ज्ञान, विविध कौशल्यांची गरज असते त्यासाठी आपण वाचन, मनन, चिंतन गरजेचे आहे. यासोबतच सातत्याचा अधिक महत्त्व आहे.
सरकारद्वारे अंतरंग फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू केले आहे, परंतु ते कितपत राज्यातील शाळांमध्ये राबविले जाते याबाबत साशंकता आहे. विद्यार्थ्यांना इयत्ता आठवीपासूनच स्पर्धात्मक परीक्षांसाठी प्रेरित करणे तसेच त्यांच्या योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचे डॉ. संतोष देसाई यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.