

म्हापसा: जमीन गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले म्हापशाचे माजी नगरसेवक तारक आरोलकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून चक्क तक्रारदाराला फोन करून खटल्यात तडजोड करण्याचा प्रयत्न केल्याचा कथित आरोप त्यांच्यावर झाला आहे.
याप्रकरणी हस्तक्षेप याचिकाकर्त्यांचे वकील ॲड. सिद्धार्थ सरदेसाई यांनी साहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. पी. फडते यांच्यामार्फत म्हापसा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. आरोपीकडून पुराव्यांशी छेडछाड व साक्षीदारांवर दबाव आणला जात असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
सुमारे ६० मिनिटांचे फोन संभाषण एका पेनड्राईव्हमध्ये नोंदवून, तक्रारदाराच्या अतिरिक्त जबानीसह ते न्यायालयासमोर सादर करण्यात आले आहे. दरम्यान, न्यायालयाने या अर्जावरील सुनावणी गुरुवार, ३ सप्टेंबर रोजी दुपारपर्यंत तहकूब ठेवली आहे. हा कथित दूरध्वनी कॉल मंगळवारी सायंकाळी कारागृहातून केल्याचा दावा करण्यात आला आहे.
न्यायालयीन कोठडीत असताना आरोपीकडे मोबाईल फोन पोहोचलाच कसा, हा गंभीर प्रश्न या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोलकर यांनी आपल्या नातेवाईकामार्फत तक्रारदाराशी संपर्क साधला आणि सुमारे तासभर चाललेल्या संभाषणात हे प्रकरण मिटवण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. हा केवळ कारागृह नियमांचा भंग नसून, थेट न्यायव्यवस्थेच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचा आणि खटला फिरवण्याचा प्रकार असल्याचे वकिलांनी नमूद केले.
म्हापसा पालिकेचे माजी नगरसेवक तारक आरोलकर यांच्यावर सुमारे ४० लाख रुपयांच्या जमीन गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल आहे. बार्देश तालुक्यातील आसगाव येथील एका जमिनीचे मूळ मालक नसतानाही, खोटी कागदपत्रे तयार करून ती जागा स्वतःची असल्याचे भासवत त्यांनी खरेदीदाराशी व्यवहार केला होता. जमिनीच्या विक्रीपोटी तक्रारदाराकडून ४० लाख रुपये उकळले; मात्र रक्कम मिळूनही त्यांनी अधिकृत विक्री करार करून देण्यास वारंवार टाळाटाळ केली. तपासात ही कागदपत्रे बनावट असल्याचे उघडकीस आल्यानंतर तक्रारदाराने रीतसर गुन्हा दाखल
केला.त्यानंतर गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने १९ ऑगस्ट २०२४ रोजी आरोलकर यांना अटक केली होती. या प्रकरणातील तक्रारदाराचे नाव पंकज बजाज आहे. सुरुवातीला सात दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने आरोलकर यांची रवानगी कोलवाळ कारागृहात न्यायालयीन कोठडीत केली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून, तुरुंगातूनच तक्रारदाराशी संपर्क साधल्याचा ऑडिओ समोर आल्याने आता त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
वकिलाने केला प्रकरणाचा पर्दाफाश
न्यायालय परिसराच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना ॲड. सिद्धार्थ सरदेसाई यांनी संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला. ते म्हणाले, “तारक आरोलकर यांच्या जामीन अर्जाविरोधात आम्ही न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता. दरम्यान, मंगळवारी आरोपीने न्यायालयीन कोठडीत असताना भावाच्या माध्यमातून तक्रारदाराशी संपर्क साधला आणि समझोता करण्याचा प्रयत्न केला. न्यायालयीन कोठडीत आरोपीला मोबाईल उपलब्ध होणे आणि त्यावरून तक्रारदाराला फोन जाणे, हा पुराव्यांशी छेडछाड तसेच साक्षीदारावर दबाव आणल्याचा थेट पुरावा आहे. या संपूर्ण कॉलचे रेकॉर्डिंग असलेला पेनड्राईव्ह आणि तक्रारदाराची अतिरिक्त जबानी गुन्हे शाखेला व न्यायालयाला सादर करण्यात आली आहे.”
आज पुढील सुनावणी
या प्रकाराचा जामीन अर्जावर थेट परिणाम होणार असून, न्यायालयाने तपास यंत्रणेकडून यावर अहवाल मागवला आहे. या प्रकरणावर गुरुवारी दुपारी पुढील युक्तिवाद होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.