Panjim: चोर्ला घाटमार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु रात्रीच्या वेळी मात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरूच आहे.
उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची पायमल्ली झाली आहे. नाक्यावरही योग्य तपासणी केली जात नाही, या वाहतुकीकडे पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे, त्यामुळेच अवजड वाहने थेट गोव्यात येत आहेत, अशी माहिती केरीतील ग्रामस्थांनी दिली.
उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार दत्तवाडी-साखळी जंक्शन ते चोर्ला घाट (गोवा हद्द), साखळी प्राथमिक आरोग्य केंद्र जंक्शन ते चोर्ला घाट (गोवा हद्द), होंडा जंक्शन ते चोर्ला घाट (गोवा हद्द) या मार्गावरून अवजड वाहनांना 19 मार्च 2023 पर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
परंतु या आदेशाची अंमलबजावणी व्यवस्थित न केल्यामुळेच घाटरस्त्यावरून अवजड वाहनाची ये-जा करीत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीप्रमाणेच वाहतूककोंडी होत असून प्रवासी वाहनचालकांना नाहक त्रास होत आहे.
चोर्ला घाटातून प्रवास करताना एक तरी अवजड वाहन हमखास घाटात कलंडलेल्या अवस्थेत दिसते किंवा या वाहनांमुळे वाहतूक कोंडी तरी झालेली दिसते. एक तर रस्ता अरुंद आहे, त्यात घाटात नागमोडी वळणे, असे असताना अवजड वाहने सुसाट हाकली जातात. काही वेळा चालकांचा ताबा जातो, तर काहीवेळा नागमोडी वळणातून गाडी हाकताना कलंडते. त्यामुळे प्रवासी वाहनचालकांना ये-जा करणे कठीण होत आहे.
कडक कारवाईची गरज
कर्नाटक हद्दीतील रस्त्यावर अवजड वाहनांमुळे मोठे खड्डे पडल्याने प्रवासी वाहनचालकांना वाहन हाकणे कठीण होते. चोर्ला घाटातून अवजड वाहनांची ये-जा अशीच सुरू राहिली तर हा रस्ताही खराब होण्याची शक्यता आहे. शिवाय कर्नाटकच्या हद्दील छोटे नादुरुस्त पूल कोसळण्याची शक्यता आहे. गोवा शासनाने बंदी आदेशाची अंमलबजावणी करावी, कडक कारवाई केल्यास या अवजड वाहतुकीवर नियंत्रण येईल, असे प्रवाशांचे मत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.