निवडणूक आचारसंहिता धाब्‍यावर बसवून संगीताच्या तालावर धरला ठेका

आचारसंहितेचे उल्लंघन : कोरोनाचे नियम पायदळी तुडवत बेभान डान्‍स
Party in Goa
Party in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना आणि कोणतेच परवाने न घेता किमान 500 पेक्षा जास्त पर्यटकांना जमवून गावडेवाडा-मोरजी येथील ‘लिव्हिंग रुम’ रिसॉर्टमध्ये बेकायदा संगीत रजनी पार्टीचे (Party) आयोजन करण्‍यात आले होते. स्थानिक नागरिकांनी त्वरीत या घटनेची माहिती पेडणे पोलिसांना देताच निरीक्षक विक्रम नाईक यांनी फौजफाट्यासह घटनास्‍थळी धाव घेतली. (code of conduct for assembly elections was violated In Goa)

पोलिस (Goa Police) पार्टीस्‍थळी पोचले तेव्‍हा शेकडो पर्यटक कोरोना नियमावली पायदळी तुडवून आणि निवडणूक आचारसंहिता (Code Of Counduct) धाब्‍यावर बसवून संगीताच्या तालावर नाचत होते. अतिमद्यप्राशन केल्‍यामुळे अनेकांना तर भानही नव्‍हते. शिवाय संगीत रजनी पार्टीसाठी आयोजकांनी आवश्‍‍यक कोणतेही परवाने घेतले नव्‍हते.

एका बिगरगोमंतकीय व्यावसायिकाने सदर पार्टीचे आयोजन केल्‍याचे समजते. पोलिस, काही स्थानिक आणि ध्वनिप्रदूषण समितीच्‍या सदस्‍यांनी ‘लिव्हिंग रुम’च्‍या आता जाऊन पाहणी केली असता तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती. आयोजकांनी पोलिसांना पाहून वीज बंद केली व पर्यटक सैरभैर पळू लागले. अनेक वाहने मुख्य रस्त्यावर एकाच वेळी धावू लागल्‍याने वाहतुकीची कोंडी झाली. निवडणूक भरारी पथक मात्र पार्टी संपल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले.

अन्‍यथा ‘रास्‍ता रोको’ करणार : ग्रामस्‍थ आक्रमक

ज्‍येष्ठ नागरिक विनायक हरमलकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, कित्येक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. स्थानिकांना त्‍याचा प्रचंड त्रास होतो. सरकार काहीच दखल घेत नाही. स्थानिकांच्या अनेक जमिनी बिगरगोमंतकीयांनी गिळंकृत केलेल्‍या आहेत. तसेच पारंपरिक पायवाटाही बंद केल्‍या आहेत. स्थानिक पंच विलास मोरजे म्‍हणाले की, स्थानिकांनी आपल्याला माहिती देताच आपण घटनास्थळी आलो, पोलिसही आले. पार्टी आयोजकांवर गुन्हा नोंद केल्यानंतर मोरजी पंचायत त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहे. परवाने नसताना संगीत रजनी पार्टी आयोजित करणे हा गुन्हा आहे. दरम्‍यान, पुन्‍हा पार्टीचे आयोजन करून स्थानिकांना त्रास देण्याचा आणि वाहतूक कोंडी करण्याचा प्रयत्न झाला तर ‘रास्ता रोको’ करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

तीन दिवसांपासून सुरू होती पार्टी:

पोलिस निरीक्षक विक्रम नाईक यांनी याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, पार्टी आयोजकांवर आम्ही गुन्हा नोंद केला आहे. लवकरच कारवाई केली जाईल. तर, स्थानिक युवक राजू हरमलकर, नितेश हरमलकर व अन्‍य युवकांनी सांगितले की, मागच्या तीन दिवसांपासून पार्टी सुरू होती. अनेकवेळा पोलिसांना फोन केले, आयोजकांना जाब विचारला, पण कोणीच दखल घेतली नाही. उलट आयोजक म्हणतात आमच्यावर कोणीच कारवाई करू शकत नाही. तसेच ते स्थानिकांना धमकावण्याचा प्रयत्न करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com