
वास्को: क्राईम ब्रँचने चार दिवसांपूर्वी ४.३ किलोग्रॅम कोकेन प्रकरणी अटक करण्यात आलेल्या रेश्मा व मंगेश वाडेकर यांना कोणाचा वरदहस्त होता, त्यांचा व्यवसाय तेथे कधीपासून होता. तेथे कोणकोण येत होते त्याबाबत सखोल चौकशी करण्याची गरज मुरगाव पालिकेच्या चार नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.
नगरसेवक प्रजय मयेकर यांनी बोगदा स्मशानभूमी परिसरात होणाऱ्या अज्ञात व्यक्तींच्या हालचालीबद्दल मुरगाव पालिका मंडळाच्या बैठकीत काही वेळा प्रश्न उपस्थित केले होते. परंतु मुरगाव पालिकेकडून दखल घेण्यात आली नाही.
त्यावेळी दखल घेण्यात आली असती, तर हा बोगदा स्मशानभूमीचे नाव बदनाम झाले नसते, असे उपनगराध्यक्ष रामचंद्र कामत यांनी सांगितले.
रेश्मा व मंगेश वाडेकर यांना ४.३ किलोग्रँम कोकेन प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्या दोघांची नावे उघड झाल्यावर येथे एकच चर्चा सुरू झाली होती. त्या दोघांना त्यावेळी बोगदा स्मशानभूमीत राहण्यास प्रतिबंध घालण्यात आला असता, तर हे प्रकरण तेथे घडले नसते आणि बोगदा स्मशानभूमीचे नाव बदनाम झाले नसते, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
नगरसेवक प्रजय मयेकर म्हणाले, तेथे काही अज्ञात व्यक्तींकडून संशयास्पद हालचाली होत असल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्याने आपण सदर प्रश्न मुरगाव पालिका मंडळाच्या बैठकीत उपस्थित केला होता.
मात्र याप्रकरणी चौकशी, तपासणी करण्याऐवजी काणाडोळा करण्यात आला. त्या दोघांना कोणाचा तरी वरदहस्त लाभल्याने त्यांच्याविरोधात मुरगाव पालिकेने चौकशी केली नाही. त्या दोघांना स्मशानभूमीतील घरामध्ये राहू द्यावे, यासाठी एका राजकारण्याने दबाब आणला होता. त्यामुळे तेथे सदर गोष्टी चालूच राहिल्या.
आता क्राईम ब्रँचने त्या दोघांसह निब व्हिन्सेंट याला अटक केल्याने तेथील प्रकरण किती गंभीर होते, हे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी एकंदर गंभीर दखल घेऊन मुरगाव पालिकेने आता तरी चौकशी करण्याची गरज आहे.
तेथे अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी खबरदारी घ्यावी. याप्रकरणी आम्ही मुरगाव पालिकेचे मुख्याधिकाऱ्यांना भेटून याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी करणार आहोत.
नगरसेवक कासकर यांनी बोगदा स्मशानभूमीतील संशयास्पद हालचालीबद्दल पालिकेने चौकशी करावी, अशी मागणी केली होती. तथापि चौकशी झालीच नाही. तेथे लक्ष न दिल्याने तेथील प्रकरण वाढतच गेले. आता तरी मुरगाव पालिकेच्या अधिकारी वर्गाने येथे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
हिंदू स्मशानभूमीची देखभाल करण्यासाठी मुरगाव पालिकेने जयवंत वाडेकर यांची नियुक्ती केली आहे. तेथे त्यांचा मुलगा मंगेश व सून रेश्माही राहू लागले होते. रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली होऊ लागल्या होत्या. त्यामुळे नगरसेवक प्रजय मयेकर यांनी आवाज उठविला होता. परंतू त्यचा काहीच फायदा झाला. त्यामुळे स्मशानभूमीतील संशयास्पद हालचाली वाढत गेल्या. या गोष्टीला कोण कारणीभूत आहे, यासंबंधीही येथे चर्चा होत आहे.
नगरसेवक दामू नाईक यांनीही स्मशानभूमीत असे प्रकार घडत होते, हे ऐकून मन सुन्न झाल्याचे सांगितले. गेल्या पंधरा वर्षात असे प्रकार होत नव्हते. ते आता होऊ लागले आहेत. यामागे कोण आहेत याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी येथील प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.