MPT Coal: मुरगाव बंदरात अतिरिक्त कोळसा हाताळणी प्रस्तावाला केंद्रीय वन व पर्यावरण खात्याने पर्यावरणीय मंजुरी (ईसी क्लिअरन्स) दिली आहे.
परिणामी या बंदरात कोळसा हाताळणीचे प्रमाण 50 टक्क्यांनी वाढू शकते, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. सध्या येथील दोन बर्थवर वर्षाकाठी 13 दशलक्ष टन कोळसा हाताळला जात आहे.
यात आणखी सात दशलक्ष टन कोळशाची भर पडणार आहे. त्यामुळे वास्को शहरातील प्रदूषणाचे प्रमाण अधिकच वाढणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून हा विश्वासघात आहे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने 11 जानेवारी 2023 रोजी साउथ वेस्ट पोर्ट लिमिटेडला मुरगाव बंदरातील बर्थ 5 ए आणि 6 ए येथे प्रस्तावित टर्मिनलवर कोळसा हाताळणी क्षमता वाढीसाठी मंजुरी दिली आहे.
15 जुलै 2017 रोजी ‘कोळसा आणि कोळसा उत्पादने’ हाताळण्यासाठी मुरगाव बंदराच्या बर्थ 5-ए आणि 6-ए येथे टर्मिनल क्षमता वाढीचा प्रस्ताव पाठविला होता. कोळशा बरोबर लोहखनिज आणि चुनखडीचा समावेश आहे.
मुरगाव पोर्ट ट्रस्ट, मुरगाव येथे, तज्ञ मूल्यमापन समितीने ऑगस्ट 2017 आणि नोव्हेंबर 26- 28, 2018 दरम्यानच्या वेगवेगळ्या बैठकांमध्ये चर्चा करून या प्रस्तावाला मान्यता दिली होती.
जनआंदोलन उभारणार; बैठका सुरू- कॅ. विरियातो फर्नांडिस
या निर्णयामुळे वास्को भागातील लोकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या निर्णयाविरोधात पुन्हा एकदा जनआंदोलन उभारण्याचे ठरविले आहे. या संदर्भात बैठका घेणे सुरू झाले आहे, अशी माहिती कोळसा वाहतूक विरोधी आंदोलनातील नेते कॅ. विरीयातो फर्नांडिस यांनी दिली.
वास्को येथील पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते आणि कोळसा हाताळणीवर निर्बंध यावेत, यासाठी गोवा खंडपीठात जनहित याचिका दाखल केलेले शेर्विन कुरैया म्हणाले की, ही ईसी मान्यता म्हणजे गोवावासीयांसाठी एक दुःखाची गोष्ट आहे.
कोळसा हाताळणीच्या वाढीव क्षमतेमुळे वास्कोमधील कोळसा प्रदूषण वाढेल. पर्यावरणाच्या निर्णयात लोकांच्या आवाजाला किंमत नाही हेच यातून सिद्ध होते, अशी प्रतिक्रिया शेर्विन कुरैया यांनी व्यक्त केली.
गोवा अगेन्स्ट कोल या संघटनेचे कार्यकर्ते आणि पर्यावरणीय चळवळीतील नेते ओलेन्सियो सोमोईस म्हणाले, केंद्र सरकार ही मान्यता देणार ही भीती आम्ही 2017 सालीच व्यक्त केली होती. आज ती खरी ठरली आहे.
एप्रिल-मे 2017 मध्ये 8 दिवस चाललेल्या पर्यावरणीय जनसुनावणीत या प्रस्तावाला कडाडून विरोध करण्यात आला होता. माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी केंद्र सरकारकडे केलेल्या कळकळीच्या याचनाही कानावर पडल्या नाहीत. विधानसभेत दिलेले आश्वासन निरर्थक ठरले आहे.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या क्षमता वाढविण्याच्या प्रस्तावाला विरोध केला होता. 14 ऑगस्ट 2017 रोजी केंद्रीय तत्कालीन पर्यावरण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पर्रीकर यांनी लिहिलेल्या पत्रात, बर्थ 5ए आणि 6ए वरील कोळसा हाताळणीत प्रस्तावित वाढीस जनसुनावणीत जनतेने विरोध केला होता.
गोवा राज्य प्रदूषण मंडळाच्या हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण अहवाल सूचित करतात की यातील कोळशाची पूड असलेले पदार्थ निर्धारित मर्यादा ओलांडत आहेत. जोपर्यंत वास्को शहरातील प्रदूषणाचे प्रमाण निर्धारित मर्यादेमध्ये येत नाही तोपर्यंत कोळसा हाताळणीच्या विस्ताराच्या विनंतीवर विचार न करणे शहाणपणाचे आहे, असे म्हटले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.