

पणजी: पारंपरिक उद्योग-व्यवसायांचा विचार केला तर मत्स्यव्यवसाय हा अजूनही गोमंतकीयांच्या हाती असलेल्या मोजक्या उद्योगांपैकी एक आहे. हा व्यवसाय बाहेरील लोकांच्या हातात जाऊ देऊ नका. हा उद्योग गोव्यातील लोकांच्याच ताब्यात राहिला पाहिजे, असे परखड आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
मत्स्यव्यवसाय संचालनालयातर्फे गुरुवारी पणजी जिमखाना (कांपाल) येथे ‘राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी मत्स्य व्यवसायमंत्री नीळकंठ हळर्णकर, संचालक शमिला मोंतेरो आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, राज्यातील पारंपरिक मच्छीमारांना खात्यातर्फे ‘फिशरमन कार्ड’ दिले जाईल. राज्यातील बाजारपेठांमध्ये मासे विक्रीसाठी हे कार्ड अनिवार्य असेल. ज्यांच्याकडे हे कार्ड नसेल, त्यांना मासे विक्रीस परवानगी दिली जाणार नाही. केवळ पारंपरिक गोमंतकीय मच्छीमारच या कार्डसाठी पात्र असतील. बाहेरील व्यक्तींना हे कार्ड दिले जाणार नाही. परंतु या व्यवसायात असणाऱ्या परराज्यातील व्यक्तीकडे १५ वर्षांपासून राहत असलेला रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.
मी नियमितपणे साखळी व पणजी (Panaji) येथील बाजारातून मासे खरेदी करतो. त्यामुळे तिथे कोण मासे विकतो, याची मला चांगली माहिती आहे. मासे खरेदी करण्यासाठी मी लवकरच म्हापसा मासळी बाजाराला भेट देणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
‘राष्ट्रीय मत्स्य-शेतकरी दिन २०२६’चे औचित्य साधून राज्याच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री सावंत आणि मत्स्यव्यवसाय मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी खेकडा पालन (क्रॅब कल्चर) प्रकल्प उभारणीसाठी आर्थिक साहाय्य योजना आणि मत्स्य विक्रेत्यांसाठी आर्थिक साहाय्य योजनेचा शुभारंभ केला.
मुख्यमंत्री सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हारकार’ परवाना नूतनीकरणाचा दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडवल्याची घोषणा मंत्री हळर्णकर यांनी केली. आता मच्छीमारांना केवळ एकदाच ''ना-हरकत प्रमाणपत्र'' (एनओसी) घ्यावे लागेल. परवान्याच्या पुढील नूतनीकरणासाठी पुन्हा नवीन ‘एनओसी’ घेण्याची आवश्यकता नसेल, असेही त्यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.