
CM Pramod Sawant About Kajugotto Roads
केपे: अटल सेतू आणि झुआरी पुलांवरून असंख्य लोक प्रवास करतात; पण ७० च्या आसपास लोकसंख्या असलेल्या काजूकट्टो आणि परिसराला जोडणाऱ्या नवीन रस्त्यामुळे येथील विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन देशाचे उज्ज्वल भविष्य घडविणार आहेत. म्हणून या रस्त्यासाठी १४ कोटी रुपये खर्च करताना समाधान मिळत आहे. प्रत्येक व्यक्तीमागे दहा लाख रुपये खर्च करावे लागले तरी ते करण्यास सरकार तयार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
आज मुख्यमंत्र्यांनी सांगे मतदारसंघाचा झंझावाती दौरा करून येथे सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. काजूकट्टो, पाडी, किस्कोंड, कार्ला आणि काजूर गावांना जोडणाऱ्या रस्त्याची पायाभरणी डॉ. सावंत यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, माजी आमदार वासुदेव मेंग गावकर, स्थानिक पंचसदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या गावांना गोवा मुक्तीनंतर पहिल्यांदाच रस्ता मिळत आहे. हे काम माझ्या कारकिर्दीत सुरू झाले, याचा मला अभिमान आणि आनंदही आहे, असे सावंत म्हणाले.
आमदार सुभाष फळदेसाई यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे काम मार्गी लागले. पूर्वी गावातील लोक कच्च्या रस्त्याचा वापर करत होते. मुख्यमंत्र्यांनी जंगलात राहणाऱ्या या लोकांना वन खात्याने त्रास करू नये आणि त्यांच्या जीवनातील हस्तक्षेप कमी करावा, अशी सूचना केली आहे. जळाऊ लाकडासाठी सुकलेल्या झाडांचा वापर केला जातो. सहसा जीवंत झाड कापले जात नाही आणि मारावे लागलेच तर त्याची पूजा केली जाते. काही प्रकारच्या झाडांना येथील ग्रामस्थ देवासमान पूजतात. त्याच्या फांद्याही कापल्या जात नाहीत. वन खात्याने ग्रामस्थांना सहकार्य करावे, जेणेकरून वन खात्याला ते सहकार्य करतील असे मुख्यमंत्री म्हणाले.
बेंडवाडा येथील समांतर पूल आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीच्या बांधकामाची त्यांनी पाहणी केली. बेंडवाडा पुलाचे काम पूर्ण झाले असून लवकरात लवकर या पुलाचे लोकार्पण केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. रिवण आणि मळकर्णे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारत बांधकामाचीही त्यांनी पाहणी केली. कार्ला, काजूर येथे त्यांनी लोकांची संवाद साधला.
काजूकट्टो तसेच इतर ग्रामीण भागांत रस्ते करण्यासाठी मी स्वतः झटलो असून वन खात्याशी संघर्ष करून रस्त्यांची कामे केली आहेत. मुख्यमंत्री सावंत यांच्या सहकार्याने सुमारे दोनशे कोटींची कामे मतदारसंघात सुरू असून ही कामे दोन वर्षांत पूर्ण होतील, असे सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील लोकांनी पूर्वीपासून जंगल व झाडांची निगा राखली. कित्येक वर्षांपासून त्यांनी हे काम अविरतपणे सुरू ठेवले आहे. जंगल आणि वनसंपदा आदिवासी समुदायामुळे सुरक्षित आहे, हे वन खात्याने लक्षात ठेवावे. झाडाला देवाचा दर्जा देणाऱ्या या समुदायांमधील हस्तक्षेप वन खात्याने बंद करावा, अशा कड़क शब्दांत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वन अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.