खरी कुजबुज: मुख्यमंत्री शांत, अविचल!

Khari Kujbuj Political Satire: नोकऱ्यांच्या चोरबाजारप्रकरणी गॉडफादर आणि गॉडमदर यांच्यापर्यंतही तपास यंत्रणा पोचतील असे सांगून कृषिमंत्री रवी नाईक यांनी उत्सुकता वाढवली आहे.
Khari Kujbuj
Khari Kujbuj Dainik Gomantak
Published on
Updated on

मुख्यमंत्री शांत, अविचल!

दर दिवशी नोकरीकांड प्रकरणात एक दोन लोकांना, विशेषतः महिलांना अटक होत आहे. वृत्तपत्रे बातम्या रंगवून प्रसिद्ध करीत आहेत, विरोधी नेते डरकाळ्या फोडीत आहेत, परंतु मुख्यमंत्री अविचल आहेत, शांत आहेत. न्यायालयीन चौकशीची त्यांना आवश्यकता अद्याप भासलेली नाही. शुक्रवारी ते बिरसा मुंडा कार्यक्रमात सहभागी झाले आणि संध्याकाळी महाराष्ट्रात प्रचारासाठी रवाना झाले. बाबूश मोन्सेरात काही बोलो अथवा उत्पल पर्रीकर. कोणी आपल्या सरकारचे वाकडे करू शकत नाही, याची त्यांना जाणीव आहे व विरोधी पक्षांचीही शक्ती ते ओळखून आहेत. त्यांनी परवा भाजपातील काही नेत्यांना स्पष्टपणे सांगून टाकले. २०२७ च्या निवडणुकीतही भाजपाच सत्तेवर येणार अन् मीच पुन्हा मुख्यमंत्री बनणार! ∙∙∙

रवी उवाच

नोकऱ्यांच्या चोरबाजारप्रकरणी गॉडफादर आणि गॉडमदर यांच्यापर्यंतही तपास यंत्रणा पोचतील असे सांगून कृषिमंत्री रवी नाईक यांनी उत्सुकता वाढवली आहे. मिश्कील टिप्पणी करण्यात त्यांचा हात कोणी धरू शकणार नाही. त्यांच्या एका वाक्यातून अनेकजण जायबंदी होतात. गॉडफादर आणि गॉडमदर म्हणजे कोण, त्यांना कोणती नावे अपेक्षित आहेत याविषयी त्यांनी मौन बाळगले आहे. मात्र, या साऱ्याच्या मुळाशी एक पुरुष व एक महिला आहे असे सांगून त्यांनी बरोबर शरसंधान केल्याची चर्चा सुरू झाली आहे. तपासकामातून या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढली जातील असे सरकार सांगत आले आहे. विशेष तपास पथक स्थापन करणे किंवा गुन्हे शाखेकडे ही प्रकरणे सोपवणे असा कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे रवी यांचे वक्तव्य बरेच काही सांगून जाणारे आहे. हसत हसत रवी यांनी हे वक्तव्य केले असले तरी त्यांना या प्रकरणाच्या मुळाशी नेमका कोण असावा, कोण असावी असे वाटते हेही तितकेच महत्त्वाचे आहे. विरोधकांना त्यांनी दिलासा दिला की सत्ताधाऱ्यांना इशारा दिला याचा सोयीस्कर अर्थ काढण्याची सोय त्यांनी या वक्तव्यात ठेवलेली आहे. आहे की नाही रवी उवाच सर्वांवर भारी? ∙∙∙

समाजात फूट पडते तेव्हा...

गोव्यातील दोन प्रमुख समाजांमध्ये फूट पडली आहे. सध्या एसटी समाजातील प्रमुख नेत्यांमध्ये धमासान सुरू आहे आणि रमेश तवडकर, गोविंद गावडे, प्रकाश वेळीप हे एकमेकांविरुद्ध तोंडसुख घेण्याची संधी सोडत नाहीत. परवा एसटी मेळावा झाला, तेथे गावडे - वेळीप यांनी तो अपहृत करून भाजपाचे ज्येष्ठ नेते तवडकरांना आमंत्रणही दिले नाही. दुसऱ्या बाजूला गोव्यातील सर्वात मोठा समाज - भंडारी समाजातही फूट पडली आहे. तेथे रजिस्ट्रारनी निकाल देताच त्यांच्या समाजाचे नेते अशोक नाईक व देवानंद नाईक माथे टेकण्यासाठी रुद्रेश्वरला गेले नाहीत; ते गुच्छ घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले! जेव्हा प्रबळ समाज एकसंध असतात, तेव्हा त्यांची शक्ती वाढते व राजकारणात ते प्रबळ दावेदारी करू शकतात. त्याचा परिणाम सत्ताधारी गटावर होतो व त्यांना सत्तेत अधिक भागीदार करून घ्यावे लागते... समाज अस्थिर असतात, तेव्हा इतर गटांचे अधिकच फावते! त्यामुळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत गालातल्या गालात हसत असतील, तर नवल ते काय! ∙∙∙

आयकर खाते का लक्ष घालत नाही?

सध्‍या गोव्‍यात गाजत असलेल्‍या ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्‍याची व्‍याप्‍ती एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे की, हा घोटाळा कोटी-कोटींची उड्डाणे पार करत असल्‍याचे दिसून आले आहे. अशा परिस्‍थितीत या घोटाळ्यात जे कोण आहेत त्‍यांनी यातून किती माया कमावली आणि ती कुणाकुणाकडे पोचली हे तपासण्‍यासाठी आता आयकर खातेही या तपासात का उडी घेत नाही? असे झाल्‍यास जमिनीत गाडलेले आणखी किती तरी सांगाडे वर येणार नाहीत का? ∙∙∙

मायकल लोबोंचे वर्चस्व

कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी उत्तर गोव्यात हळूहळू हातपाय पसरू लागल्याने तेथील विद्यमान आमदारांचे धाबे दणाणले आहेत. त्यांनी मांद्रेमध्ये गणेशचतुर्थी काळानंतर आता एका देवस्थानला भेट दिल्याने तेथील स्थानिक आमदारांची चलबिचल सुरू आहे. आमदार लोबो हे मांद्रेमध्ये वारंवार तेथील कार्यकर्त्यांना भेटत असल्याने त्याची भीती वाटत नसले, असे स्थानिक आमदार जीत आरोलकर वरवर सांगत असले, तरी त्यांनी धसका घेतला आहे. कळंगुट मतदारसंघानंतर शिवोली मतदारसंघात आमदार मायकल लोबो यांनी आपले वर्चस्व कायम राखल्याने ते मांद्रे मतदारसंघातही पुढील काळात वरचढ ठरू शकतात हे आरोलकर यांना माहीत आहे. त्यामुळे ते आत्तापासूनच सावध झाले आहेत. आमदार लोबो यांना भाजपमध्ये पूर्वीचे स्थान मिळवण्यासाठी आपले वर्चस्व दाखवण्यासाठी त्यांनी ही कासवाची चाल सुरू केली आहे. ∙∙∙

हवा बदलाचे तर संकेत नाहीत ना?

सध्या गोव्यात ज्याच्या त्याच्या तोंडी एकच मुद्दा आहे व तो म्हणजे सरकारी नोकरी विक्री घोटाळा व त्या विकणाऱ्या रूपवती. विरोधी पक्षांना एकप्रकारे आयताच हा मुद्दा मिळाला आहे. दिवसेंदिवस नव नवीन प्रकरणे उघडकीस येत असून सत्ताधाऱ्यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. प्रत्येकाचे म्हणणे एकच व ते म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या मदतीशिवाय एवढा मोठा घोटाळा होऊच शकत नाही. संशयित महिला म्हणे सुरवातीस सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकारी म्हणून वावरत होत्या, काही तर भाजपच्या मंडल महिला अध्यक्षही होत्या, तर अन्य काही मंत्र्यांच्या निकट वावरत होत्या. त्यामुळे त्याचा प्रतिवादही करणे पक्षाला अशक्य होऊन बसले आहे. हे प्रकार कोणत्या एकाच तालुक्यात वा मतदारसंघापुरते मर्यादित नाहीत, तर सर्व भागांत घडलेले आहेत. आता तर काँग्रेसने सोमवारपासून या प्रकरणात आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने भाजपला ते महागात पडण्याची चिन्हे दिसत आहेत. तिकडे जमीन रूपांतराचा मुद्दा उपस्थित करून नव्या प्रादेशिक आराखड्याची मागणी जोर पकडू लागली आहे. एकंदरीत भाजपविरोधी वातावरण तयार होताना दिसत असून सत्ताधारी बचावात्मक भूमिकेत आल्याचे राजकीय निरीक्षक मानत आहेत. गोव्यात अशी स्थिती असताना मुख्यमंत्री व अन्य भाजपवाले शेजारच्या महाराष्ट्रात कोणत्या तोंडाने प्रचाराला जातात असा मुद्दाही उपस्थित झाला आहे. ∙∙∙

आधारकार्डसाठी २५ हजार रुपये?

सरकारी नोकऱ्या मिळविण्‍यासाठी कित्‍येकजण लाखो रुपये गमावून बसले आहेत. त्‍यामुळे संपूर्ण गोव्‍यात हा एक चर्चेचा विषय बनला आहे. मात्र, फक्‍त सरकारी नोकऱ्यांतच भ्रष्‍टाचार होतो असे नाही, तर सामान्‍य प्रशासनही भ्रष्‍टाचारी बनलेले आहे हे आता मडगावातील माथानी साल्‍ढाना प्रशासकीय संकुल हे तर या भ्रष्‍टाचाराचे केंद्रस्‍थानच मानावे लागेल. कारण या प्रशासकीय संकुलात कुणी विदेशात काम करणारी व्‍यक्‍ती आपले आधारकार्ड तयार करण्‍यास आल्‍यास तिथे त्‍यांच्‍याकडे म्‍हणे चक्‍क २५ हजार रुपये मागितले जातात. हा असा भ्रष्‍टाचार रोखण्‍यासाठी सरकार काही उपाय करील का? ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com