Goa Election: शिरोड्यात भाजप आणि ‘आप’ आमने-सामने

काँग्रेस पिछाडीवर,राष्ट्रवादीचाही समावेश : रणधुमाळीला वेग
Goa AAP BJP
Goa AAP BJP Dainik Gomantak
Published on
Updated on

शिरोडा मतदारसंघात गेल्या दोन दिवसात समीकरणे बदलू लागली असून कॉंग्रेसची उमेदवारी बोरीचे पंच तुकाराम बोरकर यांना दिल्यामुळे आता वेगळेच ‘नाट्य’ तयार व्हायला लागले आहे. वास्तविक दोन दिवसांपूर्वी बोरीच्या सरपंच ज्योती नाईक यांचे पती मुकेश यांना ही उमेदवारी मिळणार अशी हवा होती. पण शेवटी ही उमेदवारी तुकाराम बोरकर यांच्या गळ्यात पडली. (Clash between BJP and AAP in Shiroda for goa assembly election)

Goa AAP BJP
Goa Election: गोवा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचा काँग्रेसला पाठिंबा

वास्तविक काही दिवसांपूर्वी बोरकर यांनी तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. नंतर तृणमूलने मगोपशी घरोबा केल्यामुळे बोरकर यांनी तृणमूलला (Goa TMC) सोडचिठ्ठी देऊन अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. गेल्या आठवड्यात त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आणि आता त्यांना उमेदवारी मिळाली आहे.

सुभाष शिरोडकर कॉंग्रेसमध्ये असताना कॉंग्रेसचा (Goa Congress) शिरोड्यात दबदबा होता. 1984 ते 2007 या कालावधीत सुभाष शिरोडकर हे कॉंग्रेसचे आमदार होते. पण 2007 साली त्यांचा भाजपच्या महादेव नाईक यांच्याकडून पराभव झाला होता. 2012 साली त्याचीच पुनरावृत्ती झाली होती. पण 2017 साली सुभाष शिरोडकरांनी महादेव नाईक यांचा तब्बल पाच हजार मतांनी पराभव करून याचा वचपा काढला होता. नंतर 2019 साली शिरोडकर भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर सगळी समीकरणे पुन्हा बदलली होती. त्यावर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत सुभाष शिरोडकर यांनी मगोपच्या दीपक ढवळीकरांवर केवळ सत्तर मतांनी निसटता विजय मिळवला होता.

Goa AAP BJP
Goa BJP: उत्‍पल-उदय आले एकत्र

सुभाष शिरोडकर यांच्या बरोबर पंचायतीचे सरपंच, पंचायत सदस्य भाजप मध्ये गेल्यामुळे कॉंग्रेसचे कार्य मंदावल्यासारखे झाले होते. याला ऊर्जा देण्याचा प्रयत्न मुकेश नाईक, देविदास किन्नरकर यांसारख्या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी करण्याचा प्रयत्न केला होता.

शिरोड्यात सुभाष शिरोडकरांच्या विरूध्द ताकदीचा उमेदवार हवा आहे, असे येथील राजकीय विश्‍लेषकांना वाटत असले तरी त्यांच्या विरोधात बरेच उमेदवार उभे ठाकणार असल्यामुळे मतांच्या विभाजनाचा फायदा त्यांना मिळतो की काय हे बघावे लागेल.

मगोपतर्फे संकेत मुळे यांना उमेदवारी देण्यात आली असून ते प्रचार करताना दिसत आहेत. पण तरीही नवोदित असल्याने ते काय किमया करतात,हे बघावे लागेल. डॉ. सुभाष प्रभुदेसाई हे आता राष्ट्रवादीच्या गोटात शिरले असून राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता कॉंग्रेस, राष्ट्रवादी,आप,मगोप- तृणमूल हे पक्ष रिंगणात दिसणार आहेत.

आप (Goa AAP) करिष्मा दाखवणार का?

नुकत्याच पक्षात आलेल्या बोरकरांना कॉंग्रेसने उमेदवारी दिल्यामुळे शिरोड्यात कॉंग्रेसमध्ये फुटीची शक्यता निर्माण झाली असून त्यामुळे आता सुभाष शिरोडकर यांची लढत आम आदमी पक्षाचे उमेदवार तथा माजी मंत्री महादेव नाईक यांच्याशी होणार हे निश्चित झाले आहे. महादेव नाईक हे शिरोड्यातून दोन वेळा निवडून आल्यामुळे त्यांचा या मतदारांशी दांडगा संपर्क आहे. याचा त्यांना फायदा होऊ शकतो. पोटनिवडणुकीत ते कॉंग्रेसतर्फे रिंगणात उतरले होते. त्यावेळी त्यांना ३३००च्या आसपास मते पडली होती. सध्या त्यांनी आपतर्फे जनसंपर्क वाढवला आहे.

जुन्यांना डावलल्याने काँग्रेसमध्ये धुसफूस !

मुकेश हे गेली दोन वर्षे कॉंग्रेसचे कार्य करीत असून सुभाष शिरोडकर कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यानंतर कॉंग्रेसची धुरा मुकेश नाईक व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांभाळली होती. पण आता त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांत नैराश्याचे वातावरण पसरले असून ते आता कोणती पावले उचलतात, हे बघावे लागेल. या वेगळ्याच रणनीतीमुळे सध्या कॉंग्रेस शिरोड्यात मागे पडल्यासारखी झाली आहे.

निसटत्या विजयाची परंपरा राखणार का?

सुभाष शिरोडकर हे जरी शिरोड्यातून सातवेळा निवडून आले असले तरी सहा वेळा ते अल्पमतांनी विजयी झालेत. पडणार असे वाटत असतानाच निवडून येणे,ही त्यांची खासियत मानली जाते. पण यावेळी या ‘चक्रातून’ बाहेर पडतात का, हे बघावे लागेल

मिलिंद म्हाडगुत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com