
मडगाव : १९९४ पासून मडगावचे आमदार असलेले आणि सातवेळा मडगावातून सतत जिंकून आलेले दिगंबर कामत यांना २०२७ ची विधानसभा निवडणूक जड जाणार का? सध्या मडगावात सगळीकडे हीच चर्चा सुरू आहे. युवा उद्योजक चिराग नायक यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर या चर्चेला ऊत आला आहे.
दिगंबर कामत आणि मडगाव यांचे एकमेकांशी दीर्घकाळाचे नाते असून १९८६ पासून ते मडगावच्या राजकारणात सक्रिय आहेत. १९८६ साली ते मडगावात नगरसेवक म्हणून जिंकून आले होते. त्यानंतर १९८९ साली त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर मडगावातून निवडणूक लढविली होती. मात्र, पहिल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
१९९४ साली भाजपच्या उमेदवारीवर ते मडगावातून निवडून आल्यानंतर त्यांनी सतत सात निवडणुका जिंकल्या आहेत. या पार्श्वभू्मीवर चिराग नायक हे मडगावच्या राजकारणात अगदी नवखे आहेत. आता या नवखेपणाचा फायदा नायक यांना होणार की अनुभवाच्या जोरावर कामत हेच पुन्हा जिंकून येणार हा प्रश्न सध्या चर्चेत आहे.
वास्तविक कामत यांनी २०२२ ची विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या उमेदवारीवर जिंकली होती. नंतर त्यांनी दीड वर्षापूर्वी भाजप पक्षात प्रवेश केला. वास्तविक २०२२ च्या निवडणुकीत दिगंबर कामत हे त्यांची एकूणच राजकीय कारकीर्द पाहिल्यास सर्वांत अधिक मतांच्या आघाडीने जिंकून आले होते.
मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर २०२४ मध्ये जी लोकसभा निवडणूक झाली, त्यावेळी भाजप उमेदवाराला मडगावातून फक्त दीड हजार मतांची आघाडी मिळवून देणे त्यांना शक्य झाले होते.
त्यामुळे मडगावात कामत यांच्या विरोधात नाराजीचे वातावरण असल्याचे सांगितले जात होते. मात्र मडगावात खरेच तशी स्थिती आहे, की मडगावच्या मतदारांचा कामत यांनाच नेहमीप्रमाणे जसा पाठिंबा मिळतो, तसाच २०२७ च्या निवडणुकीतही मिळणार याचीही सध्या मडगावात चर्चा चालू आहे. मडगावचे माजी आमदार बाबू नायक यांचे नातू प्रभव नायक हेही मडगावच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे २०२७ च्या निवडणुकीत त्यांची भूमिका काय असेल यावरही बरेच काही अवलंबून असेल.
सकारात्मक बाजू
मडगावच्या राजकारणात ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव.
मडगावच्या प्रत्येक मतदारांबरोबर असलेला वैयक्तिक संबंध.
कुठल्याही पक्षात असो मडगावातील काही भागाकडून सतत मिळणारा पाठिंबा.
सत्ताधारी भाजप पक्षाचा आमदार
नकारात्मक बाजू
सतत ३१ वर्षे आमदार त्यामुळे काही प्रमाणात तयार झालेली एन्टी इन्कंबन्सी.
वाढलेले वय आणि पूर्वीच्या मानाने थकलेले शरीर.
काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केल्यामुळे अल्पसंख्याक मतदारांमध्ये वाढलेली नाराजी.
लोकसभा निवडणुकीच्यावेळी मोतीडोंगर आणि अन्य पाठिंबा देणाऱ्या भागांनी दिलेला दगा.
भाजपच्या एका गटात असलेली नाराजी.
सकारात्मक बाजू
नवा आणि तरुण चेहरा, आधुनिक विचारसरणी.
प्रतिष्तष्ठित कौटुंबिक पार्श्वभूमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा असलेला पाठिंबा.
सामाजिक कार्यात आणि क्रीडा क्षेत्रात सक्रिय असल्याने तरुण मतदारांना आकर्षित करण्याची शक्ती.
काँग्रेसच्या बाजूने ठामपणे उभी राहणारी अल्पसंख्याकांची एकगठ्ठा मते.
नकारात्मक बाजू
राजकारणात नसलेला अनुभव.
काँग्रेस पक्षातील अंतर्गत दुफळी.
मडगावच्या सर्व मतदारांपर्यंत पोचण्यासाठी लागणारा वेळ.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.